सौ.ज्योत्स्ना तानवडे
वाचताना वेचलेले
☆ एकटेपणा – लेखक : ऐश्वर्य पाटकर – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(‘थिंक पॉझिटिव्ह’ नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे “एकटेपणा”. पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे. या दिवाळी अंकातील “एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज!” हा श्री ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी आहेत आणि त्यांची ‘भुईशास्त्र’ आणि ‘जू’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे…)
“मला आमच्या इथं गावातील बियावाल्या बाईची गोष्ट आठवते. बियावाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं. हा तिचा हात गुण होता की झाडा-कोडावरची माया? माहित नाही.
मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं. ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती. पण तिने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही.
बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही. तिला एकदा आई म्हणाली होती, “आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झाले असतं तर आता नातू-पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!”
तेव्हा तिचे उत्तर होतं, “नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोरं कुणी सांभाळली असती ?”
“कसा जन्म जावा ओ आत्याबाई तुमचा ?”
तेव्हा ही बिया वाली बाई म्हणाली, “जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का ? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती ? होती गं.. पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली. म्हणाली, “आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना… !”
दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला.. अन् तसही, किती लेकरा बाळावाल्या आया बाया होत्या माझ्या भवतीच्या. पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे. माझ्या या लेकरा बाळांना पाय नाहीत, हे एका अर्थी बरंच झालं. ! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. “
खूप अंतर्मुख केलं बियावाल्या बाईंच्या या छोट्याश्या कथेने. वर उल्लेखलेल्या बियावाल्या बाईंना अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं ? एकटेपणाच्या जाळ्यात सापडू नये यासाठी तीन सूत्र नकळत आपल्या वागण्यातून देऊन जातात त्या…
पाहिलं सूत्र म्हणजे, “आपल्यातील पॅशन ओळखा, त्यात व्यस्त रहा. ”
दुसरं, “आपलं दुःख कुरवाळणं थांबवून, जे आहे त्यातही माझ्या दृष्टीने कसं चांगलंच होतंय असा दृष्टिकोन ठेवा. “
आणि तिसरं, खूप महत्वाचे सूत्र म्हणजे, “आपण लावलेल्या झाडांवर कधीही आपली मालकी सांगू नका, थोडक्यात, detach राहायला शिका, दुसऱ्यांसाठी काही करण्याची सेवावृत्ती अंगी असू द्या. “
लेखक : ऐश्वर्य पाटकर
संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈