सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “जे द्याल, तेच परत येईल, कितीतरी पटीने…!” – लेखक – श्री जयप्रकाश झेंडे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

१८९२ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात घडलेली घटना ही सत्यघटना आहे. परंतु याची शिकवण मात्र शाश्वत आहे, कायम टिकणारी आहे. एक १८ वर्षांचा मुलगा अत्यंत कष्टानं विद्यापीठातील शिक्षण घेत होता. आपली फी भरणं ही त्याला अवघड जात होतं. हा मुलगा अनाथ होता आणि एकदा फीचे पैसे कोठून आणायचे या विवंचनेत होता. एक अतिशय चमकदार कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्यानं आणि त्याच्या मित्रानं महाविद्यालयाच्या एका संगीत जलशाचं आयोजन करायचं निश्चित केलं. त्यातूनच आपल्या शिक्षणाची फी गोळा करायचं ठरवलं. त्यांनी एक मोठा पियानोवादक आय. जे. पेडरवस्की यांना भेटायचं ठरवलं. त्यांच्या व्यवस्थापकानं २००० डॉलर एवढ्या रकमेची मागणी संगीत जलशासाठी केली. या दोघा मित्रांचा संगीत जलसा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नही मोठा धडाक्यानं सुरू झाले.

जलशाचा दिवस उजाडला. पेडरवस्की यांनी कबूल केल्याप्रमाणे हा कार्यक्रम पारही पडला. परंतु दुर्दैवानं तिकीट विक्रीतून फक्त १६०० डॉलरच जमा होऊ शकले. अतिशय जड अंत:करणानं दोघेही मित्र पेडरवस्की यांच्या घरी पोहोचले. त्यांनी पेडरवस्कींना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यांना जमा झालेली संपूर्ण रक्कम म्हणजे १६०० डॉलर्स आणि उरलेल्या ४०० डॉलर्सचा चेक दिला. लवकरच आम्ही या ४०० डॉलर्सची रक्कम देऊ हे वचनही दिलं.

नाही, असं चालणार नाही, मला हे अमान्य आहे असं पेडरवस्की म्हणाले आणि त्यांनी तो ४०० डॉलर्सचा चेक फाडून टाकला आणि मुलांना १६०० डॉलर्सची रक्कम परत केली. त्या मुलांना सांगितलं, हे १६०० डॉलर्स घ्या. यातून तुमचा झालेला खर्च वजा करा. त्यानंतर आपल्याला भरावयाच्या फीची रक्कमही त्यातून काढून घ्या आणि त्यातून जी रक्कम उरेल तीच रक्कम मला द्या. मुलांना या वागण्याचं खूपच आश्चर्य वाटलं आणि या औदार्याबद्दल पेडरवस्कींचे मनापासून आभार मानून मुलं परतली.

ही चांगुलपणाची एक छोटीशीच कृती होती, परंतु त्यावरूनच श्री. पेडरवस्की यांच्या मोठेपणाची एक चुणूक दिसून येते, त्यांच्यातली माणुसकी प्रतीत होते. त्यांना माहीतही नसणाऱ्या परक्या दोन विद्यार्थ्यांना त्यांनी मदत का करावी? 

आपणा सर्वांच्यात आयुष्यात हे प्रसंग येतात आणि अशा वेळी आपण मात्र विचार करतो अशीच मदत मी सर्वांना करत राहिलो तर माझं काय होईल? परंतु खऱ्या अर्थी मोठी असणारी माणसं मात्र विचार करतात की मी त्यांना मदत केली नाही तर त्यांचं काय होईल? आपल्याला त्यांच्याकडून परत काय मिळेल, याचा विचारही अशा मोठ्या माणसांच्या मनाला स्पर्श करीत नाही.

पुढे काही वर्षांनी श्री. पेडरवस्की पोलंडचे पंतप्रधान झाले. ते अतिशय उत्तम नेते होते, परंतु दुर्दैवानं जागतिक युद्ध सुरू झालं. त्यात पोलंड उद्ध्वस्त झालं. देशात जवळ १५० लाख माणसं अन्नधान्यावाचून भुकेली होती. त्यांची भूक भागविण्यासाठी पोलंडकडे पैसाही नव्हता. कोठून आणि कशी मदत मिळवावी, या विचारानं पेडरवस्की अस्वस्थ झाले होते. त्यांनी अमेरिकेतील अन्नधान्य आणि साहाय्य या सरकारी प्रशासनाकडे मदत मागितली. त्या विभागाचे प्रमुख हर्बर्ट हुव्हर हे होते. तेच पुढे अमेरिकेचेही अध्यक्ष झाले. हुव्हर यांनी मदत देण्याचं कबूल केलं आणि त्यांनी ताबडतोब पोलंडमधील भुकेल्या लोकांसाठी हजारो टन अन्नधान्य पाठवूनही दिलं. पोलंडमधील लोकांवरचा कठीण प्रसंग टळला, संकट दूर झालं. पेडरवस्कींची मोठी चिंता दूर झाली. त्यांनी स्वत: अमेरिकेला जाऊन हुव्हर यांचं आभार मानायचं ठरवलं. 

जेव्हा पेडरवस्की त्यांना भेटले आणि त्यांचे आभार मानू लागले तेव्हा त्यांचे बोलणं मध्येच तोडून पटकन हुव्हर म्हणाले, पंतप्रधान महोदय, आपण माझे आभार मानण्याची काहीच गरज नाही, आणि ते योग्यही होणार नाही. आपल्याला कदाचित स्मरणार नाही, परंतु अनेक वर्षांपूर्वी आपण दोन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती आणि मी त्यातील एक विद्यार्थी आहे.

हे विश्व म्हणजे अतिशय सुंदर आहे. आपण या जगासाठी जे देतो तेच अनंत पटीनं आपल्याकडेच परत येत असतं. अनेक वेळेस ते आपल्याला कळतही नाही.

लेखक : श्री जयप्रकाश झेंडे

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments