वाचताना वेचलेले
☆ अवयवांची गंमत – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
१. जिभेचे वजन खूप हलके असते, पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते.
२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो.
३. पाठ मजबूत ठेवा कारण शाबासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.
४. माणसाने घमेंडीत एवढे उडू नये की एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरू नये.
५. सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात, पण एकमेकांना न पाहता.
६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे पण असावं, कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात.
७. एकदा हाताने पायांना विचारले, “तुझ्यावर सगळे डोके ठेवतात तो अधिकार मला का नाही?”त्यावर पाय हसून म्हणाले, “यासाठी जमिनीवर असाव लागतं, हवेत नाही.”
८. दुःखात बोटं अश्रू पुसतात, तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात. आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची!
९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. पण ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो.
१०. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली, “तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात?” त्यावर हारातील फुले म्हणाली, “त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते.”
११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो, तेच डोळ्यांना बघायला लागतो.
१२. या जगात चप्पल शिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही कारण एक हरवली की दुसऱ्याचं जीवन तिथेच संपतं..
☆
कवी :अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈