📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अपूर्ण कविता … कवी : श्री पुनीत मातकर ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा

आवाज विरत नाही, तोच

सुसाट वेगानं मी पोहोचायचो

घराच्या दारात…

*

पाठीवरलं दप्तर फेकून

घोड्यागत उधळत

पोहोचायचो मैदानात,

मस्तवाल बैलासारखा

धूळमातीत बेभान होऊन

मिरवत राहायचो स्वतःचं

पुरुष असणं..

*

तीही यायची शाळेतून..

चार रांजण पाणी…

घरअंगणाची झाडलोट…

देव्हा-यातला दिवा लावून

ती थापायची गोल भाक-या

अगदी मायसारखीच

अन् बसून राहायची उंब-यावर..

रानातून माय येईस्तोवर

*

ती चित्रं काढायची..

रांगोळ्या रेखायची..

भुलाबाईची गाणी अन्

पुस्तकातल्या कविता

गोड गळ्यानं गायची….

धुणंभांडी..सडा सारवण

उष्टं खरकटं..सारं मायवानीच करायची

*

मी पाय ताणून निजायचो,

ती पुस्तक घेऊन बसायची….

दिव्याच्या वातीत उशिरापर्यंत…

*

एकाच वर्गात असून मास्तर

माझा कान पिळायचे

कधीकधी हातानं….

कधी शब्दानं …

“बहिणीसारखा होशील तर

आयुष्य घडवशील…” म्हणायचे,

मग करायचो कागाळ्या

मायजवळ…

*

मॕट्रिकचा गड

मी चढलो धापा टाकत..

तिनं कमावले मनाजोगते गुण,

बाप म्हणला

दोघांचा खर्च नाही जमायचा

त्याला शिकू दे पुढं…

टचकन डोळ्यात आलेलं पाणी

तसंच मागं परतवत

ती गुमान बाजुला झाली

पाठच्या भावाच्या रस्त्यातून…

*

ती शेण गोव-या थापत राहिली..

मायसंगं रानात रापत राहिली

काटे तणकट वेचत राहिली…

बाईपण आत मुरवत राहिली

*

तिच्या वाट्याचा घास घेऊन

मीही चालत राहिलो

पुस्तकांची वाट… 

कळत गेलं

तसं सलत राहिलं

तिनं डोळ्यातून परतवलेलं

पाणी…

*

तिला उजवून बाप

मोकळा झाला..

मायला हायसं वाटलं..

मी मात्र गुदमरतो अजूनही

अव्यक्तशा

ओझ्याखाली…

*

दिवाळी..रसाळी..राखीला

ती येत राहते

भरल्या मनानं..

पाठच्या भावाच्या वैभवानं हरखते..

बोटं मोडून काढते दृष्ट..

टचकन आणते डोळ्यात पाणी..

पाठच्या भावासाठी

जाताना पुन्हा सोडून जाते..

मनभरून आशीर्वाद…

*

ती गेल्यावर मी हुरहुरत राहतो

ज्योतीसारखा

जिच्या उजेडात ती

उशीरापर्यंत वाचायची पुस्तकं ,

पाठ करायची कविता…

जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण….

कवी: श्री.पुनीत मातकर

गडचिरोली

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments