श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ पन्नाशीच्या पुढचा म्हातारा ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
खूप टिकाऊ मासा जसा
चवीला नेहमीच खारट असतो,
तसाच
पन्नाशीच्या पुढचा म्हातारा
थोडा जास्तच चावट असतो!
उजेडाचा त्रास होतो
म्हणून गॅागल वापरत असतो,
काळ्याभोर काचेमागून
“निसर्गसौंदर्य” न्याहाळीत असतो!
शेजारीण आली घरी की
आनंदाने हसत असतो,
बायकोला चहा करायला लावून
स्वत: गप्पा मारत बसतो
कारण
पन्नाशीच्या पुढचा म्हातारा
थोडा जास्तच चावट असतो!
पाय सतत दुखतात म्हणत
घरच्या घरी थांबत असतो,
बाकी सगळ्या दिवशी मात्र
मित्रांबरोबर भटकत असतो!
चार घास कमीच खातो
असं घरात सांगत रहातो
भजी समोसे मिसळपाव
बाहेर खुशाल चापत असतो
कारण
पन्नाशीच्या पुढचा म्हातारा
थोडा जास्तच चावट असतो!
औषधाचा डोस गिळताना
घशामध्ये अडकत असतो,
पार्टीत चकणा खाता खाता
चार चार पेग रिचवत असतो
अध्यात्माच्या गप्पा मोठ्या
चारचौघात झोडत असतो
मैत्रीणींच्या घोळक्यात मात्र
रंगेल काव्य ऐकवत असतो
कारण
पन्नाशीच्या पुढचा म्हातारा
थोडा जास्तच चावट असतो!
पन्नाशीच्या पुढचा म्हातारा आता
निवृत्तीत गेलेला असतो
विरंगुळ्याला जुन्या जुन्या
आठवणीत रमत असतो
म्हटलं तर ज्येष्ठ असतो
तरी बराच तरुण असतो
संपून गेलेलं तारुण्य
पुन्हा आणू पहात असतो
कारण
खूप टिकाऊ मासा जसा
चवीला नेहेमीच खारट असतो
तसाच
पन्नाशीच्या पुढचा म्हातारा
थोडा जास्तच चावट असतो!
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com