श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “रस्ता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

रस्ता…… एक निर्जीव असला तरी आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग. किती प्रकाराने, वेगवेगळ्या अर्थाने आपण याचा उल्लेख करतो.

रस्ता…… सरळ, वेडावाकडा, चढ उताराचा, डोंगरदरीतून जाणारा, छान, खड्डे असलेला, किंवा नसलेला, घाटाचा अशा अनेक प्रकाराने आपण त्याबद्दल बोलतो. तर कधी कधी खडतर, प्रगतीचा, साफ अस म्हणत आपल्या आयुष्याशी त्याचा संबंध लावत त्या बद्दल व्यक्त होतो‌.

रस्त्याने आपण सहज कधीच जात नाही. अगदी सहज म्हणून बाहेर पडलो, अस म्हटलं तरी वेळ घालवण हाच उद्देश त्यामागे असतो.

रस्त्याने जातायेता आपण काही गोष्टी बघतो, काही नजरेआड करतो, काही गोष्टींकडे आपल लक्ष वेधल जात, काही गोष्टी आपण टाळतो. अस बरच काही रस्त्यावर करतो.

कोणी येणार असेल तर ते येण्याच्या आधीपासूनच अधूनमधून आपण रस्त्यावर नजर टाकतो. तर कोणाला निरोप द्यायचा असेल तर ते दृष्टीआड होईपर्यंत आपली नजर रस्त्यावर खिळलेली असते.

रस्ता निर्जीव आहे अस म्हटल तरी प्रत्येक रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा, इमारतींचा, तिथल्या परिस्थितीचा प्रभाव रस्त्यावर आहे अस आपल्याला वाटत.

इस्पितळं असणाऱ्या रस्त्यावर एक प्रकारची शांतता, तणाव, काळजी, हुरहूर, किंवा सुटकेचा निःश्वास असल्याचं, तर शाळेच्या रस्त्यावर मुलांचा कलकलाट बागेतल्या पक्षांच्या चिवचिवाटा सारखा मुक्त वाटतो. महाविद्यालयाच्या रस्त्यावर तारुण्याची कारंजी उडत असतात. तर चित्रपटगृह, आणि उद्यानाच्या रस्त्यावर उत्साह.

बाजाराच्या रस्त्यावर भाजीपाला, फळं, फुलं यांची रेलचेल असते. तर मध्येच उपहारगृहातील पदार्थांचे वास आपल्याला नाक, जीभ, आणि पोट असल्याची जाणीव करून देतात. सोबत रसवंतीच्या घुंगरांचा नाद कानावर येतो. सराफ बाजारातील रस्त्यावर चकचकाट व लखलखाट असतो. तर धार्मिक ठिकाण असलेल्या रस्त्यावर प्रसन्नता जाणवते.

रस्त्यावर असलेल्या इमारतींचा, हालचालींचा, आणि वातावरणाचा संबंध आपण रस्त्याशी लावतो, तसच रस्त्यांच रुप सकाळ, दुपार, संध्याकाळ, आणि रात्र अशावेळी वेगवेगळ असत, आणि ते आपल्याला जाणवतं.

सकाळी लगबगीचा, दुपारी थोडा सुस्तावलेला, लोळत पडलेला, संध्याकाळी उत्साहाने वाहणारा, तर रात्री, दिवसभराच्या धावपळीने हळूवारपणे, हातात हात घेत रमतगमत पावलं टाकत जाणारा वाटतो.

उत्सवाच्या आधी आणि उत्सवाच्या वेळी असलेल रस्त्यावरच वातावरण उत्सव संपल्यावर बदलल्या सारख वाटत.

शहर, प्रांत, बोलीभाषा, राहण्याचे ठिकाण यावरून जसं माणसाच वेगळेपण लक्षात येत, तसच रस्त्यांच सुध्दा आहे. गावातला, शहरातला, कच्चा, पक्का, रुंद, दोन, चार पदरी, राष्ट्रीय अस वेगळेपण असत.

कितीतरी गाण्यांमध्ये सुध्दा रस्ता या शब्दाचा वापर केला आहे.  रस्ता…… तोच तसाच असतो. पण वेळ आणि प्रसंगानुसार आपण त्याचं वेगळेपण अनुभवत असतो. मिरवणूक, प्रचार, उपोषण, मोर्चा, वारी या सारख्या अनेक गोष्टींसाठी लागतो तो रस्ता…….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments