वाचताना वेचलेले
☆ क्षण आनंदाचे – लेखिका : सुश्री माधुरी संजीव कामत ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
थंडी सुरु होऊन तापमान २१..२२..२३ असं रूंजी घालू लागलं की बाजारात हिरव्यागार भाज्यांचे दर्शन व्हायला लागतं. ताज्या ताज्या पालेभाज्या तर दिसतातच, पण रसरशीत फळभाज्यांचे पण ढीग दिसू लागतात… या ढिगांवरून फक्त नजर जरी फिरली ना तरीही मनाला शांती मिळते.
आणि
नेहमीच्या फळभाज्या तर मिळतातच पण अनेक प्रकारच्या हंगामी भाज्या जसे की वेगवेगळ्या प्रकारचे घेवडा, वालपापडी,डबल बिन्स.
अगदी हिरव्या हिरव्या गार रूपात आपल्याला दिसतात.
आज आमच्या घरी हंगामाची पहिली डबल बिन्स आणली आणि सोलायला सुरुवात केली. सुंदर गुलाबी रंग पाहून डोळे निवले. मनाला तरतरी आली.
आणि
एका शेंगे मधून “ती” सळसळत बाहेर आली.
एक क्षण दचकायला झालं.पण “तिचा” उत्साह बघून थक्क व्हायला झालं.
“तिचं” नजाकतीने चालणं, नव्हे नव्हे, वळवळणं.एकदम लाजवाब.
मी पहातच राहिले. दोन क्षण.
भानावर येताच लक्षात आलं की “ती” टेबलाच्या टोकाला पोचली आहे.
पटकन दोन पानं आणली आणि “तिला” आसन करून दिलं.
आता “ती” छान आसनस्थ झाली.
नवीन आसनाचा अदमास घेऊ लागली.
आणि लगेचच तिथे रूळली पण !
आनंदाने पानं खाऊ लागली.
“तिचा” आनंद मी डोळे भरून पहात होते.
आणि
मनात आलं.
खरंतर “तिचा” आनंद क्षणभंगुरही ठरला असता. कारण तो आनंद माझ्या हातात होता.
तरीही आनंदाचे क्षण किती, हा विचार न करता आनंद आहे, हा विचार करून “तिने” पानं खायला सुरुवात केली होती.
आणि
मी “तिच्या”कडे पाहतच बसले.
आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला केवढा वेळ लावतो. किंबहुना बाहेर यायला उत्सुक नसतोच.
आणि
अगदी बाहेर आलो तरी नवीन ठिकाणी,नवीन परिस्थितीत रुजायला कित्येक दिवस,महिने लागतात. नाही का ?
“ती” एवढीशी “अळी” मला जीवनाचं तत्त्वज्ञान देऊन गेली.
कुठल्याही परिस्थितीत आनंदी रहा ग.न कुरकुरता.
आनंद किती मोठा आहे, याचा विचार न करता, आनंद मिळाला आहे, याचा विचार करून तो मस्त उपभोगून घे.
आणि
कुठल्याही परिस्थितीत सगळीच दुःखं नसतात. त्या दुःखाच्या पलीकडे असलेल्या चिमूटभर सुखाला शोधायचा प्रयत्न कर.
बघ कसा आनंद मिळतो ते.
लेखिका : सुश्री माधुरी संजीव कामत
संग्रहिका : सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈