श्री सुहास सोहोनी
वाचताना वेचलेले
☆ ‘ळ‘ चा लळा…☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरे. या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.
त्यामुळे अनेकदा ळ चा उच्चार काही लोक सहजपणे ल सारखा पण ल नाही, * ल * व *ळ * च्या मधला करतात. तर काही वेळेस ल करतात. ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.
पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.
भारतातदेखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही.
संस्कृतमधे सध्या ळ नाही. हिंदी, बंगाली, आसामी मधे ळ नाही. सिंधी, गुजराती मधे ळ आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही. मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ळ आहे व वापर भरपूर आहे.
ल व ळ च्या उच्चारातील सारखेपणामुळे ळ च्या ऐवजी ल बोलले लिहिले तर कुठे बिघडते ? असे अनेकांना वाटत असेल कदाचित. हिंदीत कमल व मराठीत कमळ … ल काय , ळ काय..काय फरक पडला?
पण तसे मराठीत होत नाही. ल की ळ यावरून अर्थामध्ये फरक पडतो.
काही शब्द पाहू….
अंमल – राजवट // अंमळ – थोडा वेळ
वेळ time // वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे
खल- गुप्त चर्चा किंवा खलबत्ता मधील खल // खळ- गोंद
पाळ – कानाची पाळ // पाल -. सरडा, पाल वगैरे
नाल.- घोड्याच्या बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी //
नाळ – बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव
कल – निवडणूकीचा कल, झुकाव // कळ – वेदना,पोटातील कळ किंवा यंत्राचे बटण
लाल – लाल रंग // लाळ – थुंकी
ओल – पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा // ओळ – रेघ
मल – शौच // मळ – कानातला, त्वचेचा मळ .. यापासून गणपती झाला.
माल – सामान // माळ – मण्यांची माळ, हार
चाल – चालण्याची ढब .. त्याची चाल ऐटदार आहे वगैरे // चाळ – नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना
दल.- राजकीय पक्ष, संघटना .. जनता दल, पुरोगामी लोकशाही दल //
दळ – भाजी अथवा फळाचा गर , वांग्याचे दळ वगैरे
छल.- कपट // छळ – त्रास
काल – yesterday // काळ – कालखंड वगैरे, मृत्यु
गलका – ओरडा आरडा // गळका – पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे
…. तरी आपली भाषा जपा… इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा.
इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका.
खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,
हिंदीत.खाली म्हणजे रिकामे
मराठीत गाडी रिकामी होते.. खाली होत नाही.
ळ अक्षर नसेल तर पळ वळ मळ जळ तळ .. ह्या क्रिया कशा करणार ?
तिळगुळ कसा खाणार ?.. टाळे कसे लावणार ?.. बाळाला वाळे कसे घालणार ?
चाळे कसे करणार ? .. घ डया ळ नाही तर सकाळी डोळे कसे उघडणार ?
वेळ पाळण।र कशी ?
मने जु ळ ण।र कशी ?.. कोणाला गळ कशी घालणार ?
तळे भरणार कसे ?.. नदी सागराला मिळणार कशी ?
हिवाळा उन्हाळा पावसाळा .. नाही उन्हाच्या झळा.. नाही पागोळ्या
कळी कशी खुलणार ?.. गालाला खळी कशी पडणार ?.. फळा शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा
सगळे सारखे.. कोण निराळा ?
दिवाळी होळी सणाला काय ?.. कड़बोळी पुरणपोळी ओवाळणी पण नाही ?
भोळा सांब सावळा श्याम.. जपमाळ नसेल तर कुठून रामनाम ?
मातीची ढेकळे नांगरणार कोण.. ढवळे पवळे बैल जोततील कोण ?
निळे आकाश , पिवळा चाफा.. फळा फुलानी बहरलेला .. नारळ केळी जांभूळ आवळा
काळा कावळा पांढरा बगळा
ओवळी बकुळी वासाची फुले.. गजरा माळणे होईल पारखे
अळी मिळी गुपचिळी .. बसेल कशी दांतखिळी
नाही भेळ नाही मिसळ.. नाही जळजळ नाही मळमळ
पोळ्या लाटल्या जाणार नाहीत .. टाळ्या आता वाजणार नाहीत
जुळी तिळी होणार नाहीत.. बाळंतविडे बनणार नाहीत
तळमळ कळकळ वाटणार नाही.. का ळ जी कसलीच उरणार नाही..
.. पाठबळ कुणाचे मिळणार नाही
* ळ * जपा .. !
मराठीचे सौंदर्य जपा…!
“ ळ “ शिवाय सगळेच * बळ * निघून जाईल आणि काहीच कळेनासे होईल..!!
” कळलं ” ??
संग्राहक – सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈