डाॅ. मीना श्रीवास्तव

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आता कुनी बलवत नाय’ – कवयित्री : सुश्री अनुराधा हवालदार☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

दिवायीच्या फराळाले

आता कुन्नी बलवत नाय

ताटं भरले फटु धाडते

सांगा तेचं करु काय?

*

आठ दिस आधीपासून 

शुबेच्चानं भरते फोन

घरी या फराळाले

आता असं म्हंते कोन?

*

घरी आता फराळाचं

मँड्डम काही करत नाय

रेड्डीमेड आनून खानं

अंगवळनी पडलं हाय

*

किचन झाले पॉश आता

कामासाटी बाया हाय

दोन कामं केली तरी 

मँडम म्हंते दुखते पाय

*

असं होन्यामागं बघा

कारनीभूत थो एकच हाय

हातामंदी चिकटलेला

मुबाईल काई सुटत नाय

*

सारे मिंटा मिंटानं

उघडू उघडू पायते फोन

नवी काय पोष्ट आली

आनलाईन हायेत कोन

*

चकली चिवडा लाडू शेव

ताटलीमंदी सजवतेत

मार त्याचे फटु काढून

वाटसअपवरती पाठवतेत

*

तोंडापुरतं या म्हंतेत

तेच्यातून समजाचं काय

दिस वार स्थळ येळ

काई काई सांगत नाय

*

लोनी लावू लावू बापे

शबूद फेकते गोड गोड

घरी येतो म्हना बरं…

मंग व्हते म्युट मोड

*

मले सांगा फटु पाहून

पोट माह्यं भरन काय?

म्या मनलं कवडीचुंबका

घरी कदीतं बलवत जाय

*

डाएटवरती हावो म्हंते

आईली आमी खातच नाय

पिझ्झा बर्गर मॅगी खातेत

याले काय अर्थ हाय

*

कलियुग हाये बाप्पा

फराळेचे फटुच घ्या

शुगरकोटेड बोलून म्हंते

पुढच्या वर्षी नक्की या

*

पैले आज्जी आय आमची

करत व्हती किती काय

दळन तळण सारं करुन

तक्रार कद्दी केली नाय

*

फार नवती सुबत्ता पन

पावना नेहमी जेऊन जाय

पैसा झाला मोट्टा तरी

मन आता कोतं हाय..

…फराळाचं इसरून जाय…

…बाई फराळाचं इसरून जाय…

कवयित्री : सुश्री अनुराधा हवालदार

नागपूर

प्रस्तुती : डॉ .  मीना श्रीवास्तव.

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments