सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “त्या तरुतळी विसरले गीत …” – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

आपल्या स्वतःच्या कवितेच्या दोन ओळी किंवा शब्द कुठे लिहून ठेवण्याआधी अगदी मनातल्या मनात हरवून जातात तेव्हा होणारी मनाची घालमेल शब्दात न सामावणारी असते. आपली कविता दुसऱ्याने स्वतःच्या नावाने किंवा नाव न देताच माध्यमावर दिली की जीवाची होणारी बेचैनीही शब्दातीत असते. एकूणच, कविता हरवणे हा अनुभव शब्दात व्यक्त करणे आणि ती व्याकुळ अवस्था इतरांपर्यंत पोहोचवणं सोपे नव्हे. 

परंतु कवी वा.रा कांत यांच्यासारखा  कवी कवितेचे हे हरवणं इतक्या उत्कटपणे काव्यातून व्यक्त करतो की त्या काव्याचं एक अविस्मरणीय असं विरहगीत म्हणूया किंवा भावगीत  पिढ्यान पिढ्या मनाचा ठाव घेत आहे. 

“त्या तरुतळी  विसरले गीत” हे वा.रा कांत यांचं गीत एका “हरवण्याच्या” अनुभवातून आकारलं आहे. वा. रा कांत हे नांदेडचे कवी सायकल घेऊन नोकरीच्या ठिकाणी  जात असत. हा रस्ता रानातून जात असे. तिथेच एका तळ्याकाठी असलेल्या  झाडाखाली बसून ते अनेकदा कविता लिहीत असत. या कविता किंवा सुचलेल्या ओळी एका वहीत लिहून ठेवत असत. एक दिवस घरी परतल्यावर आपण कवितांची वही  त्या झाडाखालीच विसरलो हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग मनाची झालेली घालमेल व्यक्त करताना शब्द त्यांच्या समर्थ लेखणीतून  आले –  

“ त्या तरुतळी विसरले गीत “ 

जेव्हा जेव्हा मी हे गीत ऐकत असे  तेव्हा अपुऱ्या राहिलेल्या भेटीची ही व्याकुळ आठवण आहे असं मला वाटत असे. “हरवलेल्या वही”ची ही गोष्ट कळल्यावर मात्र ह्या गीतातील शब्दांचे संदर्भ मनाला अधिकच अस्वस्थ करू लागले. 

आपली वही उद्या मिळेल का? ही. मनाची घालमेल सांगणार तरी कुणाला? मनाच्या या अवस्थेतून   वा,रा कांत यांच्यातील सृजनशील कवी कडून कशा ओळी लिहिल्या जातात बघा –  

त्या तरुतळी विसरले गीत

हृदय रिकामे घेऊनि फिरतो, 

इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना

स्वरातुनी चमकते वेदना

तप्त रणे तुडवीत हिंडतो, ती छाया आठवीत.

आपण आणखी कविता लिहू शकतो, लिहिल्या जातील इतकी विशाल प्रतिभा आपल्याकडे आहे हे जाणणाऱ्या कवीच्या मनात गेलेल्या कवितांची हुरहूर आहेच. 

“विशाल तरु तरी फांदी लवली”

दुसऱ्या दिवशी सकाळी साशंकपणेच ते त्या तळ्याकाठी   पोचतात तेव्हा काय आश्चर्य? 

त्यांची वही तिथे असतेच पण ती झाडाखाली नुसतीच पडलेली नाही. तर झाडाला रेलून आपल्या सख्याची  वाट बघत उभ्या असलेल्या एका सुंदर तरुणीच्या हातात ती वही आहे असे दृश्य त्यांना दिसते. आणि ते लिहून जातात – 

मदालसा तरुवरी रेलुनी

वाट बघे सखी अधिर लोचनी

पानजाळि सळसळे, वळे ती, मथित हृदय कवळीत

आणि त्या तरुणीचं वर्णन करताना शब्दचित्रच रेखातात –

पदर ढळे, कचपाश भुरभुरे

नव्या उभारित ऊर थरथरे

अधरी अमृत उतू जाय परि, पदरी हृदय व्यथीत.

वाट बघून ती तरुणी जणू शिणली आहे, थकलेली आहे. कवीची अवस्था तरी  कुठे वेगळी आहे? कवितेच्या वही साठी वणवण करून माझाही देह (तनु ) थकलेला आहे. मात्र  दोघांची परिस्थिती त्या क्षणी  अशी एक  अशी असली तरी दोघांच्याही हृदयातील  आकांक्षा मात्रवेगवेगळी आहे. दोघांच्यात असलेले हे साम्य आणि विरोधाभास  वा.रा  कांत किती सुंदर शब्दात लिहून गेलेत  –  

उभी उभी ती तरुतळि शिणली

भ्रमणी मम तनु थकली गळली

एक गीत, परी चरण विखुरले, द्विधा हृदय-संगीत तरुतळी गीत विसरल्यानंतर झालेली मनातील घालमेल उत्कटतेने व्यक्त करणारं भावगर्भ  असं  हे गीत यशवंत देवां सारख्या संवेदनशील संगीतकाराला भावणं हा आणखी एक सुंदर योग. कवीच्या भावना उत्कटपणे व्यक्त करणारं हे गीत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलं  आणि ते गाण्यासाठी  साक्षात सुधीर फडके यांचा आवाज लाभावा? हा सुवर्ण योग ?  आपण आपल्या पुरते तरी याला रसिकांचे भाग्य समजूया.   

त्या तरुतळी विसरले गीत कवितेमागची कथा संपूर्णपणे  खरी असो वा नसो. तो विचार दूर सारून.

“ तप्त रणे तुडवीत हिंडतो” 

 “त्या तरुतळी विसरले गीत” 

..हे शब्द  सुधीर फडके यांच्या आवाजात कानावर येतात तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी  आपल्याला व्याकुळ आणि भावनावश करतात इतके मात्र खरे.    

लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments