सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “जागतिक पोस्ट दिन निमित्त: (09ऑक्टोबर)…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
जन्मच मुळी नोकरदार कुटुंबात झाल्याने नोकरी ह्या क्षेत्रातील विवीध खात्यांची ओळख ही लहानपणा पासूनच होती. आई मुख्याध्यापिका त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र आणि बाबा सहकार खात्यात असल्याने ह्या दोन्हीं खात्यांना जवळून अभ्यासता आल. बरेचं वेळा आपल्याला कागदावरील अगदी छोटासा काळा ठिपका चटकन दिसतो पण अख्खा पांढरा कागद मात्र आपल मन, डोळे, बुध्दी विचारतच घेत नाहीत. तसच ह्या नोकरदार खात्यांमधील बारीक त्रुटी आपण उगाळत बसतो पण ह्या क्षेत्रांत होणाऱ्या मोलाच्या मदतीच्या गोष्टी आठवत नाहीत.शिक्षणं खात आणि सहकार खात हयाचबरोबर आईची पोष्टाची एजंसी असल्याने पोस्ट खात पण खुप जवळून अभ्यासता आल.
पूर्वी नं घरोघरी विशिष्ट कामं करायला काही नेमलेली मंडळी असत, सहवासाने वा नित्यभेटीने ह्या मंडळींशी आपलं तसं बघितलं तर कुठलही नातं नसायचं पण ह्या मंडळींशी आपले भावनिक बंध जुळल्या जाऊन त्यांच्या बद्दल आत्मियता, घरोबा हा आपसूकच निर्माण व्हायचा. त्या मंडळींमध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे आपले पोस्टमनकाका असायचे. आज जागतिक टपाल दिन.टपाल खात्याप्रती आणि पोस्टमनकाकांप्रती असलेल्या आदरामुळे आजचा हा लेख त्यांना अर्पण.
पोस्टमनकाका म्हंटले की आठवते ती त्यांची कायम खाकीवर्दीतील हसरी,बोलकी आणि तडतडी मुर्ती. ऋतु कुठलाही असो ह्या पोस्टमनकाकांची आणि टपालखात्याची सेवा निरंतरच. अजूनही आठवतात पावसाळ्यात ओलेगच्च होऊन पण टपाल भिजू नये म्हणून प्लँस्टीकच्या पिशवीत जिवापलीकडे टपाल सांभाळणारे सायकलवर येणारे पोस्टमनकाका, अजूनही आठवतात कडकडीत रणरणत्या उन्हात आम्ही सगळे दुपारी पत्ते खेळत असतांना घामाघूम होऊन येणारे पोस्टमनकाका
गार पाणी सुद्धा बाहेर उभे राहून पिणारे कारण आत आलो तर पंख्याचं वारं बाधून ताप येईल म्हणणारे पोस्टमनकाका. खरचं ह्या खात्याच्या सेवेला मनापासून सँल्युट. कदाचित नवीन तंत्रज्ञानामुळे आजच्या पिढीला ही सेवा,हे जुळलेले भावनिक बंध उमगणार पण नाहीत.
नवीन नोकरीचे नेमणूकपत्र आणणारे, कुणाच्या नात्यात बाळं जन्माला आलं की खबरबात घेउन येणारे काका घरच्यासारखे आपल्या आनंदात सहभागी व्हायचे आणि नात्यातील कुणी गेल्याची तार घेऊन येणारे पोस्टमनकाका घरचीच व्यक्ती असल्यागत धीर वा सांत्वन करायचे.
लहानपणी खरतरं पोस्ट खातं म्हणजे फक्त तार,मनीआँर्डर, पत्र पोहोचवणारं खातं एवढचं समजायचं.पण जसाजसा काळ गेला, समज आली तेव्हा ह्या खात्याचा प्रचंड मोठा आवाका,काम बघून ह्यांच्याप्रती आदर अजूनच दुणावला. पुढे माझ्या आईने पोस्टाची एजन्सी घेतली.आर.डी,एन.एस.सी,के.व्ही.पी,पी.पी. एफ ह्या योजना डोक्यात शिरल्या. ह्या खात्यानेच जणू आम्हा भावंडांना आई करीत असलेलं काम बघून भविष्यात करायची तरतूद, काटकसर,नियोजन आणि सगळ्यात महत्वाची थेंबे थेंबे तळे साठे ही म्हण समजवणारी बचत ह्या गोष्टींचं अपरंपार महत्त्व अगदी लहानपणीच समजावीलं आणि त्याचा फायदा अजूनही आम्हाला होतोय.
भारतात कारभाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर पसरेलेल्या जाळ्यांमध्ये प्रामुख्याने रेल्वे सेवा,टपाल सेवा ह्याचा उल्लेख करावाच लागेल. भारतीय टपाल सेवा ही भारतातील सरकारच्या टपाल खात्यामार्फत इंडिया पोस्ट या नावाने चालवली जाते. देशाच्या दूरवरच्या आणि पोहोचायला अत्यंत अवघड भागात सुद्धा ही टपालसेवा पोहोचली आहे. भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटांची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये1852 मध्ये झाली तर 1854 पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले.भारतामध्ये पहिले टपाल तिकीट 1931 साली छापले गेले. त्यानंतर पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 मध्ये निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा छापण्यात आला.
बचतीच्या बरोबरीने विकास साधण्यासाठी कर्जाचे महत्त्व जाणून भविष्यातील काळाची पावलं ओळखून ह्या टपाल खात्याने “बँकींग सेवा”पण सुरू केलीयं.
ह्या खात्याचे मला स्वतः ला खूप चांगले अनुभव आलेत. यवतमाळ ला सुदधा ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांनी व्यवहारीक बाजू समजावून सांगून खूप सहकार्य केलं. माझे सासरे पोस्ट खात्याचे कर्मचारी होते. त्यामुळे ति.आईंना पोस्ट खात्याची पेन्शन मिळते. आधी यवतमाळ चे पोस्ट आँफीस,ह्या खात्यातील आँडीट सेक्शन आणि आता बडनेरा पोस्ट खात्यातील कर्मचारी ह्यांची मोलाची मदत आणि तत्पर सेवा आम्हाला वेळोवेळी मिळाली आणि अजूनही मिळते आहेच.त्यामुळे ह्या खात्याच्या समस्त कर्मचाऱ्यांना जागतिक टपाल दिना निमीत्ताने धन्यवाद देऊन ह्या खात्याची सेवा आपल्यासाठी खरोखरच गौरवास्पद आहे हे जाणून आजच्या पोस्टची सांगता करते.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈