श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “माझे माझे -तुझे तुझे…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
माझे माझे चे गाठोडे
तुझ्या चरणाशी वाहिले
तुझे तुझे म्हणताना
किती मोकळी मी झाले ।।
माझे माझे गणगोत
चिंता सर्वांची वाहिली
तुझे तुझे म्हणताना
गुंतागुंत ती सुटली ।।
माझा माझा रे संसार
करिता आयुष्य हे गेले
तुझे तुझे म्हणताना
मुक्त मनोमनी झाले. ।।
माझी माझी मुलेबाळे
मोह सुटता सुटेना
तुझे तुझे म्हणताना
चिंता काहीच वाटेना ।।
माझे माझे हे वैभव
हाच ध्यास जीवनात
तुझे तुझे म्हणताना
मन झाले हे निवांत ।।
माझे माझे हे चातुर्य
करी सदा रे विवाद
तुझे तुझे म्हणताना
ऐकू येई अंतर्नाद ।।
माझे माझे म्हणताना
मोह माया ताप जाळी
तुझे तुझे म्हणताना
लागे ब्रह्मानंदी टाळी ।।
माझे माझे मी पण
तुझ्या चरणी वाहिले
तुझे तुझे म्हणताना
तुझ्यातच विलोपले ।।
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈