वाचताना वेचलेले
☆ बाॅन्ड (Bond) – सुश्री नेहा बोरकर देशपांडे ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर ☆
#प्रिय_आईस,
वर्ष झाले ना …. मी घरापासून लांब राहतोय …
खरं सांगायचं तर मला सुरुवातीला सगळं समजून घ्यायला म्हणजे कॉलेज, हॉस्टेल ,नवीन शहर ,नवे सोबती…. वेळ लागला…. त्यामुळे घरची आठवण येत नव्हती असं काही नाही. पण बाकीच्या उठाठेवीच खूप होत्या.
खरंच खूप चांगले आहे इथे.. अभ्यास आहे… वातावरण छान आहे मित्रांच्या पण अजून जवळून ओळखी होतात.
तू मला नक्कीच खूप मिस करत असशील ना…. आणि बाबा पण….
तू कशी आहेस? मलाच हसू येतंय…. की मी हा प्रश्न विचारतोय ! तुझ्यावर हसणारा.. काहीवेळा ओरडणारा … चिडणारा…
पण आज खरंच मनापासून वाटलं म्हणून विचारलं गं…. बरी आहेस ना तू….
परवा काय झालं अगं…. रूमवरच्या मित्राला जरा बरं वाटतं नव्हतं… म्हणून त्याला इंडक्शनवर मस्त गरम पाण्यात आलं उकळून लिंबू मीठ घालून गरमच प्यायला सांगितले….त्याच्यापुरती थोडी तुपावर डाळतांदुळाची खिचडी केली… त्याला खूप बरं वाटलं…. तरतरीत झाला तो..
सगळ्या नव्या मित्रांच्यामध्ये मी एकदम हिट झालो….. तेव्हा माझी कॉलर टाईट…. तेव्हा तू हवी होतीस….मला घरी तू सगळं करायला शिकवायचीस…. कधी कंटाळा करत तर कधी उत्साहात मी पण शिकलो. पण त्याचा असा कोणाला कधी उपयोग होईल वाटलंच नव्हतं… केलेलं कधी वाया जात नाही, तू म्हणतेस ना…. पटलंच एकदम…
कामावी तो सामावी असं तू म्हणतेस ना…. सगळ्या मित्रांना मदत पण करतो ……
घरी किती ओरडायची गं मला …. पण त्याचा उपयोग इथे होतो…. कसा माहीतेय…… माझं लवकर आवरून होतं…. कपाट नीट असतं…. अगदी वापरलेले सॉक्सपण रात्रीच भिजवून सकाळी आंघोळ करताना धुवून टाकतो….. बाकीचे मित्र म्हणतात … अरे आम्हाला पण आठवण करत जा ना….. तेव्हा तू आठवतेस……
मी चिडायचो तुझ्यावर सारखी भुणभुण करते म्हणून. पण तू म्हणायचीस….. बाहेरच्यांनी कोणी तुला बोललेलं मला चालणार नाही…… अगदी त्या श्यामची आई पुस्तकातल्या प्रमाणे….
फोनवर इतकं बोलता आलं नसतं गं… ..म्हणून आज हे पत्र…..
आज पासून घरून आणलेले पांघरुण मी वापरणार आहे…. इतके दिवस बाकीचे हसतील , मला कमकुवत समजतील म्हणून वापरत नव्हतो…. पण आता नाही… परिक्षा संपली की येईनच…. तू आतापासून तयारीला लागू नको काय….. मी परत फोन करेन….
अभ्यास करतोच आहे…..
आता घरी आल्यावर इथल्यासारखं वागायचा प्रयत्न करीन….. पण मग तुझा ओरडायचा कोटा पूर्ण कसा होणार….. ?
ओरडण्याचा आवाजच तर मला परत येताना साठवून ठेवायचा आहे …. कानात, मनात, ह्रदयात…..
बाबांना सांग…..
दोघे भांडू नका…..
मी आल्यावर काय करशील खायला?……
त्याची लिस्ट व्हाट्सअप करतो?
ए आई, आणि व्हिडिओ कॉल लावू नको गं…..
चल बाय– खूपच सेंटी होतोय मी……
काळजी करु नकोस…..
फक्त तुझाच
(अजून तरी??)
ले.: नेहा बोरकर देशपांडे
(नव्याने बाहेरगावी शिकायला गेलेला मुलगा. आईला तर वाटणारचं…. पण आज मुलाची बाजू मांडायचा प्रयत्न केला आहे. )
…. कशी वाटली जरूर सांगा….
संग्राहक : संजय जोगळेकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈