श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ पुरणपोळी एक… वृत्तं अनेक… – सौजन्य :  श्री आनंदराव जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना . पुणे तेथे काय उणे  !

इंद्रवज्रा:

चाहूल येता मनि श्रावणाची

होळी तथा आणखि वा सणाची

पोळीस लाटा पुरणा भरोनी

वाढा समस्ता अति आग्रहानी ||

भुजंगप्रयात:

सवे घेउनी डाळ गूळा समाने

शिजो घालिती दोनही त्या क्रमाने

धरी जातिकोशा वरी घासुनीते

सुगंधा करावे झणी आसमंते || 

(जातिकोश – जायफळ)

वसंततिलका 

घोटा असे पुरण ते अति आदराने

घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने

पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते

पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||

मालिनी 

अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते

हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते

कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती

कडक नच करावी राहुद्या तैलवंती

मंदाक्रांता:

घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी

ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती

बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा

पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||

पृथ्वी

करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे

पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे

समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे

असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||

शार्दूल विक्रिडित:

हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या

उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या

वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे

नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे…!!

सौजन्य :  श्री आनंदराव जोशी

(एक अस्सल पूर्वाश्रमी सदाशिव पेठी आणि आजीव पुरणपोळीचे उपभोक्ते ! )

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments