सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

श्रीमंत म्हणून जगा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

बरेच ज्येष्ठ नागरिक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत!

स्थावर मालमत्तेमध्ये वरिष्ठ नागरिक मनाने गुंतलेले असतात, तसे हल्लीची पिढी करीत नाही. आधुनिक पिढी ही त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे. पूर्वीच्या पिढीने मोठमोठी घरे बांधली, ती मुलांसाठी आणि नातवंडांसाठी देखील! कमावलेला सारा पैसा  बहुतेकांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला. ना हे वरिष्ठ कुठे लांब सहलीला गेले, ना त्यांनी कधी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च केले. ना आठवड्यातून एकदा पिझ्झा मागवला, ना बर्गर! नाटक- सिनेमा सुद्धा वर्षातून दोन- तीन वेळा! पैसे फक्त मुलांसाठी राखून ठेवायचे, झालेच तर एक दुसरा फ्लॅट घेऊन ठेवायचा, जो स्वतःसाठी काही उपयोगाचा नाही. शहरात राहात असतील तर गावी घर बांधायचे, जमीन विकत घ्यायची, असे उद्योग केले.

परिणाम काय झाले?  तर मुलांना आधुनिक शिक्षण दिले, जे फक्त आणि फक्त नोकरीभिमुख आहे.  कुठलीही शाळा, किमान भारतातील तरी, व्यवसाय वा धंदा किंवा उत्पादनाभिमुख उद्योग कसा करावा हे शिकवित नाही. डॉक्टर होण्यासाठी साधारण एक कोटी रुपये लहानपणापासून खर्च येतो. मग तो वसूल करण्यासाठी, सर्व नसतील तरी बहुतेक सारे नवीन डॉक्टर, डॉक्टरी म्हणजे सेवा व व्यवसाय नसून धंदा या दृष्टीने पाहायला लागलेत. त्यामुळे औषधे व उपचार या दोन्हींमध्ये भ्रष्टाचार व स्कॅम सुरु आहेत. इंजिनियर होऊन दहा हजारातील एक मुलगा  उत्पादनप्रणित उद्योगांकडे वळतो. बाकीचे ९९९९ इंजिनिअर फक्त इतर शहरात किंवा परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतात. स्थिर होईपर्यंत पाच सात कंपन्या सोडलेल्या असतात. आपल्या मूळ गावी न राहिल्यामुळे, इतर ठिकाणी, दुसऱ्या शहरात वा परदेशात कायम वास्तव्य करायचे ठरवल्याने इथल्या मालमत्तेमध्ये नवीन पिढीला अजिबात रस नसतो! पुढील पिढीला हे घर, जमीनजुमला याकडे पाहायला, त्याची निगा राखायला वेळ नाही. आणि त्यांना त्यात रस नाही, निष्ठा नाही. मग आईवडिलांचे निधन झाल्यावर काही मुले ती जमीन, घर विकून पैसे घेऊन निघून जातात. परदेशात राहाणारी कित्येक मुले मुली, आईवडील जिवंत असताना येत नाहीत, वेळ नाही या सबबीवर! पण ते वर गेल्यावर मात्र त्यांना इथे सारे आर्थिक हिशोब निपटायला एक- दीड महिन्याची रजा मिळते.  हे मी अनुभवले आहे. बँकेत अशा काही मुलांचा, जेष्ठ नागरिकांचा अनुभव आलेला आहे. आश्चर्य म्हणजे मागील पिढीचा मोह, मुलांविषयीच्या अपेक्षा काही कमी होत नाहीत. सगळ्या स्थावर व बँकेतील पैशांना वारस म्हणून आपल्या मुलाला वा मुलीलाच ठेवतात, जे दूर राहून, परदेशी राहून, कधी आईबापाच्या आजारपणातदेखील भेटायला न येणाऱ्या ह्या मुलांना, ते गेल्यावर एक छोटी मोठी लॉटरीच लागते ! हे मी अनुभवांती बोलतोय. कारण मी वीस- पंचवीस वर्षे पब्लिक रिलेशनमध्ये काम केले आहे.

हे वरिष्ठ नागरिक, पूर्वीची पिढी सोन्या चांदीचे दागिनेही आपल्या मुलाबाळांसाठी करून ठेवतात. हल्लीच्या पिढीला जुन्या नक्षीकामाचे दागिने पसंत नाहीत, तर पाश्चात्य लोकांप्रमाणे नव्या डिझाईनचे / खोटे म्हणजे इमिटेशन ज्वेलरी पसंत आहे. म्हणजे त्याचाही हल्ली काही उपयोग नाही.

नवी पिढी पैसे कमावणे आणि पैसे खर्च करणे एवढेच जाणते! पण त्यांना पैसे कमावण्यायोग्य ज्या पिढीने केले, त्यांचे अनुभव, त्यांची आस्था, प्रेम, निष्ठा याच्याशी नवीन पिढीला काहीही कर्तव्य नाही. पूर्वीच्या पिढीने आपल्या कर्तव्यापुढे आपली मौजमजा बाजूला ठेवली. गरजेनुसारच खर्च केला. पण मुलांना अगदी कुठल्याही अडचणींशिवाय, त्रासापासून मुक्त असे वाढविले. जे आपल्याला मिळाले नाही, त्याची वानवा नव्या पिढीला पडू नये, याची काळजी घेऊन उच्च शिक्षण त्यांच्या क्षमतेनुसार दिले. पण बरेच वरिष्ठ आपल्या पुढच्या पिढीला हवे तसे चांगले संस्कार देण्यात कमी पडले , कमी पडत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.

आपले आईवडील आपल्याला परिस्थितीची जाणीव देत असत. आपण गरीब आहोत, की मध्यमवर्गीय, हे मुलांना ठाऊक असे. पैसेवाले देखील आपल्या मुलांचे पाय जमिनीवर राहावेत याची काळजी घेत. पूर्वी अगदी क्वचित कोणी बाईक वा कारने शाळेत येत असे. अन्यथा श्रीमंत मुले फार तर सायकलवर येत. पूर्वीच्या पिढीने खाऊ वाटताना आपला- परका असा मुलांमध्ये भेदभाव केला नाही. हुशार विद्यार्थ्यांना काही श्रीमंतांनी मदत केली पुढे जायला.आता मात्र चित्र बदलले आहे. नवी पिढी बऱ्यापैकी स्वार्थी झाली आहे, अन ह्याला कारण पूर्वीचीच पिढी आहे. नवी पिढी स्वतःच्या सुखाकडे म्हणजे ऐहिक सुखाकडे जास्त लक्ष देत आहे. टी व्ही, फ्रिज, कार, लॅपटॉप, नवनवे मोबाईल, बाईक, स्कुटी आणि घरातील इतर सुखसोयी त्यांना नाते वा संस्कार यापेक्षा जास्त महत्वाच्या वाटतात!

वरिष्ठ आता आपला भार मुलांवर पडू नये, असे शक्यतो पाहातात. पण हल्ली नातवंडांची जबाबदारी देखील, जर एकत्र राहात असतील तर घेतात.

ही जी जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव मागील पिढीला होती व आहे,तीच जाणीव आताच्या पिढीमध्ये कमी होत चालली आहे.

आधीच्या पिढीने आता हे ध्यानात ठेवावे, q की आयुष्यमान वाढते आहे, राहणीमान महाग होते आहे, अशा वेळी तुम्ही स्वतःकडे केव्हा पाहाणार आहात? आपली संपत्ती आपल्या मृत्यूनंतर इथेच राहाणार आहे. पुढील पिढीला ती आयती संपत्ती मिळाल्यावर त्यांना त्या संपत्तीचे मोल असणार नाही. कारण रुपयाचे अवमूल्यन कमी होत आहे. कालचे तुमचे हजार रुपये आज एक रुपया समान आहे. आता तरी पुढील पिढीच्या सुखासाठी आपले सुख बाजूला सारु नका. तुम्ही त्यांना कमावण्यायोग्य बनवले आहे. ते त्यांचे जीवन जगत आहेत. तुम्हीही तुमचे जीवन जगा.

जीवनाचा आनंद घ्यायला आता तरी शिका. बरेच भारतीय आपले जीवन कंजुषपणाने जगतात, काटकसरीने खर्च करतात ते केवळ पुढील पिढीने श्रीमंत व्हावे, त्यांना काही कमी पडू नये म्हणून.पण आता हे बंद करा. स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःचे छंद, इच्छा यावर खर्च करा. राहिलेल्या इच्छांची एक यादी करा. त्या यादीतील एक एक इच्छा पुरी करण्यासाठी जगा. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटा!

साठ- पासष्ठ म्हणजे काही मरण्याचे वय नव्हे! आता अजून किती दिवस जगणार आहोत, हा विचार सोडा. समजा, तुम्हाला परमेश्वराने नव्वद ते शंभर वर्षांचे आयुष्य दिले असेल तर अजून तुमच्याकडे वीस- पंचवीस किंवा तीस वर्षे शिल्लक आहेत, जी तुम्ही पूर्णपणे स्वतःसाठी जगू शकाल.पुरे झाले आता इतरांसाठी जगणे. “आता आपले काय राहिलेय..?” हा विचार करीत राहाल तर शेवटची काही वर्षे आजारपणात, इतरांच्या वर अवलंबूनराहत काढावी लागतील, हे लक्षात ठेवा.

दीर्घायुषी व्हा, निरोगी राहा. गरीबीत भले जन्माला आला असाल, श्रीमंत म्हणून फक्त मरू नका, तर श्रीमंतीत जगा! मस्तीत राहा, लहान लहान गोष्टीत आनंद मिळवा!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ.शशी नाडकर्णी – नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments