वाचताना वेचलेले
☆ सुख बघण्याची दृष्टी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
एका स्त्रीची एक सवय होती. ती रोज झोपण्याअगोदर आपला दिवसभराचा आनंद एका वहीत लिहीत असे. एका रात्री तिने लिहिले….
मी फार सुखी समाधानी आहे.
माझा नवरा रात्रभर फार मोठयाने घोरतो. ही ईश्वराची कृपा आहे. कारण त्याला गाढ म्हणजेच सुखाची झोप लागते.
मी फार सुखी समाधानी आहे. माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर डास झोपून देत नाहीत. म्हणजेच तो रात्री घरी असतो, आवारागर्दीत नसतो, वाईट वागत नाही. ही ईश्वराची कृपा आहे.
मी फार सुखी समाधानी आहे. दर महिन्याला लाईट बिल, गॅस, पेट्रोल, पाणी वगैरेची बिले भरताना दमछाक होते खरी. म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत, त्या वस्तू वापरात आहेत. जर ह्या वस्तू माझ्याकडे नसत्या तर तर हे जगणे किती अवघड झाले असतं! ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.
मी फार सुखी समाधानी आहे.
दिवस संपेपर्यत माझे थकून फार हाल होतात. पण माझ्याकडे दिवसभर कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे. आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत. हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.
मी फार सुखी समाधानी आहे.
रोज मला घरातील केर कचरा काढून घर स्वच्छ करावे लागते. आणि दरवाजा खिडक्या स्वच्छ कराव्या लागतात. खरंच देवाची माझ्यावर खूप कृपा आहे. माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे. ज्याच्याकडे घर, छत नाही, त्याचे काय हाल होत असतील?
मी फार सुखी समाधानी आहे.
कधीतरी लहान मोठा आजार होतो. पण लगेच बरी होते. माझे आरोग्य चांगले आहे, ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.
मी फार सुखी समाधानी आहे.
प्रत्येक सणाला भेटी देताना माझी पर्स रिकामी होते. म्हणजेच माझ्याजवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत – माझे नातेवाईक, मित्र, ज्यांना मी भेटी देऊ शकते. जर हे लोक नसते, तर जीवन किती वैराण झाले असते. ही ईश्वराची कृपा आहे.
मी फार सुखी समाधानी आहे.
रोज पहाटे अलार्म वाजला की मी उठते. म्हणजे मला रोज नवी सकाळ बघायला मिळते. ही ईश्वराचीच कृपा आहे.
जगण्याच्या या फॉर्मुल्यावर अंमल करत आपले आणि आपल्या लोकांचे जीवन आनंदमयी बनवले पाहिजे, छोटया व मोठया दुःखात, संकटात, त्रासातून सुखाचा शोध घ्यावा, आनंद शोधावा. अशा या माझ्या ईश्वराचे मी आभार मानते.
ब्रह्मांडात जी ऊर्जा ठासून भरलेली आहे (Cosmic energy), तिचा एक नियम आहे की आपण आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात, आपल्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील.
सुख शोधून सापडत नसते. त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते.
लेखक :अज्ञात
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈