श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ आता द्या निकाल… – लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
रात्रीच्या गडद अंधारात चोर त्या घराच्या आवारात शिरला.
एका खिडकीतून अल्लाद आत शिरण्यासाठी तो आवाज न करता त्या खिडकीवर चढला आणि अचानक काड्काड् आवाज करत ती खिडकी मोडली, चोर खाली पडला, त्याचा पाय मोडला. घरमालक जागा झाला. त्याने चोराला रक्षकांच्या ताब्यात दिलं.
दुसऱ्या दिवशी भलतंच आक्रीत झालं. ‘ त्या घरमालकाने तकलादू खिडकी बनवल्यामुळेच आपला पाय मोडला, त्याची त्याने नुकसान भरपाई द्यायला हवी,’ असा खटलाच चोराने दाखल केला होता.
खटल्याच्या दिवशी न्यायालयात अभूतपूर्व गर्दी उसळली होती.
घरमालक न्यायाधिशाला म्हणाला, “ महाराज, हा काय उफराटा प्रकार आहे? हा माणूस माझ्या घरात चोरी करायला शिरत होता. तो माझं केवढं नुकसान करणार होता. त्यात त्याच्या चुकीने माझ्या घराची खिडकी मोडली आणि मीच नुकसान भरपाई द्यायची? “
न्यायाधिशाने चोराकडे पाहिलं. चोर म्हणाला, “ मी चोरी करणार होतो. केली नव्हती. यांचं नुकसान होणार होतं, झालेलं नाही. माझं नुकसान मात्र झालेलं आहे आणि ते यांच्या चुकीमुळे झालेलं आहे. कधीतरी खिडकीवर कोणी, भले चोर का होईना, चढू शकतो, याचा विचार करून मजबूत खिडकी बांधणं हे याचं काम नव्हतं का? “
न्यायाधीश म्हणाले, “ याचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे.? “
घरमालक म्हणाला, “ महाराज, मी हे घर बांधताना बांधकाम कंत्राटदाराला पूर्ण पैसे दिले होते. त्याने तकलादू बांधकाम केलं असेल, तर माझा काय दोष? “
कंत्राटदाराला न्यायालयात हजर केलं गेलं.
तो म्हणाला, “ मी पूर्ण पैसे घेतले. चांगला माल आणला. चांगले कारागीर आणले. त्यांना चांगले पैसे दिले. आता ही खिडकी बांधणाऱ्या कारागिराने तरीही चूक केली असेल, तर माझा काय दोष?”
कारागीराला न्यायालयात हजर केलं गेलं.
तो म्हणाला, “ मी भिंत नीटच बांधली होती. त्यातली चौकट बसवताना सुताराने गडबड केलेली असणार. त्यात माझा काय दोष?”
सुतार न्यायालयात हजर झाला.
तो म्हणाला, “ महाराज, माझ्या हातून गडबड झालीये यात शंका नाही. पण, त्यात माझा दोष नाही. मी ही खिडकी बसवत असताना अगदी मोक्याच्या वेळेला एक रूपसुंदर स्त्री समोरून गेली. तिच्यामुळे माझं लक्ष विचलित झालं. तिने इंद्रधनुषी रंगाची ओढणी घेतली होती, हे मला अजूनही आठवतं. आता सांगा यात माझा काय दोष?”
त्या स्त्रीला बोलावलं गेलं.
ती म्हणाली, “ मी त्या दिवशी तिथून गेले, हे खरंच आहे महाराज. पण, माझ्याकडे नीट पाहा. मी किती सामान्य रंगरूपाची स्त्री आहे. माझ्यासारख्या स्त्रीकडे कोणी रस्त्यात वळूनही पाहणार नाही. या सुताराचं माझ्याकडे लक्ष गेलं ते माझ्या इंद्रधनुषी दुपट्ट्यामुळे.” तिने तो झळझळीत दुपट्टा काढला आणि सगळं न्यायसभागार मंत्रमुग्ध झालं. खरंच तो दुपट्टा नजरबंदी करणारा होता. ती स्त्री म्हणाली, “ या दुपट्ट्याला हा रंग लावणारा रंगरेझच खरा दोषी आहे.”
“बोलवा त्याला,” न्यायाधिशांनी हुकूम दिला.
ती स्त्री लाजून म्हणाली, “ बोलवायचं कशाला? माझा पतीच आहे तो आणि या न्यायालयातच हजर आहे.”
तिने पाय मोडलेल्या चोराकडे बोट दाखवलं आणि त्याने कपाळावर हात मारून घेतला.
लेखक – ओशो
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com