डॉ. ज्योती गोडबोले
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ परवा अचानक… कवयित्री : इरावती ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆
परवा अचानक मी मेले
आणि चक्क स्वर्गात गेले
म्हटलं चला पृथ्वीवरच्या
कटकटीतून सुटले
स्वर्गात मला माझे
बरेच आप्त भेटले.
संध्याकाळी विचार केला
जरा फेरफटका मारू
स्वर्गाचा आनंद लुटण्यासाठी
पाय मोकळे करू
पहिल्याच वळणावर मला
विंदा आणि बापट भेटले
त्यांना पाहून अवाक् झाले
शब्दच माझे मिटले.
मला पाहिल्यावर बापट
छान मिश्कील हसले
विंदा म्हणाले याच्या या
हसण्यावरच सगळे फसले.
मी नमस्कार केल्यावर
हळूच म्हणाले विंदा
ज्ञानपीठ पुरस्काराचा म्हणे
क्रायटेरिया बदललाय यंदा.
मी म्हटलं मी काय बोलणार
मी तर एक सामान्य वाचक
तुमच्या साहित्य पंढरीतला
एक साधासुधा याचक.
पुढच्या वळणावरच्या बाकावर
गडकरी होते बसले
त्यांच्या शेजारी गप्पा मारताना
बालकवी अन् मर्ढेकर दिसले
तशीच गेले पुढे
करीत मजल दरमजल
छोट्याशा पारावर होते
सुरेश भट अन् त्यांची
भन्नाट गझल!!!
पुढे एका कल्पवृक्षाखाली
सावरकर होते बसले
मी नमस्कार करताच
हात उंचावून हसले
म्हणाले मला,” कसा आहे
माझा भारत देश?
मला दूर नेणा-या सागराचा
तसाच आहे का अजून उन्मेष?”
त्यांच्या बलिदानाची आम्ही
काय ठेवलीय किंमत
हे त्यांना सांगायची
मला झालीच नाही हिंमत.
तशीच पुढे गेले तर
गडबड दिसली सारी
कोणत्यातरी समारंभाची
चालली होती तयारी.
कोणी बांधीत होते तोरण
कोणी रचित होते फुलं
स्वागतगीताची तयारी
करीत होते पु ल.
पुढं होऊन नमस्कार केला
म्हटलं, ‘कसली गडबड भाई?
विशेष काय आहे इथे?
कसली चालल्ये घाई?’
पुल म्हणाले उद्या आहे
इथं मोठा सोहळा
त्याच्यासाठी थोडासा
वेळ ठेव मोकळा.
डोळे मिचकावून भाई म्हणाले
उद्या आहे शिरवाडकरांचा बर्थ डे
तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे
उद्या आहे मराठी भाषा डे!!
असं नाही हं भाई
मी म्हणाले हसून
मराठी दिनाला आम्ही
‘दिन’ च म्हणतो अजून.
अरे वा! पुढे येऊन
म्हणाल्या बहिणाबाई
आसं दिवस साजये करून
व्हतंय का काही?
एक दिस म-हाटी तुम्ही
वरीसभर करता काय?
एक दिस पंचपक्वान्न
पन वरीसभर उपाशी
असती तुमची माय!!!
कवयित्री : इरावती
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈