वाचताना वेचलेले
☆ ‘डॉ. स्नेहलता देशमुख आणि पांढरा ढग’ – लेखक : श्री श्रीकृष्ण म्हसकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्याशी निगडित एक अतिशय तरल आठवण आहे. मंडळाच्या एका कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांना पार्ल्याहून ठाण्याला आणायची जबाबदारी माझ्याकडे होती. ठरल्या वेळी मी त्यांच्या घरी पोचलो आणि आम्ही ठाण्यासाठी निघालो.
गाडीत सर्वसाधारण विषयांवर गप्पा चालू होत्या. कांजूरमार्ग येथे पोचल्यावर त्यांनी खिडकीतून एक पांढरा ढग बघितला आणि म्हणाल्या, “हा किती एकटा आहे!”
मी त्यांना म्हटले, “या अशा ढगाकडे कधीही बघितले की मला ‘डॅफोडिल्स’ कवितेतील पहिली ओळ आठवते. I wandered lonely like a cloud…. या एका ओळीत खूप काही अर्थ आहेत, जे मला अनेकदा आतून काहीतरी संवेदना देत असतात, ज्या अजूनपर्यंत मी कोणाकडे व्यक्त केलेल्या नाहीत.”
देशमुख ताई म्हणाल्या, “जरूर सांगा.”
मी म्हटले, “हा एकांडा ढग स्वतःच्या मर्जीने वाऱ्याबरोबर उंडारतोय. त्याला कोणाची कसलीही अपेक्षा पूर्ण करायचे ओझे नाही, कारण तो रिकामा आहे. व्रतस्थ आहे, कारण त्याच्याकडे आता देण्यासारखे काहीच नाही. त्यातून ना पाणी पडत ना त्याची सावली कोणाला मिळत. तरीही त्याचे अस्तित्व तो जाणवून देत आहे, दखल घ्यायला लावत आहे. हा ढग आणि आपले वार्धक्य एकाच पातळीवर असतात. कारण दोघांकडे द्यायला काही शिल्लक नसते, तर एक कृतार्थ भाव मनात असतो. हे ढग एकटे असतात. कारण झुंड फक्त काळया ढगांची असते. त्यांचा कडकडाट होतो. ते खूप गरजतात. पण त्यांना वाटले तरच पाणी देतात नाहीतर हुलकावणी देतात, जी लोकांच्या जिव्हारी लागू शकते. सूर्य किरणे काळया ढगांना चांदीची झालर लावतात, तर हा एकटा ढग शुभ्र चंदेरी असतो.
या एकट्या ढगाकडे बघितले की जीवनाच्या पक्वतेची अनुभूती येते आणि वयाच्या एका टप्प्यावर आलेले एकटेपण सोसायची उमेद देते. हे ढग आणि एकाकी माणसे कधी विरून जातात हे कळतच नाही.
या एका ढगा कडे बघितले की असेच विचार अनेक वर्षे माझ्या मनात रुंजी घालत आहेत. वर्डस्वर्थच्या कवितेची सुरुवात एका विरक्त भावनेने होताना, तो एकटा आहे हेच त्याला अधोरेखित करायचे असेल कदाचित. कारण पुढची सगळी रचना माणसे आणि त्याची गर्दी वगैरे सांगते.”
माझे बोलणे ताई एकाग्रतेने ऐकत होत्या आणि नंतर म्हणाल्या, “अहो म्हसकर, या विवेचानातून तुम्ही माझ्या मनात अनेक वर्षे अनुत्तरित असलेल्या एका प्रश्नांचे उत्तर देऊन टाकले आहे. तुमची मी खूप आभारी आहे.”
मी विचारले, “कोणता प्रश्न आहे तो?”
तेव्हा त्या म्हणाल्या, “या एकट्या आणि एकाकी ढगाच्या मनात उगाच हिंडताना काय बरे विचार येत असतील?”
पुढचा ठाण्यापर्यंतचा सगळा प्रवास निशब्द होता.
लेखक : श्री श्रीकृष्ण म्हसकर
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈