सौ अंजली दिलीप गोखले
वाचतांना वेचलेले
☆ “एक प्लेट दोस्ती”… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
आज प्रथमच मी ‘ हॉटेल मैत्री ‘ मध्ये एकटी जेवायला गेले. खरं तर घरात जेवण तयार होते पण एकटे जेवायचा कंटाळा आला होता. … उगाssच.. विशेष काही नाही.
मी नेहमी कॉर्नरचे टेबल पकडते, एकतर दुसरे काय ऑर्डर करतात हे कळते आणि मी किती हादडून खाते हे कुणाला दिसत नाही. नेहमीचा वेटर पाणी टेबलावर ठेवून म्हणाला, ” काय मॅडमआज एकट्याच? “ त्याने मेनू कार्ड हातात दिले.
(थोड्या वेळाने) वेटर, ” मॅडम ऑर्डर ?? ”
पाणी पिता पिता कुठेतरी त्याचा प्रश्न डोक्यात होताच.
“आज एकट्याच !!? ” वेटर नेहमीचाच आणि आमच्या मैत्रिणींचा अड्डा बर्याच वेळा इथे जमतो त्यामुळे तो मला बर्यापैकी ओळखत असे.
मेनू कार्ड त्याच्या हातात देवून म्हणाले, “ एक प्लेट दोस्ती “ … मी थोडे खोचकपणे सांगितले
” नक्की मॅडम ? “.. त्याने मात्र मिश्किलपणे हसत उत्तर दिले..
थोड्या वेळाने हातात मोठी स्पेशल महाराजा थाळी घेऊन तो आला म्हणाला,
“ मॅडम, घ्या.. “मैत्री स्पेशल”…. ह्या थाळीच्या साम्राज्यात आपले दोस्त नक्कीच आहेत … पदार्थ आणि पक्वान्नच्या स्वरुपात. ”
‘ मीठ??? ‘
माझ्या चेहर्यावरचा प्रश्न त्याने लगेच हेरला
” मॅडम असे दोस्त नसले तर आयुष्य बेचव, पण अश्यांबरोबर प्रमाणापेक्षा जास्त दोस्ती कधी BP वाढवतील सांगता येत नाही. बरोबर ना मॅडम ? ”
मला हसू यायला लागले
*लिंबू* … कितीही म्हणा.. वयाच्या प्रतेक टप्यात एक आंबट मित्र /मैत्रीण ही असतेच. पण ती छोट्या लिंबाच्या फोडीइतकीच ठीक.. नाहीतर कधी तुमची विकेट उडवेल सांगता येत नाही. (स्वानुभव )
मॅडम, *चटणी * …. एखादी स्पष्ट बोलणारी मैत्रीण भली झणझणीत असते. मैत्री म्हणजे नेहमीच ” तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ” नाही. ‘ तुला अक्कल नाही. मूर्ख,,’, असं वेळप्रसंगी म्हणणारी…. पण दिसते तशी असते. कपट कुठे नाही… खरे आहे ना?
*कोशिंबीर* … ह्या मैत्रिणी सतत अलिप्त. स्वतः ला सांभाळून नेहमी कोपर्यात. WHAT’S APP ग्रुप च्या मूक सदस्या.
*पापड* … बापरे … या डेलीकेट डार्लिंग मैत्रिणीला मी स्वतः फार लांब ठेवते. अहो अति emotinal. पटकन तुटतात. पसारा सांभाळेपर्यंत नाके नऊ येतो.
….. मी पानातून बाहेर काढला … सांगितले, “ नको रे बाबा पापड पसारा. ”
मॅडम, *भजी* घ्या,….. अगदी सुटसुटीत. स्वतः च्या मस्तीत मस्त असणार्या मैत्रिणी. बेफिकिर पण सगळ्यांच्या आवडत्या.
*लोणचे*.. कधी आंबट कधी गोड, पण त्यांची जित्याची ती खोड, पण जरूरी असते एखादी *फोड * खरं आहे ना??
*चपाती किंवा भाकरी* … अतिशय मेहनती, सोशिक, पण बरेच काही बोध देतात. अतिशय साध्या, कुठे ही भपका नाही. मी बरे की माझी राहणी बरी. प्रकृतीला उत्तम. आयुष्यभर आपल्याला ह्यांची गरज … आणि त्यांना, तुमची काळजी असते पण गरज नसते.
*भाजी*.. रूपे भरपूर बदलेल पण तुमची साथ कधी नाही सोडणार. कधी *फतफते’ ल देखील पण तुमच्या आजूबाजूला नक्की घुटमळणारा हमखास पदार्थ.
*आमटी*.. ज्या वाटीत पडेल त्या वाटीचा आकार घेणारी… प्रत्येक प्रसंगाला आपले रूप बदलणारी पण प्रसंग सांभाळून नेणारी.
*गोड पदार्थ* …. अश्या मैत्रिणी तुम्हाला कधी एकट्या सोडत नाहीत. अगदी दुःखाच्या प्रसंगी देखील. कधी लाडवाच्या रुपात कधी खिरीच्या स्वरुपात.
*ताक किंवा सोलकढी* … अशासारखी मैत्रीण फारशी महत्वाची नसते, पण नसून ही चालते कधी कधी आयुष्यात अपचन फार झालं की शेवटी ह्याच उपयोग पडतात. प्रत्येक प्रसंगाची यथेच्छ चहाडी आणि उलटी यांच्याकडे करू शकतो. (थोडक्यात मन आणि पोट दोन्ही साफ)
*वरण भात.. दही भात* …. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत साथ देणार्या मैत्रिणी. त्या आपली भूमिका मस्त पार पाडतात. तुमच्या आयुष्यातील गोळा बेरीज याचा त्यांच्याशी काही संबंध नाही.
*मसालेभात.. साखरभात* …. अश्या मैत्रिणी ह्या एखाद्या कार्यक्रमाला किंवा प्रसंगाला हजेरी लावणार. पण त्या वेळी. आपली झलक दाखवून मनावर ठसा उमटवून जातात… पण नंतर आपल्याच लक्षात येईल की अश्या मैत्रिणी ह्या तेवढ्यापुरत्याच बर्या. दररोज अशांची मैत्री खुद्द आपल्याला परवडणार नाही.
….. स्वतःशीच हासत माझ्या मैत्रीच्या साम्राज्यात अगदी मग्न होते. इतक्यात वेटर भाजीचा चौफुला घेऊन आला……
“ मॅडम, थोडी उसळ? ”
मी, “अरे उसळ तर थाळीमध्ये नव्हतीच. “
“ मॅडम, प्रवासात किंवा सहज मार्केटमध्ये अचानक दोस्ती होते. ” … पण भाजीसारख्या मैत्रिणीची जागा कोणी घेऊ शकत नाही. उसळ ती शेवटी उसळच.
आयुष्याचे ताट गोड, आंबट, तिखट मैत्रिणींमुळे अगदी चविष्ट झाले होते.
“ मॅडम “ … seasonal स्वीट, आमरसाची वाटी घेऊन वेटर उभा
” नको असे दोस्त, स्वतः च्या सोयी प्रमाणे आयुष्यात येणारे.. ”
“ मॅडम, त्यांची देखील काही मजबूरी असू शकते. “.
” इतकी मजबुरी? ना दुःखात.. ना सुखात … फक्त स्वतः च्या सोई प्रमाणे? ”
*जिलेबी* सारख्या भल्या वेड्या वाकड्या असतील, गुलाबजामसारख्या भले रंगाने काळ्या असतील, पण रसगुल्लासारख्या अगदी सफेद स्वभावाच्या मैत्रिणी आहेत या थाळीत. नको असे seasonsl स्वीट दोस्त. ”.
वेटर …. ” मॅडम, त्यांचे महत्व पटले तुम्हाला ते ह्या seasonal आमरस मुळे ना. ? नाही म्हणू नका एखादी वाटी घ्याच. सोबत पुरी देखील आहे. ”
….. ह्म्म,,, हे असे दोस्त नेहमी इम्प्रेशन मारण्यासाठी एखादी चमची घेऊन फिरत असतात.
जेवण पूर्ण झाले. मस्त कालवून भुरका मारून सर्व मित्र मैत्रिणींची आठवण करून थाळीचा आस्वाद घेतला.
पण ताटाच्या बाहेर असलेले *काटे आणि चमचे?? *…. टोचून बोलणार्या आणि उगाच ढवळाढवळ करणार्यांना मैत्रीण ना.. थाळीतील दोस्तापासून दूर ठेवते. नाही म्हटलं तरी त्यांच्यात देखील एखादा चांगला गुण असतो. तितकाच पहायचा बाकी दुर्लक्षित करणे.
हात धुवून पेल्यातून पाणी प्यायले. असेही काही दोस्त असतात ज्यांची नावे माझ्या ओठावर सतत असतात. अगदी पाण्यासारखी निर्मळ मैत्री.
… आज मस्त पोटभर जेवले बघा… तुम्हाला कशी वाटली ही माझ्या दोस्तीची चविष्ट थाळी?
बडीशेप, पान खाल्ले ?
मssssग… भरा बिल आता।
अहो किती काय ? …
… ह्या दोस्तीच्या थाळीची किंमत…??? … ” अमूल्य “.
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈