वाचताना वेचलेले
माणसाला शेपूट येईल का ? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई
माणसाने माणसाशी
संवाद तोडला आहे
म्हणून तो घराघरात
एकटा पडला आहे
येत्या काळात ही समस्या
अक्राळविक्राळ होईल
तेव्हा आपल्या हातातून
वेळ निघून जाईल
कदाचित माणूस विसरेल
संवाद साधण्याची कला
याच्यामुळे येऊ शकते
मुकं होण्याची बला
पूर्वी माणसं एकमेकांशी
भरभरून बोलायची
पत्रसुद्धा लांबलचक
दोन चार पानं लिहायची
त्यामुळे माणसाचं मन
मोकळं व्हायचं
हसणं काय, रडणं काय
खळखळून यायचं
म्हणून तेव्हा हार्ट मध्ये
ब्लॉकेज फारसे नव्हते
राग असो लोभ असो
मोकळेचोकळे होते
पाहुणे रावळे गाठीभेटी
सतत चालू असायचं
त्याच्यामुळे प्रत्येक माणूस
टवटवीत दिसायचं
आता मात्र माणसाच्या
भेटीच झाल्या कमी
चुकून भेट झालीच तर
आधी बोलायचं कुणी ?
ओळख असते नातं असतं
पण बोलत नाहीत
काय झालंय कुणास ठाऊक
त्यांचं त्यांनाच माहीत
घुम्यावाणी बसून राहतो
करून पुंगट तोंड
दिसतो असा जसा काही
निवडुंगाचं बोंड
Whatsapp वर प्रत्येकाचेच
भरपूर ग्रुप असतात
बहुतांश सदस्य तर
नुसते येड्यावणी बघतात
त्यांनी मेसेज वाचल्याच्या
दिसतात निळ्या खुणा
पण रिप्लाय साठी सुटत नाही
शब्दांचा पान्हा
नवीन नवीन Whatsapp वर
चांगलं बोलत होते
दोनचार शब्द तरी
Type करत होते
आता मात्र बऱ्याच गोष्टी
इमोजीवरच भागवतात
कधी कधी तर्कटी करून
इमोजीनेच रागवतात
म्हणून इतर प्राण्यांसारखी
माणसं मुकी होतील का ?
भावना दाबून धरल्या म्हणून
माणसाला शिंगं येतील का ?
काय सांगावं नियती म्हणेल,
लावा याला शेपटी
वाचा देऊन बोलत नाही
फारच दिसतो कपटी
हसण्यावर नेऊ नका
खरंच शेपूट येईल
पाठीत बुक्का मारून मग
कुणीही पिळून जाईल
म्हणून म्हणतो बोलत चला
काय सोबत येणार
नसता तुमची वाचा जाऊन
फुकट शेपूट येणार
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈