वाचताना वेचलेले
☆ अन देवी प्रसन्न हसली… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
तिने परत एकदा आरसा
न्याहाळला, नथ पक्की दाबली
आणि पदर सावरून
ती हॉल मध्ये आली.
तो सुद्धा कुर्ता घालून तयार
होऊन बसला होता.
“अरे व्वा …!!
सुरेख तयार झाली आहे गं ..!!
लग्नानंतरचं पहिलं नवरात्र म्हणून यावर्षी मी खास ही
गर्भरेशमी पैठणी आणली आहे देवीसाठी.
यानी ओटी भर बरं का.
बाकी तांदूळ, नारळ आणि
ओटीचं सगळं सामान या
पिशवीत ठेवलंय.
जोड्याने जाऊन या दर्शनाला.”
सासूबाई नव्या सुनेला म्हणाल्या.
त्यांच्या उत्साहाचं तिला कौतुक वाटलं.
दोघे मंदिराजवळ पोहोचले
तेव्हा ओटी भरायला आलेल्या
बायकांची चांगलीच गर्दी झाली
होती. शिवाय पुरुषांची पण
दर्शनाची वेगळी रांग होती.
तिला रांगेजवळ सोडून तो
गाडी पार्क करायला गेला.
रस्त्याच्या कडेला फुलांची,ओटीच्या
सामानाची बरीच दुकानं होती,
तिने आठवणीने सोनचाफ्याची वेणी
देवीसाठी घेतली,
तिच्या घमघमणाऱ्या गंधाने
तिला आणखीनच प्रसन्न वाटलं.
तिने स्वतःच्या केसात चमेलीचा
गजरा माळला. हिरवाकंच चुडा
सुध्दा तिने ओटीच्या पिशवीत
टाकला.
एव्हाना तोही दर्शनाच्या रांगेत
सामील झाला होता.
ती ओटी भरणाऱ्या बायकांच्या
रांगेत जाऊन उभी राहिली.
आई सोबत लहान पणापासून
नवरात्रीत देवीच्या दर्शनाला ती
नेहमी जायची. तिथल्या गर्दीचा
कंटाळा यायचा खरं तर.
पण वर्षातून एकदाच गावाबाहेरच्या
देवीच्या मंदिरात तिला जायला
आवडायचं सुध्दा.
ती आईला म्हणायची,
“आई या मंदिरात ओटीच्या
नावाखाली किती कचरा
करतात गं या बायका.
देवीला पण राग येत असेल बघ.
तिचा चेहरा नं मला वैतागलेला
दिसतो दरवर्षी.”
आई नुसती हसायची.
आईच्या आठवणीत ती
हरवून गेली थोडा वेळ.
तेवढ्यात आपला पदर कोणीतरी ओढतअसल्याचं
जाणवलं तिला.
काखेला खोचलेलं पोर घेऊन एक डोंबारिण तिला पैसे मागत होती. रस्त्याच्या पलीकडे डोंबाऱ्याचा खेळ रंगात आला होता. म्हणून त्याची बायको पैसे मागत मागत रांगेजवळ आली होती. तिने अंगावर
चढवलेला ब्लाऊज आणि
परकर पार विटलेला,
फाटलेला होता .
तिच्या मागे उभी असलेली
बाई तिच्यावर खेकसलीच,
“एऽऽऽऽ, अंगाला हात लावू नको गं.”
तिने पैसे काढेपर्यंत डोंबरीण पैसे मागत बरीच पुढे निघून गेली.
हळूहळू रांग पुढे सरकत होती.
आता तिची सात आठ वर्षाची मुलगी सुद्धा येऊन पैसे मागत होती.
शेवटी एकदाची ती
गाभाऱ्याच्या आत जाऊन
पोहोचली.
पुजारी खूप घाई करत होते. तिने पटकन समोरच्या ताटात
पिशवीतली पैठणी ठेवली,
मग घाईने तिने त्यावर नारळ ठेवले, त्याला हळद कुंकू लावून तिने ओटीचे सगळे तांदूळ, हळकुंड , सुपारी, बदाम ,खारका,
नाणे ओंजळीने ताटात ठेवले.
पुजारी जोरजोरात
“चला, चलाऽऽऽ ….” ओरडत होते.
देवीच्या उजव्या बाजूच्या
कोपऱ्यात नारळाचा खच पडला होता, तर डाव्या बाजूला पुजारी ओटीच्या साड्या जवळ जवळ
भिरकावत होते.
एवढ्या गोंधळात तिने देवीच्या मुखवट्याकडे क्षणभर पाहिले,
आजही तिला देवी त्रासलेली वाटत होती.
मग हात जोडून ती ओटीचं
अख्खं ताट घेऊन बाहेर आली. आणि तिने मोकळा श्वास घेतला.
तोसुद्धा दर्शन घेऊन तिच्या
जवळ आला. “काय गं?
ओटी घेऊन आलीस बाहेर ?”त्याने विचारलं.
“तू थांब इथे.
मी मला दिसलेल्या देवीची
ओटी भरून येते.”
असं म्हणून ती ताट घेऊन
भराभर पायऱ्या उतरून खाली रस्त्यावर आली,
झाडाच्या सावलीत आडोशाला तिला डोंबारीण दिसली,
तिच्या बाळाला ती छातीशी घेऊन पाजत होती.
“दीदी, हलदी कुमकुम
लगाती हूं आपको.”असं म्हणून तिने तिला
ठसठशीत कुंकू लावले.
ताट बाजूला ठेवून तिने
तिची ओटी भरली.
सोबत सोनचाफ्याची वेणी
आणि हिरव्या बांगड्यांचा चुडापण दिला. मग तिने तिला नमस्कार केला.
डोंबारणीचं पोर तिच्या कुशीत झोपून गेलं होतं.
तेवढ्यात तोही तिथं आला
आणि त्याने फळांची आणि खाऊची पिशवी तिच्या हातात दिली. ती म्हणाली,”ये लो दिदी, छोटू और उसकी बहन
के लिये.”डोंबारीण परत एकदा डोळ्यांनी हसली.
ती पैठणीवरून हळुवारपणे हात फिरवू लागली.
तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव वेचून ती दोघं परत मंदिरात आले.
आता गर्दी बरीच कमी झाली होती. गाभाऱ्यात जाऊन दोघांनी डोळे भरून देवीचे दर्शन घेतले.
तिला आता देवीचा मुखवटा खूप प्रसन्न वाटला.
इतक्यात गाभारा
सोनचाफ्याच्या गंधाने दरवळून गेला. त्या दोघांच्या पाठीमागे
डोंबारीण तिच्या मुलांसोबत आणि नवऱ्या सोबत पैठणी
गुंडाळून , हिरवा चुडा आणि
वेणी घालून देवीचं दर्शन
घ्यायला आली होती.
देवीचा मुखवटा तेजाने
आणखीनच उजळून
निघाला होता.
लेखक – अज्ञात
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈