श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
वाचताना वेचलेले
☆ व्यक्त – अव्यक्त….वैशाली ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यामधील महत्वाचा फरक म्हणजे, शब्दांनी समृध्द मनुष्य शब्दांद्वारा आणि शब्दांशिवायही आपल्या भावना व्यक्त करु शकतो. अव्यक्त राहूनही परस्परांना समजून घेणारं नातं खूप छान फुलतं—शब्दांचे खतपाणी घालण्याची फार गरजच नसते.
पण सतत असं राहून चालणार नाही. काही विशिष्ट प्रसंगातच हे योग्य ठरतं.
एरवी वेळोवेळी व्यक्त होणं खूप आवश्यक—नाहीतर मग संवाद संपू शकतो. आणि कुठेतरी गैरसमजाचे बीज नकळतं रोवल्या जातं.
व्यक्त होणा-यांचे ही वेगवेगळे प्रकार असतात. कोणी स्वतःबद्दल काहीच सांगू इच्छीत नसतं—व्यक्तच होत नाही. तर कोणी सतत व्यक्त होत राहतं.—या दोन्ही परिस्थितीमध्ये हवा तसा संवाद शक्यच होत नाही.
संतुलीतपणे व्यक्त होणं ही एक कलाच आहे. कुठे केव्हा किती बोलावं, व्यक्त व्हावं, हे कळणं खूप आवश्यक—-
याचबरोबर व्यक्त कोणासमोर व्हायचं, हे देखील तितकंच महत्वाचं —समोरची व्यक्ती कुठलेही मत न लादणारी, पूर्वग्रह न ठेवता, निरपेक्षपणे ऐकणारी हवी. व्यक्त होणा-याबरोबरच ऐकणाराही प्रगल्भ हवा. तेव्हाच एखाद्या कठीण प्रश्नातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य मिळतं.
व्यक्त अव्यक्त दोहोंमधुन असावा संवाद—
प्रत्येक नात्यामधील मिटेल मग वाद—-
——वैशाली
संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈