सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ मी आहे आनंदी कावळा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

एका राज्यात एक कावळा असतो. नेहमी आनंदी , हसत ! कुठल्याच प्रकारचे दु:ख, कष्ट त्याच्या चेह-यावरचा आनंद हिरावून घेवू शकत नसतात. एकदा त्या राज्याच्या राजाला ही बातमी कळते .त्याला खूप आश्चर्य वाटते, हे अशक्य आहे, त्याचे मन खात्री देते. मग तो आपल्या शिपायांना त्या कावळ्याला पकडून आणण्याची आज्ञा देतो . कैदेत ठेवल्यावर कसा आनंदी राहील पठ्ठ्या ! राजा मनोमन आपल्या विचारावर खूश होतो …..  कावळ्याला कैद करून महीना लोटतो तरी तो हसतच ! 

राजा बेचैन होतो. ” प्रधानजी, त्या कावळ्याला दु:खी करण्यासाठी काय करता येईल?” 

” महाराज, आपण त्याला काट्यात टाकू या” प्रधान तत्परतेने उपाय सुचवतो.

लगेच राजाच्या आदेशाप्रमाणे शिपाई त्याला काट्यात टाकतात . तिथेही हा आपला आनंदाने शीळ घालतोय….. 

“महाराज, आपण त्याला तापलेल्या तव्यावर टाकू या” राणी दुसरा मार्ग  सुचवते.

दुस-या दिवशी त्याला तापलेल्या तव्यावर टाकले जाते ,पण कितीही चटके बसले तरी त्याच्या चेह-यावरचे हसू काही मावळत नाही….. 

“ते काही नाही महाराज, आपण त्याला उकळत्या तेलात टाकू ” सेनापती पुढची शिक्षा सुचवतात. . 

दुस-या दिवशी भल्यामोठ्या कढईत तेल उकळवून त्यात त्याला टाकले जाते. तरीही कावळा हसतोच आहे.

राजाला भयंकरच राग येतो. मग तो शेवटचा जालीम उपाय करायचे ठरवतो आणि त्या कावळ्याचे पंखच छाटून टाकतो. पंख छाटलेला कावळा क्षीण हसतो आणि कायमचे डोळे मिटतो …

— लहानपणी ही गोष्ट वाचताना खूप गंमत वाटायची. पण आता तिच्यातले मर्म काय ते कळते. आपण आनंदी आहोत , सुखी आहोत, हसत आहोत ही बाबच् नापसंत असणारे किती ‘राजे’ आपल्या अवतीभोवती असतात ना ! कधी आपले जवळचे आप्त, स्वकीय, तर कधी परकीय. तुम्हाला कोणत्या गोष्टीनी त्रास होईल, कशाने यातना होतील, दु:ख होईल ? या गोष्टींचा विचार करण्यात आपली स्वत:ची शक्ती अकारण खर्ची पाडणारे आणि त्यासाठी  विविध युक्त्या योजून त्या अमलात आणणारे  ‘ प्रधान’, ‘सेनापती’ यांची कमतरता नाही. गंमत म्हणजे या अशा योजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक शिपायांची भाऊगर्दीही कमी नाही आणि अशाही सगळ्या परिस्थितीतही आपल्या चेह-यावरचे हसू टवटवीत ठेवणारे ‘आनंदी कावळे’ ही आहेतच !

वास्तविक या जगात प्रत्येकचजण सुखाच्या, आनंदाच्या मागे धावत असतो. जगण्याची ही सगळी धडपड तो एक ‘सुखी माणसाचा’ सदरा मिळवण्यासाठीच चालू असते. तरीही दुस-याचा आनंद का सहन होत नाही आपल्याला ? आनंदाची इतकी संकुचित संकल्पना घेवून जगत असतो आपण की, फक्त मला स्वत:ला मिळाला तरच तो ‘आनंद’; नाही तर नाही. त्या दुस-या व्यक्तीनेही तो क्षणिक आनंद, ते यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात, अनेक त्रास सहन केलेले असतात, दु:ख भोगलेलं असतं; तेव्हा कुठे त्याच्या वाट्याला तो आनंदाचा छोटासा ‘कवडसा’ आलेला असतो, हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही. 

इतरांच्या आयुष्यातील असे अनेक छोटे छोटे कवडसे आपणही तितक्याच आनंदाने उपभोगू शकलो तर आपल्या मनाच्या अंगणभर सुखाचे ऊन सदा हसत राहील, तिथे दु:खाच्या सावलीला जागाच राहणार नाही. सगळ्या जगाचं सोडा हो, आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत तरी हे करून बघायला काय हरकत आहे ?

कोणाचा आनंद कसा हिरावून घेता येईल याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यासोबत आपल्यालाही आनंदी होता येतंय का, हसता येतंय का ते पहायला काय हरकत आहे ?

सुदैवाने भेटलाच एखादा ‘आनंदी कावळा’ तर त्याच्यासोबत चार मुक्त गिरक्या घेऊन बघूया आकाशात.. 

त्याचे पंख छाटून त्याला संपवण्यापेक्षा आपल्या हृदयाच्या खोल खोल कप्प्यात त्याला कायमचा जपून ठेवू या !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments