वाचताना वेचलेले
☆ ॥लकी आजोबा॥ ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆
☆
शाळा नाही,
दप्तर नाही
अभ्यास नाही,
परीक्षा नाही
पाढे नाही,
गृहपाठ नाही
आजोबा कसले
लकी आहेत नाही॥१॥
☆
ऑफीस नाही,
लँपटॉप नाही
रोजचा त्रासदायक
प्रवास नाही
आई आजी सारखा
स्वयंपाक नाही
आजोबा कसले
लकी आहेत नाही॥२॥
☆
सारखा फोन
नाही तर पेपर
फार तर बँकेत
एखादी चक्कर
कुठेही जा म्हटलं
की काढतात स्कूटर
आजोबा कसले
लकी आहेत नाही॥३॥
☆
मित्र जमवतात,
सहली काढतात
देश परदेश
फिरुन पाहतात
येतांना आम्हांला
गंमत आणतात
आजोबा कसले
लकी आहेत नाही॥४॥
☆
नमस्कार केला की
काहीतरी पुटपुटतात
आपल्याला नेहमीच
शाबासकी देतात
चष्मा स्वत: हरवतात
अन् दुसऱ्यांना
शोधायला लावतात
आजोबा कसले
लकी आहेत नाही॥५॥
☆
सर्व आजोबांना समर्पित….
संग्राहिका : जुईली अमोल
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈