वाचताना वेचलेले
☆ ‘शब्दकळा…’ – लेखिका : श्रीमती अरुंधती ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
सूनबाईंनी घासून ठेवलेली देवाची उपकरणे सासूबाई पुसून ठेवत होत्या. मधेच म्हणाल्या, “ अगबाई ! आज निरांजन नुसतंच कुरवाळलेलं दिसतंय ! “ बी. ए. मराठी असलेल्या सूनबाईंना वाक्याचा अर्थ कळायला अंमळ वेळच लागला. अर्थ लागला तेव्हा हसू आणि राग या दोन्हीचं मिश्रण असलेला एक वेगळाच भाव चेह-यावर उमटला. सासूच्या उत्कृष्ट मराठीला दाद द्यावी की चूक काढली म्हणून फणकारा दाखवावा हे तिला कळेचना !
मराठी भाषा फार मजेशीर आणि संपन्न – समृद्ध आहे. तिचा वापर पूर्वीच्या न शिकलेल्या, कमी शिकलेल्या स्त्रिया फार चतुराईने करत. ‘ शर्करा अवगुंठित’ शब्दांचा वापर लीलया होत असे.
आमचे एक परिचित होते. घर म्हणजे नांदतं गोकुळ. मुलांच्या दंग्यानं अन् पसा-यानं तिथल्या आजी कावलेल्या असत. ‘ आवरलेलं घर ‘ हे दृष्य फक्त सणावारी किंवा कोणी पाहुणा येणार असेल तरच. कधी त्यांच्या घरी डोकावलं तर आजी नातवंडांना ओरडताना दिसत. पसा-यात बुडालेल्या आजी सहज बोलून जात, “ कार्टी बसतील तिथे * ठेवतात ! “ हे वाक्य तेव्हा मला मजेशीर वाटायचं. आजवर ते लक्षात असूनही वापरायचा धीर मात्र होत नाही.
माझी एक धष्टपुष्ट मैत्रीण कामावरुन येताना जिमला जाऊन येत असे. त्या दिवशी तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून साधारण ती येण्याच्या जरा आधीच मी तिच्या घरी गेले. तिच्याकडे सासूबाई आणि आजेसासूबाई अशा दोघीही होत्या. सासूबाई साधारण सत्तरीच्या. मैत्रिणीला यायला थोडा उशीर होणार होता. त्यामुळे सासूबाई भराभर कामं उरकत होत्या. मी आपलं सहज म्हटलं “ काकू, तुम्ही अजूनही फिट आहात अगदी !” लगेच आजी उद्गारल्या “ काय करणार बाई, तरण्या झाल्या बरण्या अन् म्हाता-या झाल्या हरण्या! “ मी उगीच अंग चोरुन अन् सावरून बसले.
म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर करावा तर तो मागच्या पिढीनेच. फारशा शिकलेल्या नसूनही या स्त्रिया सुसंस्कृत आणि प्रसंगी असंस्कृत भाषाही वापरत असत !
वेगळ्या अर्थानं गाजलेल्या एका ओळखीतल्या मुलीचं लग्न तशाच अर्थानं गाजलेल्या मुलाशी झालं, तेव्हा माझी आजी सहज बोलून गेली “ हडळीला नव्हता नवरा अन् झोटिंगाला नव्हती बायको ! आता जोडी छान जमली. “
आजोळी पूर्ण सुट्टी घालवल्यानंतर ( तेव्हा उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत कुठले टूर किंवा ट्रीप्स नसायच्या. कधी वडिलांच्या मूळ गावी, कधी आईच्या माहेरी मुक्काम. हाच बदल. ) जूनमधे शाळेत गेले. पहिला दिवस, मराठीच्या बाई वर्गात आल्या. गप्पा टप्पा सुरु झाल्या. मधेच हसत हसत माझ्याकडे बघून म्हणाल्या “ वा ! गालांवर अगदी रुई फुललीय ! “ क्षणभर मी गोंधळले आणि मग अर्थ कळून रुईतच खुद्कन हसले होते.
अगदी शेलक्या शब्दात उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत. आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे, रंग काय चाटायचाय ! “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पो सारखा पडलेला असतो, “ असा होई. खरं तर वरची वाक्यं मनं दुखावणारी नाहीत का ? पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाई. ऐकणा-याला पण फार खेद खंत वाटत नसे.
चांगलं पण बोललं जाई बरं का ! एखादी मुलगी सुदृढ असेल तर “ अहो, दहा जणांचं कुटुंब हसत सांभाळेल “ एखादीसाठी “इतकी रूपवान आहे की वाटेवरचा चोरसुद्धा उचलून नेईल “ (म्हणजे काय म्हणायचे असेल? ) कोणी सुग्रण असेल तर “ अहो, पुरणपोळी विरघळते तोंडात, पाण्याला फोडणी दिली ना तरी ओरपत बसाल !”
आताच्या काळात एखादी स्त्री ‘ब्युटीफुल, गॉर्जियस ‘ दिसत असेल. तेव्हा ‘चारचौघींसारखी ‘, ‘ दहाजणीत उठून दिसेल अशी ‘, ‘ लाखात एक’ असे उल्लेख असत आणि त्यावरून रूपाचा अचूक अंदाज येई.
अर्थात पुरुषवर्गही यातून सुटत नसे. शेलकी विशेषणं त्यांच्यासाठीही असत. ‘आग्यावेताळ’, ‘जमदग्नीचा अवतार’, ‘दुर्वास मुनी’, ‘पिंपळावरचा मुंजा’, ‘पाप्याचं पितर’, ‘लुंग्यासुंग्या’ वगैरे वगैरे ! बरं शब्दकोषात याचे अर्थ शोधायची गरजच नव्हती. आपलं ऐकणं आणि निरीक्षण यातून अचूक अर्थ कळे. ‘ फाटका इसम ‘ मात्र मी बरेच दिवस शोधत होते ! ‘मदनाचा पुतळा ‘ बापकमाईवर जगत असेल तर त्याला शून्य किंमत होती. अचूक शब्दांचा अचूक जागी उपयोग करायला तीक्ष्ण बुद्धी लागते. शाळा कॉलेज फारसं न पाहिलेल्या त्या पिढीकडे ती होती.
गॉसिपिंग त्याही काळात होतंच. घरातल्या ज्येष्ठा व्हरांड्यात, ओट्यावर, अंगणातल्या बाजांवर निवडण टिपण करत मस्त वेळ घालवत. “ हातपाय लुळे अन् जीभ चुरुचुरु वळे “ असं माझी आजी म्हणे. अशा गप्पांचा उल्लेख कोणी उखाळ्या पाखाळ्या काढणे असाही करे !
ही अशी खमंग, लज्जतदार, मर्मभेदी, वर्मभेदी, कधी सभ्य असूनही असभ्य भासणारी मराठी भाषा आमच्या पिढीतच लुप्त होऊ लागली होती. आता तर ती परोठे, ठेपले, पिझ्झा, बर्गरच्या संस्कृतीत विलीन झाली आहे. आंग्लाळलेल्या मराठीत तो ठसकाच नाही, ती मज्जा नाही ! पिढीगणिक भाषा बदलत जाते. ‘ ती व्यक्ती’ चा ‘ तो व्यक्ती ‘ कधी झाला समजलं तरी का ? आज प्रसिद्धीमाध्यमांवर जे मराठी बोललं जातं, ते ब-याचदा अनाकलनीय असतं. “ ** पण नांदा “ ! भाषा जिवंत राहायलाच हवी ! सगळ्याचं मिश्रण असलेली भेळ नाही का आपण आवडीनं खातो. तसंच, ही मराठी पण आपलीच आहे, नाही का ?
लेखिका: श्रीमती अरुंधती
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈