सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ मुंबईतील नोकरदार भगिनींची कथा/व्यथा… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला उठणा-या बायका……….

 

योगा, वॉक, आरामाची स्वप्नं

वर्षानुवर्षे डोळ्यात राखत

 

निर्दयी अलार्मचा कान पिळून

ताडकन, काटकोनात उठत

 

‘आज पुन्हा उशीरच, ‘ असा

स्वतःला दोष देत

 

स्वयंपाकपाणी झपझप आवरतात

 

तयार होतात – सुसाट पळतात

हा प्लॅटफॉर्म, तो प्लॅटफॉर्म

चढतात – उतरतात

 

सात पस्तीस शिताफीने

गाठणाऱ्या बायका!

 

सात पस्तीस मिळावी म्हणून

पाच पस्तीसला उठणा-या बायका……….

🚃🚋

गर्दी असतेच

पण, मैत्रिणी असतात

काही बसतात,

काही उभ्या राहतात

 

तीन सीटच्या बेंचवर

चौथी सीट तयार करत

ढकलतात, बुकलतात

 

‘झोपच नाही झाली आज, ‘

एकमेकींच्या कानात

वर्षानुवर्षे कुजबुजतात

 

जप, पोथी, मोबाईल, पुस्तक

सवयीने डोकं

कशात तरी खुपसतात

 

गुड मॉर्निंग, गुड डे

वाढदिवस, ॲनिवर्सऱ्या

गोडधोड, फुलंबिलं

देतात, घेतात,

उत्साही राहतात

 

आनंदी आहोत, हे वारंवार

स्वतःलाच समजावणा-या बायका

 

सात पस्तीस मिळावी म्हणून

पाच पस्तीसला उठणा-या बायका……….

 

कुठल्या तरी स्टेशनवर

गर्दी जरा सुटी होते

तेव्हा कुठे

घुसमटलेला पहिला मोकळा श्वास घेतात

 

आईच्या कुशीत शिरावं तसं

जोजवणा-या डब्याच्या

कुशीत शिरतात

 

खरं तर तो एक

छोटासाच तुकडा वेळेचा,

पण,

बिनघोर, बिनधास्त झोपून घेतात

 

एकमेकींच्या खांद्यावर घुसळत डोकं

एकमेकींच्या अंगावर टाकून भार

आपापलं स्टेशन येईपर्यंत

राहिलेली स्वप्नंही पाहून घेतात

 

छोटीशीच नॅप,

इतकुशीच, पण हक्काची झोप

प्रसन्न करते

 

धावत्या स्वप्नांना

आदल्या स्टेशनवर अचूक ब्रेक देते

 

‘चला, उद्या भेटू, ‘म्हणत

प्रसन्नतेला आत्मविश्वासाने गुणत

प्लॅटफॉर्मवर उतरतात

 

काळाचा तो छोटासा टप्पा

सोन्याचा करुन टाकणा-या बायका

 

सात पस्तीस मिळावी म्हणून

पाच पस्तीसला उठणा-या बायका……! 🚃🚋🚶🏻‍♀️🏃🏻‍♀️

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments