वाचताना वेचलेले
☆ ‘वांग्याचं भरीत‘… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
माझा स्वयंपाक चालू होता. इतक्यात लेक धावत आली, “आई, मधूमावशीचा फोन आलाय”.
मी कणीक मळत होते, लेकीला म्हणाले,” टाक स्पिकरवर.” कामाचं बोलून झाल्यावर गाडी आपोआप जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळली. “आज स्वयंपाक काय केलास?”
मी म्हणाले, “भरीत.”
मैत्रीण म्हणाली, “मी पण आज भरीतच केलंय आणि श्रुतीकडेपण आज भरीत.” यावर आम्ही दणदणीत हसलो.
इतका वेळ मुलगी माझा स्पिकरवर टाकलेला फोन हातात घेऊन उभी होती. ती, काय विचित्र बायका आहेत, कशावर पण हसतात, अशा अर्थी चेहरा करून बघत होती. “टाटा, बाय बाय, भेटू, चल ठेवते, चल ठेऊ आता,” असं साडेनऊ वेळा एकमेकींना म्हणून मग तिने फोन ठेवला.
फोन ठेवल्यावर मुलीने अपेक्षित असा चेहरा करून विचारलंच, “आई, तुम्ही कशावर पण हसता का ग? भरीत केलंय, यावर काय इतकं हसायचं?”
“आमचं सिक्रेट आहे ते…”
सिक्रेट म्हणाल्यावर मुलीचे कान सशाइतके लांब झाले. “सांग, सांग” असा तिचा मंत्र दहा वेळा म्हणून झाल्यावर, “भांडी लाव. मग सांगते”, “जरा कोथिंबीर निवड. मग सांगते” असा तिचा जरा अंत पाहिला.
आता ती माझी मुलगी असली तरी तिच्यात सहन शक्ती कमीच. “नको मला ते सिक्रेट, उगाच सगळी काम करून घेत आहेस माझ्याकडून.” ती सटकून जायला लागली. म्हणून मी पण जरा सबुरीने घेतलं.
“ऐक ग बायडे, माझी सासू म्हणजे तुझी आज्जी एकदम कमाल बाई. खूप शांत, समजूतदार आणि शांतपणे विचार करणं तर त्यांच्या कडून शिकावं . पण या गुणांच क्रेडिट त्या त्यांच्या सासरे बुवांना देत.
अनेक आघात आजीनी लहान वयात सोसले होते. आई खूप लहान वयात गेली. त्यामुळे मुळात त्या खूप हळव्या होत्या. मग एकत्र कुटुंबात लग्न झालं. घरात वयाने सगळ्यात लहान. त्यामुळे सतत सगळ्यांचे सल्ले ऐकावे लागायचे. घरात मोठ्या जावा, आत्तेसासूबाई, आजेसासूबाई काहीतरी चुका काढून कान उपटायला तयार असायच्या. या वयाने आणि मानाने लहान. त्यामुळे आजकाल तुम्ही मुलं जसं फटाफट बोलता तसं दुरुत्तर करायच्या नाहीत.
मग सगळी कामं झाली की त्या मागच्या अंगणात तुळशीपाशी रडत बसायच्या.
सासरेबुवांनी दोन तीन वेळा हे पाहिलं. एक दिवस त्यांना सासरेबुवांनी खोलीत बोलवून विचारलं, “काही होतंय का? तुम्ही का रडत असता. घरची आठवण येते का… कुणी काही बोलतं का… आमचे चिरंजीव त्रास देतात का?”
पण आज्जी मान खाली घालून उभ्या.सासरे बुवांनी वडिलांच्या मायेने डोक्यावरून हात फिरवला, तेव्हा आजींना एकदम रडू कोसळलं .
“मग आत्तेसासूबाई, मोठ्या जाऊबाई कशा ओरडतात! त्या पण कधी कधी चुका करतात, पण मलाच बोलतात.” हे बालसुलभ भावनेने सांगून टाकलं.
सासरेबुवा हसले आणि म्हणाले, “आज मी सांगतो ते मनापासून ऐका. जपा. खूण गाठ बांधून घ्या. आयुष्यात आनंदी रहाल.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला सगळं कळतं, सगळ येतं, आपण शहाणे, बाकी सगळे पौडावरचे वेडे असाच समज असणारी अनेक माणसे असतात. बरं.ही माणसं वयाने मोठी असतात. जवळच्या नात्याची असतात.त्यामुळे काही बोलायची सोय नसते. कोणताच माणूस परिपूर्ण नसतो. पण अशा अतिशहाण्या लोकांना वाटतं, आपण म्हणजे सर्वगुणसंपन्नतेचा महामेरू आहोत. बरं. ही माणसं चुकली, तर यावर ते स्पष्टीकरण देऊन आपण कसे बरोबरच होतो, समोरचाच चुकला हे पटवून देतात. पण हे स्वारस्य वयाने लहान माणसाला नसते. पण यामुळे नात्यात ताण येतो, मोकळेपणा जाऊन, एक प्रकारे दबून जाऊन नात्यात, वागण्यात अलिप्तता येऊ लागते. ज्याला सतत सल्ले ही माणसं देत असतात, त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो. मन हळवं होऊन जातं. भीती वाटत राहते – आपण चुकलो तर? आपल्याला जमले नाही तर?
काय?असंच होतंय का ?” आजीला सासरे बुवांनी विचारलं.
सासूबाईंच्या अगदी मनातलं त्यांच्या सासरेबुवांनी ओळखलं होतं.
“पण मग वागायचं कसं अशावेळी?” तुझ्या आजींनी घाबरत विचारलं.
“हे बघा, खूप त्रास करून घ्यायचा नाही. त्या दिवशी जेवणात सरळ भरीत करायचं.”
आजीला काही उमगलं नाही.
“म्हणजे?… “
“कुणी तरी आपल्याला दुखावलं, आपल्याशी वाईट, चुकीचं वागलं की आपल्या मनाला त्रास होतो.. मनात विचारांचे द्वंद्व सुरू होतं… हे विचार कुणाशी बोलून मन शांत होणार असेल तर ठीक, पण काही वेळा या गोष्टी ऐकतील असे उत्तम कान आणि सुदृढ मन आपल्यापाशी नसतं. या अस्वस्थ विचारांचा निचरा तर व्हायला हवा. हो ना? नाहीतर त्याची मोठी जखम मन सांभाळून ठेवतं .”
आजीचं वय लहान. मग तिला समजेल, असं त्यांना समजवायचं होतं.
“ऐका सूनबाई, हे आपल्या दोघांचं गुपित असेल हा. कुणाला बोलायचं नाही.
एक मोठं वांगं घ्यायचं. ते वांगे म्हणजे असं समजायचं, ज्या माणसांनी तुम्हाला दुखावलं आहे, ती व्यक्ती.त्याला भाजायला ठेवण्याआधी हळुवार तेल लावायचं.हे हळुवार तेल लावणं म्हणजे तुम्ही त्यांची काढलेली समजूत किंवा तुम्ही तुमच्या वागण्याची दिलेली सफाई असं म्हणू.वांग्याचं चुलीवर भाजणं म्हणजे तुम्ही सफाई दिली म्हणून उठलेला फुगाटा (म्हणजे आलेला राग). आता हे भाजलेलं वांग घ्यायचं आणि त्याला सोलून चांगलं रगडून घ्यायचं. मनात आलेला सगळा राग ते वांगे रगडताना काढायचा. बघा. मन आपोआप शांत वाटेल. आणि मग, निर्मळ मनाने भरीत करायचं.कारण जेवणात आपल्या चांगल्या वाईट भावना उतरत असतात. त्यामुळे भरीत करताना मन शांत, आनंदी ठेवूनच करायचं.”
आजींना ही कल्पना खूप आवडली होती. पुढे हे सासरेबुवांचं गणित योग्य वेळी वापरलं. त्याचा अतिरेक होऊ दिला नाही.
जेवणात भरीत झालं की सासरेबुवा हळूच हसायचे आज्जी कडे बघून. दोघांचं सिक्रेट होतं ते.
“एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणी आपल्या घरी आल्या होत्या, तेव्हा श्रुती मावशी तिच्या सासूबाईंच्या वागण्यामुळे दुखावली गेली होती. त्या सतत तिच्या चुका काढून तिला बोलायच्या… हे ती आम्हाला सांगताना तुझ्या आजींनी ऐकलं आणि आम्हाला ही भरीत कथा सांगितली.”
आजी लहान होत्या. त्यांचं मन दुखवायचं नव्हतं , घरातलं वातावरण बिघडवायचं नव्हतं आणि आजींच्या मनावर फुंकर पण घालायची होती. हे सगळं आजींच्या सासरेबुवांनी खूप छान समजावलं. त्याला रोजच्या व्यवहारातील गोष्टीची उपमा दिली.
आजींनी ही गोष्ट सांगितल्यावर आम्हीसुद्धा भरीत थेरपीचे फॉलोअर्स झालो.”
“Wow.. हे भारी आहे की”, लेक किंचाळली..
“आई, म्हणजे आत्ता गॅसवर जे वांगे भाजायला ठेवलं आहेस तो बाबांवरचा राग आहे वाटतं? त्याला आता रगडून बाहेर काढायचा आहे?”
“गप ग. पळ तू आता इथून.”
मी मस्त शांत मनाने भरीत केले.. जेवायला वाढले.. तेव्हा लेक आणि तिचा बाबा.. गालातल्या गालात हसत होते.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈