वाचताना वेचलेले
☆ “मी एकदा आळीत गेलो…” – पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆
मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ ॥१॥
कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण ॥२॥
गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून चाळतो दाम
चाळीबाहेर दुकान माझे
विकतो तेथे हसणे ताजे ॥३॥
‘खुदकन हसू’ चे पैसे आठ
‘खो खो खो’ चे एकशे साठ
हसवण्याचा करतो धंदा
कुणी निंदा कुणी वंदा ॥४॥
कुणाकुणाला पडतो पेच
ह्याला का नाही लागत ठेच?
हा लेकाचा शहाणा की खुळा?
मग मी मारतो मलाच डोळा ॥५॥
कवी :पु ल देशपांडे
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈