श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “शांता…” – लेखिका : श्रीमती जयश्री दाणी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मी शांता. नाही ना ओळखले? श्रीरामाची थोरली बहीण. अवघे रामायण श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीतेच्या विविध कथातरंगांनी व्यापले असताना माझा उल्लेख तिथे कुठेच आढळत नाही. अर्थात मला अनुल्लेखाने मारणे हा कुणाचाच उद्देश नव्हता. मी होतेच तशी अदृश्य. गुप्त. अयोध्येत अनोळखी.
माझी ओळख फक्त कौसल्यामातेच्या हृदयात जागी होती. कदाचित तातही मला पदोपदी स्मरत असतील. मी त्यांची पहिली लेक ना! कसे अलगद मला ओटीत टाकून दिले दोघांनी वर्षिणी मावशीच्या. अंगदेश नरेश रोमपाद आणि राणी वर्षिणीला अनेक वर्षे लोटली तरी अपत्य झाले नाही. माता कौसल्येच्या भेटीला दोघे आले असता माझ्या अवखळ बाललिलांनी त्यांचे मन मोहून गेले.
” मला तुझी ही देखणी, मेधावी सुपुत्री देशील का?” माता वर्षिणीने केविलवाण्या आसुसलेल्या स्वरात विचारले. कौसल्या मातेचे मन द्रवले. तिने आणि तात यांनी क्षणात मला दत्तक देऊन टाकले. मला विचारायची गरज नसेल का भासली? कधीतरी पुढे मेंदूत असे विचार येऊनच गेले की माझ्याजागी जर पहिला पुत्र असता तर त्याला इतक्या सहजासहजी दत्तक दिले असते?
अंगदेश नरेशांनी मला प्रेमाने वाढवले. वेदविद्या, शिल्पकलेत निपुण केले. पण मी कन्या असल्याने तिथेही मला राजपद सांभाळायचा अधिकार नव्हता. एकदा तात रोमपद आणि माझा सुसंवाद सुरू असताना एक गरीब ब्राह्मण शेतीची समस्या घेऊन आला. तात यांचे थोडे दुर्लक्ष झाले त्याच्याकडे. दुखावलेल्या ब्राम्हणाने देश सोडला. इंद्रदेवांना ते सहन झाले नाही आणि त्यांच्या क्रोधाने अंगदेशात दुष्काळ पडला.
अस्वस्थ मातापिता ऋषी श्रृंग यांच्याकडे गेले. ऋषीवर्यांनी सांगितलेल्या उपायाने अंगदेशाची भूमी पुन्हा हिरवीगार झाली. प्रसन्न पित्याने माझा विवाह ऋषीदेवांशी लावून दिला. कालांतराने राजा दशरथ यांनी आयुष्याचा उत्तरार्ध जवळ येत आहे, हे बघून कुलगुरू वशिष्ठ यांच्या मार्गदर्शनाने पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचे ठरविले. प्रमुख अतिथी म्हणून यांना व मला मान मिळाला. नाथ म्हणाले, “आतिथ्य स्विकारले तर माझे पूर्वपुण्य पूर्ण लयाला जाईल.” मी म्हणाले, “जाऊ द्या. पितृऋण उतरवायची तेव्हढीच संधी.”
यज्ञपूर्तीच्या वेळी दिलेल्या पायसाने तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या व पुढे मनुष्य जन्माला हरघडी पडणाऱ्या प्रश्नाला ठोस, समर्पक उत्तर देणारे ‘रामायण’ घडले हे सर्वश्रुतच आहे.
रामायण ही रामाची कथा आहे. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ अशा रघुकुलाची गाथा आहे. त्यात माझे संपूर्ण अस्तित्व लुप्त झाले असले तरी माझ्याही रोमारोमात राम आहे! फारशी चर्चा नसली तरी मी, शांता आणि पती ऋषी श्रृंग यांना या चौघा राजकुमारांच्या जन्माचे श्रेय मिळाले आहे.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे माझे मंदिर आहे. या मंदिरात मी पती ऋषी श्रृंग यांच्यासोबत विराजमान आहे. हा पल्ला गाठणे शक्य नसेल तर वाल्मिकी रामायणातील बालकांड मधल्या
“आनाय्य तु महीपाल ऋष्यशृङ्गं सुसत्कृतम् ।
विभाण्डकसुतं राजन् ब्राह्मणं वेदपारगम् ।
प्रयच्छ कन्यां शान्तां वै विधिना सुसमाहितः ॥”
या नवव्या सर्गात मला शोधाल. माझा संदर्भ तिथे नक्कीच सापडेल. एका श्रीरामभक्त राजपुत्रीचा इतका परिचय पुरे नव्हे का?
लेखिका:श्रीमती जयश्री दाणी
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈