? वाचताना वेचलेले ?

☆  तो सावळा सुंदरू… — लेखिका : सुश्री उल्का खळदकर ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

तो सावळा सुंदरू । कासे पितांबरू ।।

तो सावळा सुंदर विठ्ठल ! त्याला डोळे भरून पाहण्यासाठी मन आसुसलेलं असतं. सगळ्या भक्तांची तीच असोशी ! ‘ भेटी लागे जीवा लागलीसे आस ‘ असे आर्ततेने म्हणून तुकारामांची जी अवस्था तीच अवस्था एकनाथांची !

कटी पीतांबर तुळशीचे हार ।

उभा सर्वेश्वर भक्त काजा ।।

नामदेवांना विठ्ठल दिसतो असा —         

वाळे वाकी मजे तोड चरणी

नाद झणझणी वाजताती

कास कासियेला पीत पितांबर

लोपे झणकर तेणें प्रभा ।।

तुकारामांनी त्याचे केलेले वर्णन-

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

कर कटावरी ठेवूनिया।।

तुळशी हार गळा, कांसे पितांबर, आवडे निरंतर तेचि रुप।।

मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित।।

सर्व संतांना या विठ्ठलाने वेड लावलं.

जनाबाई दळीता कांडिता म्हणतात-

जनी म्हणे बा विठ्ठला .. जीवे न सोडी मी तुजला।।

तिला तर जळी-स्थळी-काष्ठीपाषाणी  विठ्ठलच दिसायचा.

जनी जाय पाणियासी। मागे जाय ह्रषीकेशी ।।

आणि मग तिने ……

धरिला पंढरीचा चोर । गळा बांधुनिया दोर ।

ह्रदयीं बंदीवान केला । आत विठ्ठल कोंडीला ।

शब्द केले जुडाजुडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ।

सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळतीला आला ।

जनी म्हणे बा विठ्ठला । जीवे न सोडी मी तुजला।।

या विठ्ठलाचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात–

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकतीं

रत्नकीळा फाकती प्रभा।।

अगणित लावण्य तेज पुंजाळले

न वर्णवे तेथिची शोभा।।

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु।।

सर्व संतांना त्यानी वेडं केलंच पण सामान्यांनाही तो आपलासा वाटू लागला आणि मग वारकरी संप्रदाय स्थापन झाला. दिंड्या देहू आळंदीहून पंढरपूरला जाऊ लागल्या. हातात टाळ चिपळ्या मृदुंग आणि मुखात विठ्ठलाचं नाव घेत, पायांना पंढरपूरचा ध्यास घेत दिंडी चालली. कुणाच्या तोंडी अभंग, कुणी हरिपाठ म्हणत आज वर्षानुवर्ष दिंडी चालली आहे. तनाने मनाने वारकरी म्हणतात…….

पोचावी पालखी विठ्ठलाचे द्वारी, मिळो मुक्ती तेथ दिंडीच्या अखेरी

देहाची पालखी, आत्माराम आत, चालतसे दिंडी, जीवनाची वाट।।

काही वर्षे या करोना महामारीमुळे या दिंडीला खीळ बसली होती. सारंच कसं आभासी झालं होतं. पण प्रत्येकाच्या मनात विठ्ठल आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल… असं कोणी मानतं, तर कुणी मनाने या दिंडीची वाट चालत आहे. जणू काही आपण वारीबरोबर चाललो आहोत ! आज एकादशीला सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले …  विसरून गेले देहभान — मी माझ्या दारात या फुलांच्या कलाकृतीने दिंडी चालत आले. आज त्याची समाप्ती. वारकरी अलोट गर्दीमुळे कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरतात. परतवारी मी माझ्या मनाने तुझ्या गाभाऱ्यात पोचले. तुझं सावळं सुंदर

मनोहर रुप पाहतच राहिले. रोजच तुझे रुप मी अनुभवत होते. तुला फुलातून साकारताना तुझी पूजा बांधत होते. माझे वारकरी दिंडी चालत होते. त्याची सांगता !

आता या चातुर्मासाच्या निमित्ताने मी भागवताचे सार लिहिणार आहे. या माझ्या उपक्रमाला तुझ्या आशीर्वाद असू देत रे विठ्ठला !

रंगा येई वो ये …. रंगा येई वो ये

माझ्या या लेखनात अर्थ भरायला ये. तुला मी आईच्या रुपात बघते.

वैकुंठवासिनी विठाई जगत्रजननी

तुझा वेधु माझे मनी

रंगा येई वो ये ……

माझ्या ह्या लेखणीवर तुझी कृपादृष्टी असू देत.

 

लेखिका : सुश्री उल्का खळदकर

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments