? वाचताना वेचलेले ?

☆ फॉल-पिको… – लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

आज योगासनांचा क्लास जरा लवकरच संपला.

थंडी मुळे सगळ्या गारठून गेल्या होत्या.

सकाळी सातच्या बॅचला सगळी young generationची गर्दी आणि दहाच्या बॅचला सिनियर सिटीझन मंडळी.या बॅचला येणा-या सगळ्या पन्नाशीच्या पुढच्या.योगासने कमी आणि गप्पा टप्पा जास्त.

प्रत्येकीच्या काही ना काही शारीरिक तक्रारी. तरीही मानसीताई सगळ्यांना छान सांभाळून घेऊन प्रत्येकीकडून योगासने करवून घ्यायच्या.आज थंडी जरा जास्तच होती.त्यामुळे ब-याच जणींनी दांडी मारली.

नेहमीच्या सात आठ जणी हजर होत्या.

मानसी ताईंचे घर खालीच होते.

आज सगळ्यांना गरमागरम चहा आणि पॅटीस‌ ची मेजवानी मिळाली.आज गप्पांचा मूड होता.काणे काकू थोड्या अबोल वाटल्या.

“का हो काकू,आज अगदी गप्प गप्प?”मी विचारले.काणे काकू म्हणाल्या, “काय सांगू ?काल घरात पार्टी होती.रात्री जेवायला, झोपायला उशीर झाला.यजमानांना आताशा कलकल सहन होत नाही.तरीही मुलाने आणि सुनेने,आम्हाला कमीतकमी त्रास होईल याची खबरदारी घेतली होती. सगळेच जण बरेच दिवसांनी भेटल्यामुळे गप्पांना ऊत आला होता. संजय स्मिताने आम्हाला आधीच सांगितले होते,’आई बाबा,तुमची वेळ झाली की तुम्ही जेवून घ्या, आम्हाला उशीर होईल’.यांचा स्वभाव तिरसट.मी इतकी वर्षे सहन केले.सगळ्या मित्रांसमोर यांनी संजयला विचारले, ‘तुमचा थिल्लरपणा कधी संपणार आहे?मला आवाजाचा त्रास होतोय.’

संजयने शांतपणे सांगितले,’बाबा,अजून एक तासभर.अकराच्या आत सगळे आपापल्या घरी जातील.’ यांची आत धुसफूस सुरूच होती.

मी लक्षच दिले नाही. मला माझ्या मैत्रिणीचे वाक्य आठवले. ती म्हणायची, ‘हे बघ असे प्रसंग येत राहतातच. आपण तोंडाला ‘फॉल-पिको’ करायचे. वादाचा प्रश्नच येत नाही.’

किती छान सांगितले तिने. मला तो शब्द फारच आवडला.

तिच्याही घरी हाच प्रकार आहे. सून चांगली आहे, सास-याचे त-हेवाईक वागणे सहन करते.

कधी तरी शब्दाला शब्द वाढतोच. पण ‘फॉल पिको’मुळे, सारं काही आलबेल आहे.”

काणे काकूंनी सांगिलेला फॉल-पिकोचा मंत्र सगळ्यांना जाम आवडला.

मानसी ताई म्हणाल्या, “हे बघा, घरोघरी कमी अधिक प्रमाणात हे असं असतेच,गोष्टी जेवढ्या ताणल्या जातील तेवढे ताण तणाव वाढत जातात.करोना काळापासून सर्व नोकरदार मंडळी चोवीस तास घरात आहेत,यापूर्वी याची सवय नव्हती.करोनाने प्रत्येकाला माणूसकी आणि नात्यांची किंमत दाखवून दिलीय.

तुझं माझं, हेवे दावे या सगळ्यांच्या पलीकडे माणुसकीचा अर्थ चांगलाच समजलाय आपल्याला.तेव्हा सर्वांनी सलोख्याने वागा, प्रेम-माया यांची देवाण घेवाण एका रात्रीत होत नसते. तरूण पिढीला मानसिक ताण तणाव, त्यांची टार्गेटस्, बॉस लोकांची मर्जी, किंवा हाताखालील सहकाऱ्यांना, जिभेवर साखर ठेवून संभाळून घेणे इ. ब-याच गोष्टींना सामोरे जावे लागते. तुम्ही सगळ्या बॅचला येता. आपली सुख-दु:ख एकमेकींबरोबर शेअर करता,‌तासभर नवीन ऊर्जा घेऊन घरी जाता.

घरी देखील असंच खेळीमेळीचे वातावरण ठेवा.या आधीच्या बॅचच्या सगळ्यांना मी नेहमी हेच सांगते.त्यातल्या काही जणींना सुना/जावई येऊ घातल्या आहेत. पेराल तसे उगवते,म्हणतात ते अगदी बरोबर आहे.जीभेवर साखर ठेवा.योग्य वेळी संसारातून अलिप्त व्हा,पण वेळेला त्यांना समज,सल्ला अवश्य द्या.

आणि क्षमाचा फॉल-पिकोचा मंत्र, मला पण खूप आवडला.

तेव्हा काणे काकू,घरी गेल्यावर हा मंत्र जपा.” सगळ्यांनी मानसी ताईंच्या बोलण्याला खळखळून हसत दाद दिली.

लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments