श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “मायमराठी…” – कवयित्री : सुश्री दीपाली ठाकूर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(वृत्त – भुजंगप्रयात)
☆
नसे घेतला मी तिच्या जन्म पोटी,
नसे देवकी माय माझी जरी ती,
जिचे स्तन्य सांभाळते भान माझे,
यशोदाच ती माय माझी मराठी ॥
*
तिचा ‘छंद’ माझ्या नसांतून वाहे,
तिचे ‘वृत्त’ श्वासांतुनी खेळताहे,
जरी भंगण्याचा असे शाप देहा,
‘अभंगातुनी’ ती चिरंजीव आहे ॥
*
तिची एक ‛ओवी’ मलाही स्फुरावी,
कधी ‛शाहिरी’ लेखणीही स्रवावी ,
तिचे ओज शब्दांत ऐसे भरावे,
सुबुद्धी जनां ‛भारुडातून’ व्हावी ॥
*
दिसे बाण ‛मात्रेत’ तो राघवाचा,
निळा सूर ‛कान्यातला’ बासरीचा,
‛उकारात’ डोले तुझी सोंड बाप्पा,
‛अनुस्वार’ भाळी टिळा विठ्ठलाचा ॥
*
तिची ‛अक्षरे’ ईश्वरी मांदियाळी,
अरूपास साकारती भोवताली,
तिचा स्पर्श तेजाळता ‛वैखरीला’,
युगांची मिटे काजळी घोर काळी ॥
☆
कवयित्री : सुश्री दीपाली ठाकूर
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈