? वाचताना वेचलेले ?

☆ मी अनुभवलेला धर्म ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

काही वर्षांपूर्वी गडकोट मोहीमेसाठी गेलो होतो. जाताना धर्माच्या घोषणा देत, जयजयकार करत गेलो होतो. मनात आपल्याच धर्माचा उन्माद टचटचून भरला होता. बरोबर मित्र होतेच, पुण्याजवळ रात्री  मुक्काम होता, आम्ही उघड्यावरच झोपलो होतो. काही मित्रांना थंडी सोसवत नव्हती. ते एका इमारतीच्या आडोश्याला झोपण्यासाठी गेले.  पण त्या इमारतीतल्या सुशिक्षित व स्वधर्मीय लोकांनी हाकलून लावले. दुसऱ्या  दिवशी परत आमची पायपीट सूरू झाली. दुसरा मुक्काम सिंहगडाच्या आणि रायगडाच्या मध्ये असणाऱ्या  एका जंगलात पडला. आदिवासी पाड्यात आम्ही थांबलो होतो. एका आदिवासी बांधवाने चक्क आम्हाला झोपडीत जागा दिली. झोपडी छोटीशीच पण त्याचे मन आभाळासारखे वाटले. त्याच्या त्या झोपडीसमोर कालचा बंगला खूपच खुजा वाटत होता. चालून चालून थकलो होतो, सकाळपासून चालत होतो. तहान खूप लागली होती, जवळ पाणी नव्हते.  त्या बांधवाकडे पाणी मागितले.  पण पाणी थोडे अन आम्ही 25 जण– शेवटी त्या सदगृहस्थाने आमच्यासाठी रात्रीचे पाणी आणून दिले. पाणी दरीतून आणावे लागत होते, त्यात मटका छोटाच.  पण तरीही तो माणूस हेलपाटे मारत होता. अखेर मी त्या सदगृहस्थास म्हंटले,

 ” मामा राहू द्या, नका त्रास घेवू “.  यावर तो आदिवासी म्हणाला– “बाळा माझ्या दारात तू परत कशाला येशील ? माझा तेवढाच धर्म “– तो जे बोलला ते अविस्मरणीय होते, त्याच्या त्या वाक्याने माझ्या डोक्यातला धर्माचा माज, उन्माद झटक्यात उतरला. रात्रभर झोप लागली नाही. मन स्वत:ला प्रश्न विचारत होते, अस्वस्थ होतो. हा आदिवासी म्हणतो तो धर्म कोणता? आम्ही ज्याच्या घोषणा देतोय तो कोणता ? काल बंगल्याच्या आडोश्याला झोपल्यावर हाकलून देणाऱ्याचा  धर्म कोणता ? मन प्रश्नांनी भरून गेले होते. नक्की खरा धर्म कोणता ? आम्ही ज्याचा जयजयकार करत होतो तो की हा आदिवासी म्हणतो तो? जशी रात्र उतरत होती तसा मनातला धर्माचा माज उतरत होता. मन शांत होत होते. त्या दिवशी खरा धर्म गवसला होता. हातातली पोळी कुत्र्याने पळवल्यावर त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेवून पळणारे संत नामदेव आणि तो आदिवासी दोघे सारखेेच वाटत होते. कुत्र्यात  देव शोधणारे नामदेव अन माणसात धर्म शोधणारा तो आदिवासी सारखेच भासत होते. ठार अडाणी असणारा आदिवासी धर्म जगत होता, आम्ही केवळ घोषणा देत होतो. आमचे मस्तक दुसऱ्या  धर्माविषयी तिरस्काराने भरले होते. मस्तकातला धार्मिक उन्माद दुसऱ्या  धर्माच्या माणसाला माणूस मानायला तयार नव्हता.  ते शत्रू  वाटत होते.  पण त्या माणसाने डोळ्यावरची झापडं काढली. त्याने धर्म शिकवला. धर्म अनुभवला. एका आदिवासी माणसाला जे कळते ते आम्हाला कळत नाही. स्वत:लाच स्वत:ची लाज वाटली. तो माणूस आजही तसाच डोळ्यासमोर दिसतो. खूप काहीतरी गवसल्याचा आनंद तेव्हा मनात दाटला होता. 

—-हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ही केवळ लेबलं आहेत. माणसाला माणसाचा शत्रू बनवणारा, परस्परांच्या जीवावर उठणारा कोणताही धर्म, धर्म असू शकतो काय ?

संग्रहित…. ! 

 

प्रस्तुती : श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments