सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सुंदर, शिडशिडीत दिसणे ही स्त्रीसुलभ भावना बाजूला ठेवून आपल्या पोटात असलेल्या जिवाला वाढायला जागा देताना आपल्या पोटाच्या वाढत्या आकाराचा विचार बाजूला पडतो आणि आरशात वाढलेल्या पोटाच्या जागी आतला जीव दिसून समाधान वाटते, तेव्हा स्त्रीची आई होते.

नऊ महिने बाळाला काय योग्य आणि अयोग्य आहे, त्यानुसार आहार, व्यायाम, व्यवहार करून त्याच्या येण्याच्या आधीपासून स्त्रीचं आयुष्य त्याच्याभोवती फिरू लागतं, तेव्हा स्त्रीची आई होते.

नऊ महिने भरल्यावर जगातील सर्वांत जास्त वेदनांपैकी एक असलेली प्रसूतीची वेदना बाळाच्या आवाजाने,दर्शनाने क्षणात विसरते, तेव्हा स्त्रीची आई होते.

बाळाला आपल्या मायेने ओतप्रोत भरलेला जगातील सर्वांत सकस आहार, आईचे दूध पाजताना तिला परमोच्च दैवी  आनंदाची अनुभूती होते, तेव्हा स्त्रीची आई होते.

बाळाची शी, शू, लाळ, ओकाऱ्या असंख्यवेळा साफ करताना आणि आपल्या अंगावर झेलताना घाण वाटायच्याऐवजी शीचा रंग किंवा पोत बदलला की लगेच काळजी वाटते, तेव्हा स्त्रीची आई होते.

मुलांबरोबर खेळताना, त्यांचे सर्व करताना स्वतःचे छंद, आवडी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि अस्तित्वच विसरते, तेव्हा स्त्रीची आई होते.

जगापासून, त्यातील वाईट लोक आणि प्रवृत्तींपासून मुलाचा सांभाळ करताना हळवी, प्रेमळ, मितभाषी असलेली स्त्री देखील  प्रसंगी दुर्गा बनू शकते तेव्हा स्त्रीची आई होते.

अपत्यजन्म, संगोपन ह्या चक्रातून अनेकदा जावे लागले, तरी तिच्या मायेच्या डोहाचे पात्र प्रत्येक अपत्याला आधीच्या सर्वांबरोबर डुंबता येईल इतके विशाल होत जाते, तेव्हा स्त्रीची आई होते.

मुले मोठी झाली, आपापल्या मार्गी लागली की आयुष्याची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्याचे समाधान मिळते, तेव्हा स्त्रीची आई होते.

मुलांनी उतारवयात विचारले नाही, आपल्या उभ्या आयुष्याची गुंतवणूक बोगस कंपनीत झाली, हे लक्षात आले तरी मुलांचे फक्त चांगले चिंतत त्यांची सतत काळजी करणारे ह्रदय बनते, तेव्हा स्त्रीचे आई होते.

स्त्री ही अनंत काळची माता आहे असे म्हणण्याचे कारण  कदाचित तिची आई म्हणून मुलांना असलेली गरज अनंतकाळ टिकणारी आहे!

आम्हा तमाम गरजवंत बाळांतर्फे तमाम मातांना  शुभेच्छा!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments