विविधा
☆ “घनिष्ठ मैत्री…” ☆ श्री वैभव चौगुले ☆
निस्वार्थ विश्वास जिथे असतो, मानवी परिवर्तन जिथे होते, मर्यादितता, बंदिस्तता मधून जिथे मोकळा श्वास घेता येतो अशा ठिकाणी मैत्रीचे भक्कम कायमस्वरूपी वसलेले घर असते.
कृष्ण सुदामासारखी, कर्ण दुर्योधनासारखी मैत्री हल्ली कोठे अनुभवयाला मिळत नाही. मला मैत्रीची नक्की व्याख्या आपल्याला सांगता येणार नाही. पण माझ्या कल्पनेने, अनुभवानी,समोर घडलेल्या गोष्टी, ऐकलेल्या गोष्टी ज्या मैत्री या विषयाशी जोडल्या गेल्या आहेत त्यावरून मी मैत्रीवर थोडं लिहीत आहे.
घनिष्ठ मैत्री आयुष्याचा अविस्मरणीय ठेवा असतो हे खरे, पण केव्हा? जर मैत्री निभवली तर. ती ही मरेपर्यत! ही मैत्री भविष्यकाळात येणा-या परिस्थितीवर बदलणा-या मनावर, क्षणीक सुखाच्या मोहावर अंवलबून असेल तर ती कशी टिकेल?
घनिष्ठ मैत्री होण्यासाठी खूप वेळ जातो. ही मैत्री कुठे विकत मिळत नाही. या मैत्रीला कोणती कंपनी नाही. मैत्री सर्वांशी होत नाही आणि मुद्दाम कोणीशी मैत्री जाऊ न करावी म्हटली तरीही ती करता येत नाही.
आजारावर औषधं डॉक्टरांच्या सल्याने आपण घेत असतो. योगासनामध्ये हसण्याचे भाग घेतले जातात. कारण तो भाग योग अभ्यासामध्ये येतो. हसण्याने माणसाचे आयुष्यमान वाढते. असं मी नेहमीच ऐकतो. वरवरून नाईलाज म्हणून आपण खोटे हसू चेह-यावर आणत असतो.
एक सांगू ? आनंदावर, मनातून येणा-या हसण्यावर जर का प्रभावी औषध असेल तर ते औषध अंतरमनातून निखळ निर्माण झालेल्या मैत्रीतूनच मिळत असते. असे मला वाटते.
मैत्रीत एक हात धरून दुसरा हात दुस -या ठिकाणी बळकट करत, पहिला हात सोडून पुन्हा पहिला हात रिकामा ठेवून दुस-या हात शोधत मैत्रीला डाग लावत फिरणा-या मैत्रीचा प्रकार ही पहावयास मिळतो. मी या मैत्रीला न्यू आफ्टर ब्रेकअप फ्रेडशीप म्हणेन 😊 हे कधी होतं मनात काही गोष्टी लपवून ठेवणे, काही गोष्टीचा त्याग न करता सर्वच गोष्टाीना महत्व देत बसणे, अशा गोष्टी समोर येवू लागल्या की मैत्रीमधला दुरावा निश्चित होत जातो. पण या सवयीमध्ये एक मन निर्णय घेण्यात यशस्वी होतं आणि दुसरं मन मानसिकतेचं शिकार होवून जातं. किती प्रकार आहेत मैत्रीचे माहित नाहीत. मी घनिष्ठ मैत्रीवर लिहीत आहे हे लक्षात घ्या.
प्रेमांनी ओंजळ भरणे, भावनांच मोल जपणे, मळभ भरणे, मनाला निरभ्र करणे, आयुष्य वाटून घेणे, दिलासा देणे, काळवंडल्या क्षणातून बाहेर पाडणे. ही घनिष्ठ मैत्रीतले घटक मी म्हणेन! न बंधन न कुंपण घालता दुस-याच्या जीवनात फुलपाखरासारखे बागडणे, विचाराचे आदान प्रदान निखळपणे, निस्वार्थीपणे करणे पण हे शक्य होतं का हा प्रश्नच?
माणसाला मेल्यानंतर दफन करायला किंवा जाळायला जितकी जागा लागते ना तितक्याच मैत्रीच्या जागेत स्वर्गसुखाचा आनंद मिळतो. पण या जगा मध्ये अनेक नको असलेल्या गोष्टीकडे माणसाचं चंचल मन वळत असतं! काय तर मनाचं मनोरंजन होत नाही. म्हणून जीवाला जीव देणारं मन भेटलं तर वाळल्या उचापती होतात का? हे कळत नाही.काय लागतं जीवन जगायला दोन प्रेमाचे शब्द, अन्न, वस्त्र व निवारा या तीन गोष्टी सोबत एक गोष्ट वाढली आहे ती म्हणजे इटरनेट..🙂 इंटरनेट नसेल तर माणसाचे आयुष्य संपल्यासारखेच आहे. दोन चार दिवस माणसाला इन्टरनेट नाही मिळालं की डायरेक्ट सलाईनच लावावे लागेल. कारण जाळं, खूप पसरलेलं आहे. मनाचं पण आणि इंटरनेटचं पण. उभे आयुष्य कोणताही मोह न करता सुखाने जगता येतं, फक्त आयुष्यात एका मनाशी घनीष्ठ मैत्री होवून मरेपर्यत टिकली पाहिजे. हे तितकेच खरे वाटते . पण त्या जागेमध्ये आणि मैत्रीमध्ये कोणत्याही आमीश दाखवणा-या चिटपाखरूचा चुकून सुध्दा वावर होवू न देणे.
कमळाच्या फुलातील परागकण खाण्यासाठी भुंगा ज्याप्रमाणे त्याच्या आजुबाजूच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतो त्याच प्रमाणे घनिष्ठ मैत्री जपण्यासाठी आजुबाजूच्या परिस्थितीकडे दुलर्क्ष केले किंवा मनावर न घेता त्या गोष्टी व्यवहाराने हातळल्या की घनिष्ठ मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होणार नाही. पण हे करताना आपल्या दुस-या मनाला सांगून विचारात घेऊन निर्णय घेणे तितकेच आवश्यक आहे.
भावनेशी संबंध असलेलं हे एकच नातं जे रक्तांच्या अनेक नात्यापेक्षा पवित्र आणि परिपूर्ण असलेलं घनीष्ठ मैत्रीचं नातं आहे. असे म्हणावे लागेल. मैत्री टिकवून ठेवणं हे सर्वानाच जमते असे नाही. हव्यासा पोटी मोहाला बळी पडून चांगली मैत्री संपुष्टातसुध्दा आलेली पाहिली आहे.
When I am free you should also free..असं जर समजलं तर मैत्रीमध्ये दुरावा होत जातो. येथे समजून घेण्याची ताकत कमी पडते आणि मनाची चिडचिड होते, मानसिकता खचते. संयम सुटतो व नको ते होवून जाते. मैत्री ही मोहक वा-याची झुळूक असते. मैत्री करताना त्यांच्या गुणदोषासंगे स्वीकार करण्याची तयारी दर्शिवलेली असते. पण ज्यावेळी दोन मनांचे रस्ते एक होतात त्यावेळी आपला स्वभाव व चंचलपणा बदलावा लागतो, एकमेकांचा आदर करावा लागतो, कित्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो. चालायला लागले की मग मागे हटण्याचा विचार मनात यायलाच नाही पाहिजे. जिथे अपेक्षा संपतात, जिथे शोध संपतो, जिथे अपेक्षाच राहत नाहीत तिथे अपेक्षा येतात कोठून आणि मग अपेक्षा भंग होण्याचे कारण तरी काय असू शकते. द्या ना जितका वेळ द्यायचा तितका तुमच्या मैत्रीला. सर्व सोडून मैत्रीमध्ये सर्वस्व अर्पण केलेलं असतं. मात्र तिथे कानाडोळा, लपवाछपवी केली तर ख-या मैत्रीचा स्वप्नचुरा होण्यास कितीसा वेळ लागणार आहे.
मैत्री ही अशी भावना आहे जी दोन मनांना अंतःकरणापासून जोडते. खरा मित्र त्याला योग्य सल्ला आणि योग्य दिशाच दाखवत असतो. मैत्री ही फक्त आनंदातील क्षणांची सोबत नसून दु:खात ढाल होवून समोर येण्याची ताकत असते.
घनिष्ठ मैत्रीचा विश्वास हाच पाया असतो. मैत्रीही दु:खात हसवते, संकटावर मात करायला शिकवते, जगायला शिकवते. संयमी राहायला शिकवते, चांगले कठोर निर्णय घ्यायला शिकवते. मैत्री ही आधार होऊन राहते. आणि शेवटी इतकच म्हणेन मैत्री ही हृदयाचे निखळ सौंदर्य दाखवणारा आरसा असते…
© श्री वैभव चौगुले
सांगली
मो 9923102664
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈