? वाचताना वेचलेले ?

☆ “भांडणशास्त्र…” – लेखक :श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त फुकट गेलेला वेळ कोणता? तर निरर्थक, हेतुशून्य, आणि फक्त ‘मी’ ( ! ) जपण्यासाठी भांडणात घालवलेला.

हो. हेसुद्धा शास्त्र आहे,प्रशिक्षण आहे. जगाच्या शाळेत आपण ते शिकतो.एक भांडण आपलं नियतीशीसुद्धा सुरूच असतं, आतल्या आत.पद्धत चुकली की आपण चुकतो आणि जीवनाची रहस्ये कायम गूढच रहातात. उत्तरं न मिळता नियतीशी झगडण्यातच सगळं आयुष्य निघून जातं.

संतपदाला पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही. सॉक्रेटीसच्या बायकोने एकदा चिडून त्याच्यावर पाणी फेकलं. यावर तो म्हणाला,

“जरा जास्त तरी फेकायचेस. अंघोळीचं काम झालं असतं.”

लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचा वाद सुद्धा एक आदर्श उदाहरण आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचं ‘स्मृतीचित्रे’  वाचलं तर लक्षात येईल की तापट व्यक्तीसोबत भांडण टाळणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे,कौशल्य आहे.हे शिकून झालं, असं कधीच नसतं. आपण आयुष्यभर शिकतच असतो.

भांडण करताना काही नियम पाळले, तर आपलं जगणं सोपं होऊ शकेल.मनाला हे नियम पाळण्याची सक्ती करा.कुठेतरी लिहून ठेवा पण काहीही करून या नियमांना अनुसरूनच भांडण करायचे, हे आधी पक्कं करा.

सर्वात पहिला नियम म्हणजे मूळ मुद्दा,विषय सोडायचा नाही.आज, आत्ता समोर असणाऱ्या समस्येपुरतंच बोलायचं. भूतकाळ, भविष्यकाळ नकोच, विधाने करायची नाहीत. म्हणजे ‘तू नेहमी …, तू … ने सुरु होणारी वाक्ये टाळायची.नातेवाईक, मित्रमंडळी यांचे उल्लेख वेळ वाया आणि प्रकरण हाताबाहेर घालवायचेच असेल तरच करायचा.आपण भांडण करताना सुंदर दिसत नाही, हा विचार केला तरी संयम येईल.

प्रश्न सुटला पाहिजे हा हेतू हवा आणि भविष्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तो सुटला पाहिजे ही तळमळ हवी.सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका विषयावर एकदाच भांडायचं. पुन्हा कधीच नाही,वेळ आणि शक्ती वाया जाऊ द्यायची नाही हे मनात पक्के हवं.

आपल्या सगळ्या संस्कारांचा, वाचनाचा, शिक्षणाचा कस लागतो तो याच परीक्षेत.त्यामुळे हे शिकलंच पाहिजे.यशस्वी व्यक्ती,आपले आदर्श हे टीकेला किंवा नकारात्मक वर्तणुकीला कसा प्रतिसाद देतात, याचं खरंच सूक्ष्म निरीक्षण करायला हवं. यासाठी चरित्रे,आत्मचरित्रे वाचता येतील.

आपल्या नकळत आपण अनुकरण करत असतो आपल्या आई वडिलांचे, मोठ्यांचे, समाजाचे.सतत जिंकणारे,शब्दात पकडणारे काही  हुन्नरी कलाकार या क्षेत्रात पहायला मिळतात.यांची स्मरणशक्ती दांडगी असते. शब्दांचे अचूक अर्थ यांना माहीत असतात.नवखे तर गोंधळून जातात यांच्या समोर.हे मात्र जिंकूनसुद्धा आतल्या आत हरलेले असतात. कारण कधीकधी जिंकण्यापेक्षा जे गमावलेले असते तेच मौल्यवान सिद्ध होते.

एकदा एका नवरा बायकोचं भांडण झाले.दोघांनी दोन कागद घेतले आणि एकमेकांचे दोष लिहायचे ठरवले. लिहून झाल्यावर बायकोने दोषांचा कागद वाचून दाखवला.आणि नव-याने तिच्या हातात कागद दिला त्यावर फक्त लिहिलं होतं,

… But I like you.

कधी कधी ‘हारके जितनेवाले बाजीगर’ असतात ते असे.

जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम,

फिर नहीं आते … हेच खरं !

असं म्हणतात की एखादा माणूस गेल्यावर आपण कधी कधी रडतो. ते तो गेला म्हणून नाही तर तो जिवंत असताना आपण त्याच्याशी किती वाईट वागलो, ते आठवून! अशी वेळ येऊच नये यासाठी हा अट्टाहास.

लेखक :श्री. विकास शहा

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments