सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “नारळी पौर्णिमा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

ह्यावेळी अधिक महिन्यामुळे सगळया सणाना जरा विलंबच झाला . कधीपासून श्रावणाची वाट बघत होतो, नुकतेच श्रावणाचे आगमन झाल्याने एक प्रकारचा उत्साह आला.  नारळीपोर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण कधीकधी एकाच दिवशी तर कधीकधी लागोपाठच्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतात.पोर्णिमेची तिथी दोन दिवसात विभागल्या गेली तर आधीचा दिवस नारळी पोर्णिमा आणि नंतरचा दिवस राखीपोर्णिमा.

सणसमारंभ आले की बाजारात जरा चहलपहल,लोकांमध्ये जरा उत्साह आलेला नजरेस पडतो. आपले हे सणसमारंभ आपल्याला मानसिक मरगळतेतून बाहेर काढतात आणि मनाला एकप्रकारची उभारी आणतात.

तसे हे दोन्हीही सण विदर्भातील नाहीत. नारळीपोर्णिमा हा सण कोकणातील, प्रामुख्याने सागरीकिनारा लाभलेल्या भागातील. तर रक्षाबंधन वा राखीपोर्णिमा हा सण प्रामुख्याने उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश ह्या भागातील, पण आजकाल सगळे सणवार हे बहुतेक सगळ्या भागांमध्ये साजरे केल्या जातात.

नारळीपोर्णिमा हा सण कोळी लोकं वा समुद्रकिनारी राहणाऱ्या, तेथे वस्ती करणाऱ्या लोकांसाठी अतिमहत्त्वाचा सण.नारळीपोर्णिमेच्या दिवशी समुद्राच्या किनाऱ्यावर कोळी लोकं नारळ  वाढवून खवळलेल्या समुद्राला शांत होण्याकरिता प्रार्थना करतात. ह्या दिवसापासून मासेमारी

 साठी ते आपापल्या होड्या घेऊन सागरात उतरतात आणि गेले काही दिवस त्यांनी बंद ठेवलेल्या व्यवसायाचा परत एकदा श्रीगणेशा करतात. आता हा दर्याच त्यांचा मायबाप, देव सगळंकाही असतो.नारळीपोर्णिमेचा खास  पदार्थ म्हणजे नारळीभात. ओल्या नारळाचा चवं,लवंग, बेदाणा,साखर आणि चांगल्या प्रतीचे तांदूळ ह्यापासून नारळीभात करतात. ह्यात केशराच्या काड्या मिसळल्या तर सोने पे सुहागाच. नारळीभातासाठी लागणारे मुख्य साहित्य हे कोकणात पिकणारे तसेच समुद्रकाठावरील.कोळी लोकं हा दिवस त्यांची पारंपरिक नाच,गाणी करीत खूप उत्साहाने साजरा करतात.

रक्षाबंधन वा राखीपोर्णिमा हा सण बहीणभावाच्या प्रेमाचे,स्नेहाचे प्रतीक म्हणून साजरा केल्या जातो.परगावी असलेल्या. बहीणी आठवणीने, न चुकता भावाला राखी पाठवतात. आपली संस्कृती, सणांची जपणूक ह्यामुळे ह्यादिवशी हाताला राखी न बांधलेला पुरुष अभावानेच आढळत असेल.ह्यादिवशी कित्येक भगिनी आपल्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना राखी बांधायला जातात वा राखी पाठवितात.

लहानपणी साजरी केल्या गेलेले रक्षाबंधन खूप अनोखे असायचे.माझा भाऊ तर आधी पूर्ण बाजार हिंडून त्याला आवडलेल्या राख्या आणि ते दुकान सांगायचा.तेथून आम्ही बहीणी राख्या आणायचो,मोठ्ठ्या चमकीच्या आणि नोटांनी सजविलेल्या वगैरे.तेव्हाच तो एक कर्तबगार, यशस्वी बँकर होणार ह्याची नांदी असावी. असो लहानपण खूप छान आणि निरागस,अल्लड असतं.

राखीपोर्णिमा वा रक्षाबंधन ह्या संकल्पनेचा संबंध हा रक्षणाशी निगडित आहे. भाऊ आणि बहीण ह्यांच नातं प्रेमाचं,जिव्हाळ्याचं स्नेहाचं आणि तितक्याच हक्काचं सुद्धा असतं. ह्या दिवशीच्या निमित्ताने हे एकमेकांना भक्कम आधार देणारं नातं ,संकटसमयी रक्षा करण्याचं वचन देणारं नात तर महत्वपूर्णच, पण ह्या सणा च्या निमित्ताने अजूनही कितीतरी भक्कम आधार देणारी, रक्षा करणारी,अशी अजूनही कितीतरी नाती असतात.ह्या दिवशी हटकून ह्या नात्यांची,ह्मा भावनांची जपणूक करणाऱ्यांची हटकून आठवणं येते आणि त्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त कराविशी वाटते.ह्या भक्कम आधारामध्ये आपल्याला सुरक्षित ठेवणारे लष्करातील जवान,आपल्या जिवीताची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणारी प्रत्येक व्यक्ती, आपल्या नागरी सुरक्षा राखणा-या पोलीस खात्यातील प्रत्येक व्यक्ती, आपल्या आरोग्याच्या काळजीत मोलाची मदत करणारे सफाई कामगार तसेच ह्या प्रकारच्या तत्सम क्षेत्रातील आपली रक्षा करणारी,आधार देणारी कुठल्याही व्यक्ती चे ह्या  त्यांनी पुरविलेल्या रक्षणाच्या कार्याप्रती मी मनापासून आदर,कृतज्ञता व्यक्त करते.ह्या दिवशी आपल्याला आधार देणा-या वनसंपदेला पण विसरून चालणार नाही. तेव्हा ह्या सगळ्यांची आठवण काढून त्यांच्याप्रती असलेल्या अभिमानाने खूप छान वाटतं.

आपल्याला भावनिक आधार देणारी,आपलं मनोबलं वाढविण्यास मदत करणारी एक शक्ती असते,मी त्या शक्तीला “देव” म्हणते,ह्या शक्तीलाही माझे कायम रक्षण करण्यासाठी एक राखी अर्पण.

खरंच धन्य आपली विवीधतेने नटलेली भारतभूमी, जेथे आपण सर्वधर्मसमभाव जोपासून सगळे सणवार गुण्यागोविंदाने, प्रेमानेआत्मियतेने आणि उत्साहाने साजरे करतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments