सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ आठवतंय ना… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना… टेलिफोनचा फटाका आठवतो का… चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना… राॅकेटसाठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता…. आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे.
सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद….. आठवतंय ना..
खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो, कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना…
आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते,
“अरे बाबांनो.. दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे…. ! “
असो…. !!
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈