सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ पाॅश किचन…  ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

रिमाने आज किचनमधली सगळी जुनी भांडी काढली. जुने डबे, प्लास्टिकचे डबे,जुन्या वाट्या, पेले, ताटं …सगळं इतकं जुनं झालं होतं.

सगळं तिने एका कोपऱ्यात ठेवलं. आणि नवीन आणलेली भांडी तिने छान मांडली..

छान पॉश वाटत होतं आता किचन…

 

आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं की झालं काम.

इतक्यात रिमाची कामवाली सखू आली.

पदर खोचून ती लादी पुसणार इतक्यात तिची नजर कोपऱ्यात गेली.  “बापरे !!  आज घासायला इतकी भांडीकुंडी काढली का ताई ?”…तिचा चेहरा जरा त्रासिक झाला.

रिमा म्हणाली “अग नाही. भंगारवाल्याला द्यायचीत.”

सखूने हे ऐकलं आणि तिचे डोळे एका आशेने चमकले.

“ताई,तुमची हरकत नसेल तर हे एक पातेलं मी घेऊ का?” सखूच्या डोळ्यासमोर तिचं तळ पातळ झालेलं आणि काठाला तडा गेलेलं एकुलतं एक पातेलं सारखं येऊ लागलं.

रीमा म्हणाली, “अग एक का?काय आहे ते सगळं घेऊन जा. तेवढाच माझा पसारा कमी होईल.”

“सगळं!”सखूचे डोळे विस्फारले… तिला जणू अलिबाबाची गुहाच सापडली.

तिने तिचं काम पटापट आटपलं.सगळी पातेली,डबे-डूबे, पेले… सगळं पिशवीत भरलं आणि उत्साहात घरी निघाली.आज जणू तिला चार पाय फुटले होते.

 

घरी येताच अगदी पाणीही न पिता तिने तिचं जुनं तुटकं पातेलं.. वाकडा चमचा… सगळं एका कोपऱ्यात जमा केलं .

आणि नुकताच आणलेला खजिना नीट मांडला. आज तिचा एका खोलीतला किचनचा कोपरा पॉश दिसत होता.

इतक्यात तिची नजर तिच्या जुन्या भांड्यांवर पडली आणि ती स्वतःशी पुटपुटली,”आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं, की झालं काम.”

 

इतक्यात दारावर एक भिकारीण पाणी मागत हाताची ओंजळ करून उभी राहिली.

“माय, पाणी दे.”

सखू तिच्या हातावर पाणी ओतणार, इतक्यात सखूला तिचं पातळ झालेलं पातेलं दिसलं. तिने त्यात पाणी ओतून त्या गरीब बाईला दिलं.पाणी पिऊन तृप्त होऊन ती भांडं परत करायला गेली.

सखू म्हणाली,”दे टाकून.”

ती भिकारीण म्हणाली “तुले नको?मग मला घेऊ?”

सखू म्हणाली” घे की आणि हे बाकीचं पण ने,”

असं म्हणत तिने तिचा भंगार त्या बाईच्या झोळीत रिकामा केला.

 

ती भिकारीण सुखावून गेली.

पाणी प्यायला पातेलं… कोणी दिलं तर भात, भाजी, डाळ घ्यायला वेगवेगळी भांडी…आणि वाटलंच चमच्याने खावं तर एक वाकडा चमचा पण होता….

आज तिची फाटकी झोळी पॉश दिसत होती. .!

 

“पॉश” या शब्दाची व्याख्या,

सुख कशात मानायचं, हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं.

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments