श्री मोहन निमोणकर
वाचताना वेचलेले
☆ “१ एप्रिल —” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
म्हणजे गंमत..चेष्टा.. मस्करीचा दिवस. हो.. नेहमीच कसे गंभीरपणे जीवन जगायचे, किमान एक दिवस तरी बनवाबनवीचा.. गमतीचा हवाच. अर्थातच फुल म्हणजे वेड्यात काढणारी.. धक्का देणारी गंमत. पण ही जिवघेणी नको तर बुद्ध्यांक तपासणारी.. समोरच्यालाही हसवणारी हवी.
अशी ही एक कथा सांगितली जाते की या दिवसाचा प्रारंभ चक्क १३८१ चा. त्यादिवशी म्हणजे ३२ मार्चला इंग्लंडचा राजा रिचर्ड आणि बोहेमियाची राणी अँनचे लग्न आहे अशी अफवा पसरली. लोक आनंदोत्सव साजरा करु लागले. तेव्हा नंतर कळले की ३२ मार्च कॅलेंडरमध्ये नाहीच. १ एप्रिल आहे. तेव्हापासून हा गमतीचा दिवस सुरू झाला.
…पण कधीकधी अशीही गंमत केली जाते जी ऋणानुबंध जुळवते. आज लग्न ही समस्या झालीय. खरं म्हणजे आसपास आवडणारा जोडीदार दिसतो. सारे काही अनुरुप असतानाही बोलण्याचे ध्यैर्य नसल्यामुळे लग्न जुळत नसते. मग काही उत्साही १ एप्रिलचा फायदा घेतात. म्हणजे ‘वाजली तर पुंगी’. बाजू उलटलीच ..’तो’ किंवा ‘ती’ अंगावर धावली तर लगेचच आजचा दिवस कोणता ?.. असे म्हणत हसत सुटका करुन घेता येते.
पण ही १ एप्रिल ची मात्रा लागू होत आज अनेक संसार सुखात सुरू आहेत. त्यांच्यासाठी तर आजचा दिवस फारच महत्वाचा. त्यांचे अभिनंदन.
एकमेकांना आपल्या मनातील भाव कळण्यासाठी १ एप्रिलचा हा दिवस फलदायी ठरला. तेव्हा इतरांनाही असा लाभ घेण्यासाठी शुभेच्छा.
आता अजूनही कुणाला याचा फायदा झाला, हृदयातील प्रेम व्यक्त करत सुखी संसार सुरू झाला तर आम्हांला अवश्य कळवा. हल्ली लग्नातील जेवणाचे वाढलेले दर बघता आम्हाला बोलवू नका, फक्त कळवा. बोलवले नाही तरीही आमच्या शुभेच्छा आहेतच.
आणि.. हो समजा तुम्ही बोलवले तरीही वेळ.. पैसा.. प्रवासाची दगदग यामुळे यायलाही परवडत नाही हो.. पण हे मान्य न करता आमचा अहंकार दुखावतो. आम्ही ओरडून जाणीव करुन देतो. असो.. हे असे एप्रिल फुल.
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈