प. पू .बाबुराव रूद्रकर !

? वाचताना वेचलेले ?

☆ असा शिष्यवर होणे नाही… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

पुण्यातील धनकवडीचे योगी शंकर महाराज यांनी १९४७ साली समाधी घेऊन आपले प्राण पंचतत्वामध्ये विलीन केले. त्यांच्या भक्तांनी त्या काळात महाराजांचे शरीर पुण्यात सर्वत्र शेवटचे दर्शन करण्यासाठी फिरवले. आणि पदमावतीला आणले. तेथेच जमीन खणून महाराज यांचे शरीर त्या जमिनीत ठेवले. वरून माती टाकली. त्या मातीच्या ढिगाऱ्यावर हार व फुले होती.

जसा जसा अंधार पडायला लागला होता, तसे तसे सर्व भक्त आपापल्या घरी गेले. कारण त्या काळी १९४७ साली त्या धनकवडी भागात सर्वत्र मोठे जंगल होते. त्या जंगलात रानटी कुत्रे, वाघ आणी इतर जंगली प्राणी होते… त्यामुळे ‘ महाराजांची भक्ती करणे वेगळे आणि आपला जीव वाचवणे वेगळे. रात्री या जंगलात थांबणे योग्य नाही. महाराज गेले. त्यांचे शरीर आपण विधीवत पुरले. आता आपले काम झाले. शेवटी आपला पण संसार आहे,’ असा विचार करत हळूहळू सर्व जण निघून गेले.

रात्र झाली. त्या भयंकर जंगलात महाराजांच्या समाधीजवळ त्यांचा एक शिष्य थांबला होता.

त्या शिष्याने विचार केला की, जंगलात रानटी कुत्रे आहेत. रात्री त्यांनी जर महाराजांच्या समाधीवरची माती उकरून महाराजांचे शरीर बाहेर काढले आणि खाल्ले तर?

…आपल्या लाडक्या गुरूच्या शरीराची अशी दुर्दशा व्हायला नको. म्हणून तो शिष्य, तेथून घरी परत गेलाच नाही.

रात्री अनेक वेळा जंगली कुत्री आली. त्या शिष्याने त्यांना दगडी मारून पळवून लावले. तो शिष्य रात्रभर जागत जंगली प्राण्यांना न भिता तेथेच समाधीचे रक्षण करत राहिला… काय त्या शिष्याचे धाडस बघा.

तुम्ही जर फक्त एकच रात्र एकटे एखाद्या जंगलात.. जेथे रानटी कुत्रे व इतर जंगली प्राणी आहेत, त्यांना दगडाने हाकलत काढली तर तुम्हाला कल्पना येईल की, त्या शिष्याने काय धाडस केले होते.

दुसरे दिवशी सकाळी त्याने विचार केला की, आता आपल्याला महाराजांच्या समाधीचे रक्षण करण्यासाठी येथेच कायमचे थांबले पाहिजे. त्याने तसा निश्चय केला. तो तेथेच थांबला.

त्या शिष्याने एक दोन दिवस नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे महाराजांच्या समाधीची राखण करत राहीला.

त्याबद्दल त्याला कोणी दरमहा पगार देत नव्हते. की खायला अन्न ही देत नव्हते. पण त्याला कशाचीच अपेक्षा नव्हती. त्याबद्दल त्याला कोणी पुरस्कार देणार नव्हते की, चार पैसे मिळणार नव्हतेच. पण केवळ गुरू वरच्या अफाट प्रेमासाठी आणि आपल्या गुरूच्या शरीराची जंगली प्राण्यांनी दुर्दशा करू नये म्हणून तो तेथेच थांबला होता.

भूक लागली की, त्या जंगलात दुरवर कोठे तरी चार पाच घरे होती, त्या घरात जाऊन भिक्षा मागायची. ती माणसे जे देतील ते समाधानाने घ्यायचे, आणि परत महाराजांच्या समाधीजवळ यायचे. सात आठ दिवस झाले. इकडे त्या शिष्याची बायको, नवऱ्याला सगळीकडे शोधायला लागली. तिला काळजी पडली की, आपला नवरा घरी का आला नाही? कुठे गेला? ती बिचारी नवऱ्याला शोधत शोधत महाराजांच्या समाधी जवळ आली. तर तिने पाहिले की, आपला नवरा वेड्यासारखा एकटाच त्या समाधीजवळ बसून आहे. तिने नवऱ्याला घरी परत येण्यासाठी विनवले. पण त्या शिष्याने घरी परत यायला नकार दिला.

आपला नवरा आता ऐकणार नाही हे त्या माऊलीच्या लक्षात आले. तेव्हा त्या माऊलीने पण त्याच्याबरोबर  समाधीजवळच राहण्याचा निर्णय घेतला. त्या गुरूवेड्या शिष्याची ती पतिव्रता साधीभोळी बायको, तिने विचार केला की, जेथे माझा नवरा राहील तेथेच मी पण रहाणार.

… ती घरी जाऊन थोडीफार भांडी घेऊन आली. दोघांनी तेथेच छोटीशी झोपडी उभी केली. आणि तेथेच राहू लागले….. आपल्या गुरूच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य आणि त्या शिष्याची काळजी करणारी त्याची वेडी पतिव्रता बायको.

उन्हाळ्यात महाराजांच्या समाधीला ऊन लागू नये म्हणुन त्याने छत्री दिवसभर धरली, तर पावसाळ्यात पाण्याचे लोटच्या लोट यायचे. तेथे त्या काळी भरपूर उतार होता. त्या पाण्याच्या लोटाने समाधीवरची माती वाहून जाऊ नये म्हणून, तो वेडा शिष्य त्या समाधीच्या वरच्या भागावर आडवा झोपायचा. वरून पडणारा प्रचंड पाऊस, वरून वेगाने येणारे पाण्याचे लोट, त्या शिष्याने आपल्या अंगावर घेतले, पण गुरूच्या समाधीला काही होऊ दिले नाही.

…. आणि असे एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे !

काही दिवसांनी महाराजांचे काही शिष्य तेथे समाधीचे दर्शन घ्यायला आले होते. त्यांनी पाहिले की, तो शिष्य समाधीची राखण कशी करत आहे ते? मग त्यांनी एकत्र येऊन समाधीभोवती विटांचे बांधकाम केले. वरून पत्रा टाकला.

हळूहळू काळ बदलला. तेथे जंगल कमी होऊन माणसे रहायला आली.

पंचवीस वर्षानंतर आपल्याला आता जे मंदिर दिसत आहे. ते मंदिर उभे राहिले.

कशाचीच अपेक्षा न करता आपल्या गुरूच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य होता …… 

प.पू .बाबुराव रूद्रकर !

हा लेख जे वाचत आहेत त्यांना पदमावतीचा सातारा रोडवरील महाराज यांची समाधी असलेला मठ माहीत असेल.  पण त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण करणाऱ्या बाबुराव रूद्रकर यांचा ‘ रूद्र शंकर मठ ’  भारती हॉस्पिटलजवळ आहे. हे माहित नसेल.

जी माणसे शंकरमहाराज यांना नावे ठेवतात, त्यांनी या रूद्कर यांच्या पंचवीस वर्षाच्या सेवेचा जरूर विचार करावा. शंकर महाराज हे दिव्य पुरुष होते. त्यांनी खुप चमत्कार केले. ते चमत्कार रूद्रकर यांनी स्वतः पाहिले. अनुभवले. रूद्रकर यांच्या लक्षात आले की, हा माणूस वेडा नाही तर खूप मोठा योगी आहे. यांच्याकडे दैवी शक्तीचे अस्तित्व आहे. म्हणूनच रूद्रकर यांनी शंकर महाराज यांना गुरू मानले. आणि त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण केली.

बाबुराव रूद्रकर यांनी १९८५ मध्ये आपला देह ठेवला.

धन्य ते गुरू शंकर महाराज आणि धन्य ते शिष्य बाबुराव रूद्रकर …. 

असा गुरू होणे नाही..  आणि असा गुरूवर अफाट प्रेम करणारा शिष्यही होणे नाही.

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments