सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सात प्रकारच्या विश्रांती – लेखिका : डॉ. मानसी पाटील ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

दिवसभर खूप दगदगीचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं , बरोबर ना ?

झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो ? आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही. आपण जीवनात विश्रांतीचे महत्व जाणून घेत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये कायम विश्रांतीची कमतरता भासते. आपल्या जीवनात या विश्रांती सम प्रमाणात असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे सात प्रकार असतात. ते आपण सविस्तरपणे पाहूयात.

शारीरिक विश्रांती

आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो, त्याला सक्रिय विश्रांती असे म्हटले जाते . यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते.

मानसिक विश्रांती

दिवसभर दगदग करून आपण काहीसे चिडचिडे आणि विसरभोळे व्हायला सुरुवात होते. रात्री दमून थकून आपण झोपायला जातो, तेव्हापण आपल्या डोक्यात दिवसभर जे काही झालं, तेच सुरू असतं. रात्री झोपताना देखील आपण आपले विचार बाजूला ठेवून झोपू शकत नाही.

आठ तास झोपून पण आपल्याला झोप पूर्ण झाली नाही, असे वाटत राहतं. बिछान्यावर पडून राहण्याची इच्छा होते. हे आपल्यासोबत कशामुळे होत असेल, याचा विचार कधी आपण केला आहे का ?

मानसिक विश्रांतीचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे. आता या त्रासातून स्वतःला कसे सोडवायचे ? आपली नोकरी किंवा काम सोडून देणं, हा मार्ग तर आपण अवलंबू शकत नाही. त्यामुळे आपल्या कामाचे एकूण किती तास आहेत, ते पहिले बघा. त्यांचे दोन दोन तासात विभाजन करा. आता प्रत्येक दोन तासांमध्ये एक दहा मिनिटांचा ब्रेक घ्या. आणि हा ब्रेक आपण कधी घेणार आहोत, याचं नियोजन करा . आपल्याला सुट्टी घेण्याचीही बऱ्याचदा गरज असते. त्यामुळे आपण सुट्टी घेणं आवश्यक आहे.  रात्री झोपताना जवळ एक डायरी घेऊन झोपा आणि ज्या विचारांमुळे झोप येत नाही किंवा घाबरायला होतं, अशा विचारांची नोंद ठेवा. जेणेकरून त्यावर मात कशी करू शकू, यावर आपण अभ्यास करू शकतो.

सेन्सरी विश्रांती

विश्रांतीचा तिसरा प्रकार आहे , सेन्सरी विश्रांती. दिवसभर सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर यांच्यासमोर बसून काम करणे,  लाईट्स , आजूबाजूला होणारा आवाज , खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणे , यामुळे आपल्या संवेदनांवर खूप लोड निर्माण होतो. आता तुम्ही म्हणाल, ऑफिसमध्येच फक्त काम केल्याने हे होते का ? कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहेत. पण ऑनलाइन मिटींग करूनही आपण या त्रासाला सामोरे जात असतो. यासाठी काम करत असताना काही वेळ, अगदी एक मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल. आपले काम पूर्ण संपल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिकस् माध्यमातून अनप्लग करून झोपण्यास सुरुवात करा.

क्रिएटीव्ह विश्रांती

क्रिएटीव्ह विश्रांतीचे महत्व सातही विश्रांतीमध्ये सगळ्यात जास्त आहे. अशा प्रकारच्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्यास मदत होते. आपण आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या शांत रम्य जागी शेवटचं कधी गेला होतात आणि तिथे निवांत कधी बसला होता ते आठवा. बाहेर असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानंतर आपल्याला क्रिएटीव्ह विश्रांती मिळत असते. आता फक्त निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं म्हणजेच क्रिएटीव्ह विश्रांती नव्हे. तर काम सोडून ज्या गोष्टी , छंद, कला आपल्याला आवडतात ते करणे म्हणजे क्रिएटीव्ह विश्रांतीच . अशा गोष्टी, जिथे आपण व्यक्त होत आहोत असे वाटते , अशा गोष्टी , छंद जोपासण्यासाठी वेळ देणं याचा समावेश क्रिएटीव्ह विश्रांतीमध्ये होत असतो. आपण आपले आठवड्यातील चाळीस तास तर गोंधळून विचार करण्यात घालवत असतो. त्यामुळे आपल्याकडून क्रिएटीव्ह काही होत नसल्याचे पाहायला मिळते.

भावनिक विश्रांती

सतत इतरांना काय वाटेल, यांच्या चिंतेत असण्याने भावनिक विश्रांतीची गरज वाढते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र, सहकारी आणि बॉसेस यांच्या लेखी योग्य असे वागण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते.

अशा वेळेस जो आपल्याबद्दल काहीही मत बनवणार नाही, ज्याच्याशी आपण कोणत्याही विषयावर काहीही बोलू शकतो अशा मित्रांना भेटा/फोन करा. तेव्हाच आपल्याला ‘भावनिक विश्रांती’  मिळेल. आपल्या मनातील गोष्टी बोलता येणं आणि ते ऐकणारा माणूस असणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. 

सामाजिक विश्रांती

भावनिक विश्रांती नंतर आता सामाजिक विश्रांती काय असते ते पाहूयात.

गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या अति वापरामुळे नकारात्मकता प्रचंड वाढली आहे. आपल्या आसपास असणारी माणसे आपण बदलू तर शकत नाही. मात्र जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढविणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक विश्रांती. ज्यांच्याशी दोन मिनिटे बोलल्यानंतर लगेचच उत्साह दुणावतो, अशा लोकांसोबत संपर्कात राहा.

आध्यात्मिक विश्रांती

या विश्रांतीनंतर आध्यात्मिक विश्रांती समजून घेऊया. प्रेम , आपुलकी , स्वीकार करणे या भावना अगदी शारीरिक व मानसिकतेच्या पलीकडे जाऊन खोलवर समजून घेणं, ही आध्यात्मिक विश्रांती.  आता ही विश्रांती आत्मसात करण्यासाठी स्वतःपेक्षा इतरांना उपयोग होईल, अशा कामांत स्वतःला गुंतवा , रोजच्या रोज प्रार्थना, ध्यान करा, तसेच आपल्या आवडीच्या सामाजिक कार्यासोबत  जोडले जा.

मित्रहो, लक्षात आलं ना? फक्त झोप पूर्ण करून आपण बाकीच्या विश्रांतीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आता स्वतःसाठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा. शारीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्ट्या सुदृढ व्हा !‌

लेखिका :डॉ. मानसी पाटील

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments