सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ जीवन… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं. 

मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, ” काही त्रास नाही ना झाला ?”

सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा यत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं. 

… काही क्षण असेच गेले…

… आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, ” झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ? “

म्लान पाकळ्यांवर मंद स्मित झळकलं. 

… फुल म्हणालं, ” निमिषार्धासाठी वाईट वाटलं.. कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं….  

… पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा…. कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं. 

… पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो, त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो… “

” तू आता स्वतंत्र झालास खरा. पण आता तू क्षणाक्षणाला कोमेजत चाललायस …. आता काय करणार ?” – मातीचा प्रश्न.

दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, ” आता हवा जिकडे नेईल तिकडे मी जाईन… वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असेतोवर जमेल तितके जग पाहून घेईन….. मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन…. पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन. त्या बीजातून अंकुरलेल्या झाडावर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेनच !”

फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले. 

काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली… 

आपलं आयुष्यही असंच आहे.

… संसार, कुटुंब, आप्तेष्ट, मित्र, ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं… 

… मग सुरु होते एका जीवाची एकाकी सफर, जी आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देते. 

… आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, कारण इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं.

… नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतीर्ण होतो ! 

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments