वाचताना वेचलेले
☆ रिटर्न गिफ्ट – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
आताशा कनेक्ट होणं शिकलेय मी. नव्हे, फारच एन्जॉय करतेय म्हणा ना हवं तर.आणि हो. या कनेक्ट होण्याच्या खेळात सुरेख रिटर्न गिफ्ट पण मिळतं ते वेगळंच.
आता म्हणाल, हे काय नवीन?
खूप सोप्पंय हो हे सगळं.
‘मॉर्निंग वॉक’ला जाताना प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेल्या फुलांच्या गालिच्यातील नारंगी देठ असलेली दोन शुभ्र फुलं हलकेच हातावर घेऊन नाकाजवळ नेली.त्यांचा सुवास थेट मनाला भिडला आणि कनेक्ट झाले मी त्यांच्याशी!
माहीत नाही, कशा कोण जाणे,मस्तिष्कातून मनापर्यंत चेतातंतूनी संवेदना वाहिल्या आणि पुढचे चार पाच तास त्या परिमलाने दरवळून टाकले.
मिळाले नं मला रिटर्न गिफ्ट…!
अशा शेकडो गोष्टी होत असतात; चांगल्या वाईट.
आपल्या सभोवताली. फक्त आपल्याला कनेक्ट होता आलं पाहिजे. बस्स!
परवा कामवाली सुजलेले डोळे आणि रडलेला चेहरा करून आली कामाला. तिच्या डोळ्यात पाहिलं तर नजर चुकवली तिने. काहीच न बोलता वाफाळलेला चहाचा कप आणि दोन बिस्कीट ठेवली तिच्या समोर, तशी चहाचा घोट घेत मोकळी झाली. मनात साचलेली सल बाहेर निघाली.
तिच्याशी कनेक्ट होताना हलकेच माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण जातांना हसून “येती व्ह ताई,”म्हणून माझं रिटर्न गिफ्ट मला देऊन गेली.
बरं या कनेक्ट होण्याला जात, पात, धर्म, वर्ण, शिक्षण, सुबत्ता, सुंदरता या कशाचीही गरज नसते. फक्त लागते ती मनाची थोडी वेगळी मांडणी.
खेड्यातून शहरात आलेली मी, रमते थोडी गावाकडच्या वातावरणात. मग आठवडी बाजाराच्या दिवशी कधी मावशी, कधी मामा तर कधी दादा भेटतो त्या अनोळखी माणसांच्या गर्दीत. “कश्या आहात मावशी..?” एवढे दोनच शब्द पुरतात कनेक्ट व्हायला!
मग त्या गर्दीतून कुठूनतरी आवाज येतो, “ताई मेथीच्या ताज्या जुड्या ठेवल्यात गं.घेऊन जा.”
बळेच कडीपत्त्याच्या चार काड्या, भरलेल्या भाज्यांच्या पिशवीत खोचतात कोपऱ्यात बसलेले आजोबा, तर माप झाल्यावरही एक पेरू हलकेच सरकवत, “ठिवा ओ ताई लेकरांना.” म्हणणारा मामा सापडतो, घरी परतताना पिशवीसारखं मनही भरून जातं!
मुलांच्या क्लासबाहेर त्यांची वाट पाहत थांबलेले असतो आपण, मधूनच आठ दहा मुलांचा घोळका गोंधळ घालत येतो बाहेर. हसी मजाक, आरडाओरड, एकमेकांना चिडवत स्वतःतच रमलेली असतात ती.
हळूच आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो अन् मनाच्या कोपऱ्यातील आपला ब्लॅक अँड व्हाइट कॉलेज कट्टा समोर येतो, नकळत त्या कट्ट्यावर चहाचा ग्लास घेऊन आपण बसतो. मग आपोआपच हात मोबाईल कडे जातो.
जुन्या मैत्रिणीचा नंबर डायल केला जातो. मग तासभर झालेल्या गप्पांमध्ये आपणही वय विसरून त्या घोळक्यातील एक होऊन जातो. मग पुढचे कित्येक दिवस हे रिटर्न गिफ्ट सांभाळतो आपण.
आयुष्य तेवढं रटाळ नक्कीच नाही.थोडंसं हरवून बघा.काढून टाका हा ‘शहाणपणाचा मुखवटा’.थोडे वेडेच व्हा कधीतरी.
म्हणजे बघा.
ऑफिसमधून घरी परतताना पार्किंगमध्ये खेळणाऱ्या मुलांसोबत फुटबॉलला किक मारून बघा आणि उडवून टाका सगळ्या चिंतांना.
कधीतरी चाखून बघा थंडगार आईस-गोळा. लागू द्या तो नारंगी, लाल, पिवळा, हिरवा रंग ओठांना.
नकाच राहू एक दिवस टापटीप.होऊ द्या केसांना अस्ताव्यस्त, घाला तोच घळघळीत पण मनाला रिलॅक्स करणारा जुना ड्रेस.
वाचत पडा एखादं सुंदर पुस्तक आणि भिडू द्या मनाला बॅकग्राऊंडमधील लतादीदींच्या सुरेल सूर.
नाटक पाहताना आवडलेल्या एखाद्या डायलॉगला उठून दाद देऊन पाहा.
जगून पाहा एखादा उनाड दिवस आपल्या स्वतःसाठीच!
आवडली का कल्पना कनेक्ट होण्याची?
तर सुरू करा मनाचा योगा मग बघा किती सुंदर सुंदर रिटर्न गिफ्टस् मिळतात ते.
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈