? वाचताना वेचलेले ?

☆ बोलणं… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

‘बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्याबद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत!  हे इतके महत्त्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.

‘आहे हे असं आहे’,

‘माझा आवाजच मोठा आहे’,

‘मला अशीच सवय आहे’

असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो.

बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर.

‘कौन बनेगा करोडपती’ मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. शब्दोच्चार, आवाजाचा चढ – उतार शिकायचं असेल तर हा आवाज अभ्यासायलाच हवा. आवाजाची, बोलण्याची साधना, तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन! काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही, हे हळूहळू कळत जातं.

शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो, त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो.

बोलण्याचा आवाज हा आतून येतो!  माणसाच्या चेतनेला स्पर्श करून, त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.

आशाताईंचं बोलणं गाण्याइतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे.

एक प्रयोग केला होता.,

सुंदर शब्दांची यादी वाचणं. प्रामाणिक, सत्य, अद्भुत, शक्ती… अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल तशी मोठ्याने वाचायची. वाढवत जायचे हे शब्द. हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. बोलणं चांगलं होतंच, पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही, इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो! संगत बदलते.

आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे. शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं!

सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात.

वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात. नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते. यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचं ठरतं .

कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेत! फक्त शोधता – ऐकता आली पाहिजेत.

या बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती  असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये?

फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.

आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो.

बोलणं म्हणजे निव्वळ शब्द थोडेच असतात? न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं.

वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत. माणसामाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते.  मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात; पण त्याआधी कसं बोलायचं, ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं.

बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो.

तात्पर्य :  ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, दुनिया त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीस  अशक्य गोष्टी शक्य होतात..

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments