सौ. शशी नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
☆ माहेरपण… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
*
एकदा नवऱ्याने तिला सहज विचारले,
बरेच दिवसात माहेरी गेली नाहीस ?
*
हल्ली नसतं का तुझ माहेरपण…?
आता जाऊन, परत नसतं का जगायचे तुला रम्य ते बालपण…?
*
पूर्वी जरा काही झाले की, माहेरची आठवण यायची,
अन् काम करता करता डोळ्यातून आसवं गळायची…
*
यावर तिचे मार्मिक अन् मनाला भिडणारे उत्तर
ऐकताच क्षणार्धात तो झाला निरूत्तर…
*
ताई ताई म्हणणाऱ्या बहिणी, गेल्या सासरी त्यांच्या घरी…
वहिनी तशी चांगली पण, होत नाही त्यांची बरोबरी…
*
सागरगोटे खेळणाऱ्या मैत्रिणी लग्न होऊन गेल्या परगावी,
कुणाशी हितगुज करणार अन् सांगणार कल्पना भावी…
*
भाचरंही मोठी झाली आपापल्या विश्वात रममाण झाली,
अवतीभवती नाचत नाहीत आत्या आली आत्या आली…
*
आईच्या गळ्यात पडून जे काही सांगायचं असतं,
तिला कमी ऐकू येतं म्हणून सांगताच येत नसतं…
*
बाबांची नजरही अधू झालीय समोर गेले तरी कळत नाही,
मला बघून होणारा आनंद त्यांच्या डोळ्यात पाहता येत नाही…
*
तिकडे गेले तरी मन इथेच अडकलेले असते आपल्या घरी,
उगाचच वाटत राहतं तुमचं अडेल माझ्यावाचून परोपरी…
*
बरीय मी आता इथेच माझ्या कोषात संसारी रमलेली,
इथल्या सुखदुःखांशी आता माझी गट्टी जमलेली…
*
म्हणून कल्पनेतच अनुभवते आता मी पूर्वीचे माहेरपण,
अन् आठवणीतच जगून घेते रम्य ते बालपण…
*
ऐकता ऐकता नकळत नवऱ्याचे दोन्ही बाहू पसरले,
अन् त्याच्या हक्काच्या स्पर्शाने भिजताच, तिचे माहेरपण विसरले
*
कवी :अज्ञात
संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈