वाचताना वेचलेले
स्वेच्छानिवृत्ती… लेखक : श्री. विठ्ठल बाबुराव घाडी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई
निवृत्ती शब्द येताच कुणी म्हणाले..
आताच का?अचानक का?
कुणी दबाव आणला का तुझा निर्णय तू घेतला?
निवृत्त होवून पुढे काय करणार?
घरचा कोंबडा बनणार? का जंगलात जाणार?
रोजची गाडी चुकणार, दुपारच्या विविध चवीला तू मुकणार.
हे काय वय आहे?
पोट भरण्याचे साधन काय आहे?
तू काय ठरवलं आहेस?
मनात काय घेवून दूर जात आहेस?
किती प्रश्न!किती व्यथा!
निवृत्ती ही का नवी आहे कथा?
अहो! थांबायचं कुठे आणि कधी हेच तर ठरवलं.
जगण्याच्या धडपडीत हवं ते कुठं मिळवलं?
वृत्त म्हणजे बातमी वार्ता.
गोतावळ्याच्या परिघात अडकलेला कर्ता.
कवितेच्या अक्षरांचा छंद.
तर वर्तनात अडकलेला बंध.
यातून मुक्त होणे म्हणजे निवृत्त.
मोकळ्या हवेत श्वास घेणे म्हणजे निवृत्त.
मनाप्रमाणे धावणे, वागणे म्हणजे निवृत्त.
निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे निवृत्त.
स्वतःला वेळ देत ओळखणं म्हणजे निवृत्त.
छंद जोपसण्यासाठी जगणं म्हणजे निवृत्त.
खरंच का सोप्पं असतं? का निवृत्त हे मृगजळ ठरतं?
एकटेपण खायला येतं का? एकांतात मन दुबळ बनतं?
म्हटलं तर असंच असतं. ठरवलं तर मात्र वेगळं होतं.
मुक्त होऊन मन आनंदात विहरतं
हवं तसं, हवं तेव्हा जगण्याचं स्वातंत्र्य मिळवतं.
बेभान झालं तर मी पणात फुगतं.
जगण्याच्या निखळ आनंदाला मुकतं.
मुक्त होऊन जगताना इतरांच्या मदतीला जे धावतं तेच निवृत्तपण
विश्वप्रार्थनेच्या स्मरणात जगण्याचं नवं तंत्र शिकवतं.
शुभप्रभाती येऊन तोही सायंकाळी निवृत्त होतो..
पुन्हा सकाळी शुभेच्छारुपी वृत्त आपल्या हाती देतो..
लेखक : श्री. विठ्ठल बाबुराव घाडी
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈