सुश्री प्रभा हर्षे
वाचताना वेचलेले
☆ मोरया… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
“काय आली का सगळी “
एस्.डी. इंडस्ट्रीच्या मालकाच्या घरून आलेल्या गणपतीने विचारलं. लगेच दुसरा म्हणाला “थांबा थोडा वेळ ! झोपडपट्टीतला छोटा गुंड्या मोरयाला सोडतच नाहीय सारखा मोरयाला मिठी मारून ” नको ना जाऊस,” म्हणून जोरजोरात रडतोय. त्यामुळे मोरयाचाही पाय निघत नाहीय.येईलच आता तो. संध्याकाळ होत आली.आता आलच पाहिजे त्याला. तेवढ्यात मोरया गुंडा भाऊला सोडून कसाबसा धावत आला. त्याचे डोळे भरून आले होते. गळ्यात हुंदका दाटून आला होता.सगळ्यानी त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याचं सांत्वन केलं.
“चला रे चांगला मोठा गोल करा” आज विसर्जन झालेले सर्व गणपती एकत्र आले होते.”आता शिदोरी सोडा बरं!” प्रथम मोरयाच्या सुचनेनुसार सगळ्यानी आपापली शिदोरी सोडली.
प्रथम आलेला मोरया म्हणाला.आणि हो! आपापला अनुभव पण सांगा बरं.
सगळ्यांनी गोल करून आपापली शिदोरी सोडली.तळलेले मोदक तर सगळ्यांच्याचकडे होते.पण प्रत्येकाला आलेला अनुभव मोदकांच्या सारणासारखा गोड होताच,असं नाही.शेवटी पदार्थ करणारीच्या भावना पदार्थात उतरतातच नाही का!
प्रथम आलेला मोरया म्हणाला मीच पहिल्यांदा माझा अनुभव सांगतो.
एस्. डी इंडस्ट्रिजच्या मालकाकडचा मी दीड दिवसाचाच पाहुणा होतो.घर कसलं भलामोठा बंगलाच होता तो.जागोजागी श्रीमंती ओसंडून वहात होती. मला बसायला मऊ मखमली आसन.समोर थुईथुई उडणारं कारंज.त्यात पोहणारे हंस.माफक प्रकाश योजना.दारातच चेहर्यावर वैतागलेला भाव असलेल्या,खूप नटलेल्या बाईनं जरा घाईघाईतच माझं स्वागत केलं.तिचं तिच्या नवऱ्याबरोबर भांडण झालं असावं.केवळ नाईलाज म्हणुन मला यानी घरी आणलंय असं मला वाटलं.ना कुणी “गणपती बाप्पा, मोऽऽरऽया” अशी आरोळी ठोकली, ना दणक्यात आरती ना घसघशीत नैवेद्य.ती बया नोकराना सारख्या सूचना करीत होती.”अगदी नैवेद्यापुरतंच करा .आम्ही दोघेही गोड खाणार नाही.” खरं सांगू का, माझातर मूडच गेला. दुसरे दिवशी घरच्या स्वयंपाकीणीनेच चांदीच्या ताटात नैवेद्य दाखवला.तो नैवेद्य माझ्या उंदराचंही पोट भरु शकला नसता.एवढुसाच होता .अगदी बाराच्या ठोक्याला माझ्या हातावर दही ठेवून बोळवण झाली सुद्धा. शिदोरी म्हणून चॉकलेटचे मोदक, विकत आणलेले मला दिले. हे पहा. हा दीड दिवसाचा पाहुणा म्हणजे मी केव्हा एकदा परत जातो असं घरातल्यांना झालं होतं. कामाच्या बायका स्वच्छता टापटीप करत होत्या. स्वयंपाकीण नैवेद्याचे पदार्थ करत होती. नुसतं पाणी फिरवून फक्त नैवेद्य दाखवायलासुद्धा मालकिणीला वेळ नव्हता. अगदी कोरड्या डोळ्यांनी माझी पाठवणी केली रे. फक्त एवढंच गाडीतून गेलो आणि गाडीतून परतलो.बस्स इतकंच .
प्रत्येकाला आपण गेलेल्या घरातला संवाद आठवत होता.
भल्या मोठ्या फोर बीएचके मध्ये राहणाऱ्या गोळे आजी-आजोबांना हौस दांडगी. शरीर साथ देत नव्हते तरीसुद्धा त्यांनी परंपरा सांभाळायची आणि आवड म्हणून म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव केला. दरवर्षीप्रमाणे आजीनी माझ्यासाठी नवीन कुंची शिवून त्यावर मोती लावून ठेवलेली होती. घरात नैवेद्यासाठी डिंकाचे, बेसनाचे, रव्याचे,बुंदीचे, तिळाचे असे विविध प्रकारचे लाडू तयार केलेले होते.अत्यंत हंसतमुखानी त्यांनी माझं स्वागत केलं. मी घरी गेल्यावर मला कुठे ठेवू नी काय काय करू असं त्यांना झालं होतं.गोळेआजी रोज माझी फुलांनी दृष्ट काढायच्या. आजी गजरा घालून छान नटायची.तिच्या नटण्यापेक्षा तिच्या चेहर्यावरचं हंसूच मला जास्त विलोभनीय वाटायचं.आरामात लोडाला टेकून आजी आजोबांचे खुसखुशीत संवाद ऐकताना मला मोठी मजा यायची. आरतीसाठी आपार्टमेंट मधल्या सगळ्या बाळ गोपाळांना जमा करून दणक्यात आरती करायचे. केवळ खाऊ मिळतो म्हणून हे बाळ गोपाळ जमायचे. ना त्यांना आरती यायची ना मंत्रपुष्प. देवघरातली घंटीसुद्धा मुलाना वाजवायची माहित नव्हती.
आजी आजोबानी मनापासून केलेला पाहुणचार मला फारच आवडला. सकाळी सकाळी आजोबा माझ्यासाठी व आजीसाठी चहा करायचे. चहा काय फक्कड करायचे माहिती आहे!.मला चहाचा नैवेद्य दाखवून म्हणायचे.”गणराया,बघ जमलाय का चहा.अरे पृथ्वीवरचं अमृत आहे हे. तिथं स्वर्गात नाही मिळायचं.बघ..
आणखी एक कप हवा का?”आणि खळखळून हसायचे. मग मला नाश्ष्टा त्यानंतर सुग्रास जेवण. असं दोन्ही वेळेला मिळायचं. दोन्ही वेळची आरती अगदी सुगंधी फुलं अत्तर लावून असायची. फार फार आवडलं मला. येताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझा पाय काय घरातून निघेना. मोठ्या प्रेमानं शिदोरी म्हणून 21 तळणीचे मोदक, गुळाचा खडा,पाणी देऊन हातावरास गोड दहीसाखर देऊन त्यानी माझी बोळवण केली. “तझा प्रवास सुखकर होवो.पार्वती मातेला महादेवाना आमचा नमस्कार सांग ” असा आशीर्वादही दिला.ही गोड शिदोरी मी कायम लक्षात ठेवीन . त्यांची मुलं अमेरिकेत ना! मग मलाच मुलगा म्हणून त्यांनी खूप प्रेम दिलं .वाईट इतकंच वाटते की मी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही.
द्रौपदी आजीच्या घरी गेलेला गणपती म्हणाला द्रोपदी आजीना तीन नातीच आहेत. सगळ्या हुशार चटपटीत,आपापल्या कामात एकदम हुशार . द्रौपदी आजी आपल्याला नातू नाही म्हणून त्या नातींचा राग राग करायच्या. त्यांच्याबरोबर माझाही त्यांनी राग राग केला.
म्हणाल्या परंपरा सांभाळायच्या म्हणून तुला आणला. मला एखादा नातू द्यायला तुला काय झालं होतं रे,? नाईलाजाने करतीय मी हे सगळं, लक्षात ठेव!.उद्या कोण बघेल हा संसाराचा पसारा”? मी मनात म्हंटलं आजीबाई “आपण गेलं,जग बुडलं” ही म्हण माहीत नाही का? जे नाही त्यासाठी का रडायचं? तरीही नातीने केलेली सेवा पाहून मला खूप छान वाटलं.
कुलकर्णी कडून आलेला गणपती म्हणाला, “अगदी ऐसपैस स्वागत झालं हं माझं.” सगळ्या जावा भावा एकत्र येऊन माझा उत्सव साजरा करत होत्या. अगदी गोकुळात गेल्यासारखा वाटलं मला.काय तो आग्रह…. जेवायला बोलावलेले गुरुजी जेवून तिथेच कलंडले तरी आग्रह संपेना.झोप म्हणून दिली नाही मला. भजन,पारंपरिक खेळ, हास्यविनोद आणि आरती सुद्धा दणक्यात हो. एक नाही चांगल्या दहा दहा आरत्या म्हटल्या जायच्या. त्यामुळे मला खरोखर झोपायला सुद्धा वेळ मिळाला नाही . त्यांची मोलकरीणसुद्धा खुष होती बर का! सणाचं जादा काम पडणार म्हणून कुलकर्णी वहिनींनी आधीच गणपतीसाठी म्हणून तिला एक हजार रुपये जादाचे दिले होते.मोठ्ठ घर तसं मन ही मोठ्ठ आहे हो त्यांच.त्याही आनंदाने काम करत होत्या. प्रेमाने माझ्याकडे बघायच्या माझी अलाबला घ्यायच्या. खूप खूप मजा आली.
गोखले आजींच्या कडे गेलेला गणपती म्हणाला गोखले आजीना दोन नातीच पण कोण कौतुक त्यांना. दोघी हुशार अभ्यासात तर हुशार आहेतच शिवाय गायन, वादन, नृत्य यातही त्या पारंगत आहेत. काय सुरेख नृत्य केलं त्यांनी. क्षणभर मलाही वाटले की आपणही त्यांच्याबरोबर नृत्य करावं.
पंत वाड्यातून परतलेला गणपती थोडा उदास होता शिसवी महिरपीचा खास गणपतीचा भला मोठा कोनाडा त्यासमोर फळांचा मांडव. चांदीच्या समया पासून सगळ्या वस्तू चांदीच्या. भल्या मोठ्या वाड्यात दोनच व्यक्ती राहतात . मुलं, सुना, नातवंडं सगळी परदेशात. त्यामुळे वाडा अगदी उदास दिसत होता. त्यांनी माझा आगत स्वागत खूप चांगलं केलं, पण उदास वातावरणानं मलाही उदास वाटायला लागलं.घर कायम भरलेलं हवं असं मला वाटलं.
शांतीनगर मधून आलेला गणपती आला तोच मुळी कानात बोटं घालून. आल्या आल्या डोळे मिटून शांत बसून राहिलेला होता. तो म्हणाला काय तो कर्कश आवाज. ते गलीच्छ नाच.ते पाहून केव्हा एकदा आपण आपल्या घरी जातो असं वाटलं मला.कैलासाची,पार्वती मातेची मलाखूप आठवण आली.
एक मोरया म्हणाला मी खरंच भाग्यवान बरं का! खाऊनपिऊन सुखी असलेल्या मध्यमवर्गीय रोकडेंकडे गेलो होतो मी.तिथे बाप लेक अगदी मित्रासारखे वागत होते. सुना हंसतमुख होत्या.नातवंड आजी आजोबांबरोबर दंगा मस्ती करत होते.शुभंकरोती,रामरक्षा म्हणत होती. संध्याकाळी मला नमस्कार करून वडीलधार्यानाही नमस्कार करत होती. फारच छान वाटलं मला.त्या आजी माझ्याशी तासनतास बोलायच्या.नातवंडांना माझ्यासमोर उभं करून म्हणायच्या “मुलानो पाहुण्यांपाशी बसा जरा.बोला त्याच्याशी.कसा आहेस तू,तुला घरची आठवण येते का विचारा त्याला.झोपण्यापूर्वी त्या एकट्या माझ्याशी बोलायला बसायच्या.कुठं दुखतं खुपतं सांगायच्या.मग तोंडभर हंसून आपणच म्हणायच्या “मी कांही मागत नाही हो तुला! मी कुणापुढं बोलणार सांग ना!तेवढंच मन मोकळं झालं . तू सुखी रहा.बरं का म्हणजे आम्हालाही सुखी ठेवशील.हो ना!”
गंमत म्हणून विचारते. आमच्या घरासाठी आम्ही तुझी निवड केली.खूष आहेस ना तू? का तुला अमिताभ बच्चनच्या, तेंडुलकरच्या, आमदार,खासदारांच्या घरात जावंस वाटत होतं??? आम्ही माणसं ना खूप सुंदर ,सुंदर स्वप्नं पाहतो. ती पुरी होणार नाहीत हे माहीत असतं पण ” वचने कीं दरिर्द्रता ” हो की नाही?.स्वप्नंच ती. मग मोठी बघितली म्हणून कुठं बिघडलं? खूप हसायच्या त्या.मला भरपूर शिदोरी दिलीय.मी निघताना सगळ्यांचेच डोळे पाणावले.खूप मस्त वाटलं मला.
पहिला मोरया म्हणाला. खूप छान अनुभव सांगितले सगळ्यानी.असं वाटतं आपण प्रत्येकाची इच्छा पूर्ण करावी.पण प्रत्येकाचं प्राक्तन असतं ना!त्यात आपण देव असूनही ढवळाढवळ करू शकत नाही.
सगळ्यात छोटा आवेकरांकडचा गणपती गंमतीनं म्हणाला.आपलं प्राक्तनतरी कुठं चुकलंय.कुणाच्या घरी आपण जायचं हे आपण थोडच ठरवलं होतं?तसं असतं तर सगळेच लालबागचा राजा झाले असते.यावर एकच हंशा पिकला.
आपण दरवर्षी विविध रुपात पृथ्वीवर जातो.माणसाना आपल्या येण्याने थोडाफार आनंद मिळतो. त्यांचं सुखदुःख ऐकतो.त्यात सामिलही होतो.आपण परत येताना ते म्हणतात.” पुढल्यावर्षी लवकर या “. आपणही एवढंच म्हणूया ….
सर्वे सुखिनः सन्तु……
आणि पुढच्या वर्षाची वाट पाहू या.
लेखक : अज्ञात
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈