श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
वाचताना वेचलेले
☆ वैद्यानां शारदी माता – वैद्य अश्विन सावंत ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆
या सूत्राचा अर्थ असा की वैद्यांसाठी शरद ऋतु हा मातेप्रमाणे असतो. शरद ऋतुमध्ये (म्हणजे ऑक्टोबर हिटच्या उष्म्याच्या दिवसांमध्ये) रोगराई एवढ्या मोठ्या प्रमाणात बळावते की त्यामुळे वैद्य-डॉक्टर मंडळींसाठी तो सुगीचा काळ ठरतो.
वर्षाऋतुनंतर येणारा शरद ऋतु म्हणजे पावसाळ्यातील शीत-आर्द्र (थंड-ओलसर) वातावरणानंतर येणारा उष्ण-दमट वातावरणाचा उन्हाळा. बरं, वातावरणात होणारा हा बदल हळूहळू झाला तरी त्याचा परिणाम तितक्या तीव्रतेने होणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासुन (तुम्हीं-आम्हीं भूमातेची कत्तल चालवली आहे तेव्हापासुन) हा वातावरणबदल अचानक होऊ लागला आहे. काल-परवापर्यंत पाऊस व थंड वातावरण आणि लगेच एक-दोन दिवसात अंगाची काहिली करणारा उन्हाळा!याला काय म्हणायचे? या अचानक होणा~या बदलाबरोबर शरीराने कसे काय जमवून घ्यायचे?
कधी कधी तर दिवसा आकाशात सूर्य तळपत असतो, उकाडा वाढतो,घामाच्या धारा वाहू लागतात आणि अचानक सायंकाळी वारे वाहू लागतात, ढग जमून येतात,काळोख दाटून येतो आणि पाऊस पडू लागतो किंवा रात्री ढग गडगडायला लागतात,विजा चमकू लागतात व धुवांधार पाऊस पडू लागतो. कोणता ऋतु समजायचा हा?दिवसा उन्हाळा-रात्री पावसाळा?
निसर्गात असे विचित्र बदल चोविस तासांमध्ये होत असतील तर शरीराने त्या बदलांबरोबर कसे जुळवून घ्यायचे? वातावरणातल्या या अकस्मात बदलांबरोबर जुळवून घेण्याची शरिराची धडपड म्हणजेच या दिवसात दिसणारे आजार! याचमुळे काश्यपसंहितेने ’ऋतुमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे शरीर-संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत होते असेही म्हटले आहे.
दुसरीकडे जरी पाऊस थांबला तरी शरदात वाढलेली सूर्यकिरणांची तीव्रता वर्षा ऋतुमध्ये ओलसर-गार वातावरणाची सवय झालेल्या शरीराला सहन होत नाही. शरीरातला ओलावा (मोईश्चर) सुर्याच्या उष्णतेमुळे सुकून जातो . ओलावा कमी झाल्याने शरीरातले विविध स्त्राव संहत होतात.पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने पित्त सुद्धा तीव्र होते. एकंदरच शरदातल्या उष्म्यामुळे शरीरात उष्णता (पित्त) वाढून शरीर विविध पित्त विकारांनी त्रस्त होते. त्यात तुम्ही जर उन्हाळा सुरु झाला म्हणून वर्षा ऋतुला (पावसाळ्याला) अनुकूल झालेल्या आपल्या आहारविहारामध्ये अचानक बदल केलात तर तो बदल शरीराला अधिकच रोगकारक होईल आणि या नाही तर त्या पित्तविकाराने त्रस्त व्हाल, त्यात पुन्हा तुम्ही पित्त (उष्ण) प्रकृतीचे असाल तर अधिकच!
शरद ऋतुमध्ये एकंदर शरीराभ्यन्तर परिस्थिती अशी असते आणि लोकांमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात की शरीरामध्ये केवळ पित्ताचा नाही तर पित्ताबरोबरच वात व कफ अशा तीनही दोषांचा प्रकोप होतो की काय अशी शंका येते. वास्तवात हारीतसंहितेने शरद ऋतुमध्ये कधी कधी, काही-काही शरीरांमध्ये वात-पित्त-कफ या तीनही दोषांचा प्रकोप सुद्धा होतो असे म्हटले आहे. तीनही दोषांचा प्रकोप म्हणजे शरीर विकृत आणि विविध रोगांना आमंत्रण.
त्यामुळेच या दिवसांत कुटुंबामधील एकतरी सदस्य काही ना काही आरोग्य-तक्रारीने त्रस्त असतो. म्हणूनच तर शरदऋतु हा अनेक आजार निर्माण करुन वैद्यांना भरपूर रुग्ण पुरवून त्यांना खुष ठेवतो, म्हणून त्याला वैद्य-डॉक्टरांची काळजी घेणारी आई ,या अर्थाने ’वैद्यानां शारदी माता’ असे संबोधले आहे.
( मानवी आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतुचर्या या विषयाची सविस्तार माहिती देणाऱ्या ऋतुसंहिता या वैद्य अश्विन सावंत लिखित आगामी पुस्तकामधून)
संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈